Monday, 11 January 2021

Fullproof फूल

 

फुलातलं गम्य हुंगत
ती झाडाशी उभी होती...
 
अजून एक वेडं फुल
म्हणून झाडानेही तिला सहज
सामावून घेतलं ...
 
आणि अश्यात
हवेतल्या बाष्पाला
अलगद उतरण्याचा मोह पडावा
असं 'त्याचं' उत्तर आलं...
 
तिनं दवबिंदू म्हणून अलवारपणे झेलेलं...
 
आणि पानांनीही
उगी त्यावर हक्क मिरवला नाही...
 
असं 'तुझं माझं' करायचं नसतं
तरच मोकळं आकाश कुणाचंही होऊ शकतं...
 
झाडं कित्ती सहज काही शिकवून जातात...
 
पण मग 'फुलपाखरी' हृदयाची ती
इतस्ततः उधळली..
 
परत काहीसं आठवलं म्हणून परत त्याच झाडापाशी आली...
 
"हं, आता काय?"
 
"मगासच्या कवितेत थोडे corrections करायचे होते..."
 
झाडाला फुटकन हसूच आलं पण जरा रागावण्याच्या अविर्भावात ते तिला म्हणालं,
 
"कित्ती चक्रम मुलगी आहेस...😌
 
Corrections कसली करतेस? ते तुझं र्हस्व-दीर्घ व्याकरण ठेव तुझ्यापाशीच...
 
असोशी आणि आवेगाने मनातलं काही सांगू पाहणं याचीच फुलं होतात वेड्या...
 
त्यांना उमलू द्यावं ...
मुळीच correct न करता...
 
आणि ...
 
निरपेक्षपणे कुणालाही घेऊ द्यावी
त्याला 'खूडणं' न म्हणता...
 
त्या 'कोणाची' म्हणूनच ती आलेली असतात उभारून वर
थेट मनाच्या तळाचा ठाव सांगत...
 
सहज असू द्यावं ग सगळंच ...
 
शब्दात उतरली तर उतरली ...
बंध घालू नये कश्याचेच त्यांना...
 
मग बघ त्यांचं गंधाळणं तुला किती वेड लावतं ...
त्यांचा मुलायम , मृदू स्पर्श झिरपत , काही मनाशी पोचतं...
त्याचं 'रंगपण' हृदयस्थ होतं
अदृश्य पंख देत सारे 'संदेह' मुक्त करतं...
हं ☺️
उमगलंय वाटतं काही तुला..
तशी खुळीच आहेस म्हणा तू ..
पण उगीच नाही ना गालातल्या गालात हसत तू नेहेमी...
आत्ता कशी अगदी माझी fullproof फूल वाटतेयस...
 
थांब जरा निमिष मात्र , अशीच तरातरा स्वप्नातून बाहेर निघू नकोस...
 
दृष्ट लागलीये तुला की कसली
बाधा झालीये वाटेल सर्वांना...
 
जरा माती ओवाळून टाकते.."


Sunday, 23 August 2020

कृष्णमयी...

  •  
     
    ग्लानीतून तिला जाग आली तेव्हा उन्हं उतरंडीला लागली होती... आताशी आपल्या सवंगड्यांसवे, गाईगुरांना घेऊन येईल तो. 
     
    'आज काय खाऊ केला आहेस लवकर दे बघू.. ' म्हणून भवती पिंगा घालेल आणि काय करू अन काय नको असे होऊन जाईल आपल्याला...
     
    अशी काय जादू आहे त्याच्या डोळ्यात अवघे जग विसरून रमून जातो आपण.
    खरेतर दटावयाचे असते त्याला उशीर केल्याबद्दल,
    दुपारी यमुनेला गेल्यावर सर्वांसमोर वाट अडवल्याबद्दल, कोणाकोणाच्या घरी जाऊन लोण्यावर ताव मारल्याच्या उगा कथा केल्या बद्दल!
     
    पण आपल्या शब्दात असे गारुड भरतो की ऐकतच राहावेसे वाटते. स्थळ , काळ , वेळाभान सगळंच कसं विसरून जातो आपण तो आला की!
    आणि तो सोबत नसताना सर्वांसोबत अन मनातही त्याच्याच गोष्टी करत राहतो.
    एकदा चुकून निघून गेलं बोलताना 'खूप मोठ्या माणसांसारख्या गोष्टी करतो' आणि या कानाचे त्या कानी होताना 'तो तिला हवे तेव्हा मोठे होतो' च्या व्यर्थ वल्गना झाल्या.
     
    किती रडलो आपण त्या दिवशी! दिवसभर वाट पहिली धास्तावून ....
     
    आला तर काय होईल आणि नाही आला तर अजूनच काही होईल..
     
    आणि आला तो नेहेमीसारखा हसत नाचत... आपल्या इवल्या हातात हनुवटी धरून म्हणाला
     
    "बरं झालं की लोक असं बोलताहेत. होऊनच टाकतो की मोठा आणि मग करून टाकू लग्न बिग्न"
    तिला एकदम हसूच आले.
     
    "लग्न बिग्न ? ते काय असते ते माहिती तरी आहे का वेड्या मुलाला?चल खाऊ केलाय तुझ्या आवडीचा.मित्रांनाही बोलाव. खूप सारा केलाय. सर्वजण मिळून खा."
     
    "कधीतरी तुझ्याही आवडीचा खाऊ करत जा की. तोसुद्धा तितक्याच आवडीने खाईन. किव्हा मीच करत जाईन. यालाच म्हणतात लग्न....."
     
    खट्याळ हसू मिरवत स्वारी निघूनही गेली आणि आपण वेड्यासारखे विचार करत राहिलो ....
     
    पण ही ग्लानी कसली ?
    आता नेमका कसा दिसतो ...कसा हसतो.. काहीच कसं आठवत नाही..
    भ्रम .. संभ्रम कसलं दाट धुकं?
     
    डोळे उघडत तिने सभोवार पाहिले.
     
    आजूबाजूचा कण न कण निष्प्राण होऊन पडला होता...माणसं, झाडं, वेली, रस्ता ,गायीगुरं , सांजवारा स्तब्ध ...जीवघेणी शांतता ...वेळभानेची काळोखी पोकळी.... बाहेर पडण्याची वाट नसलेली...त्राण गळालेली ...
    असहनिय....असहाय्य..
     
    काही दिवसांपूर्वीची ती आर्त पहाट तिला आठवली...
     
    "का ग सानिका, तुझा स्वर आज असा व्याकुळ का?" तिच्या काळजात कळ उमटली.
     
    "माझं जाणं अटळ आहे... तुला कसं सांगू..."
     
    "कुठे जाऊ शकशील मला सोडून?"
     
    "दृष्टीभ्रमापलीकडे ..."
     
    "कित्ती गहन बोलतोस? आणि का बोलतो आहेस असं? हे असंच सारं व्हायचं होतं तर हे माझ्या अवघ्या अस्तित्वाच्या कुडीत न मावणारं वेड तू का लावलंस? "
     
    "तु उत्तर जाणतेस ... "
     
    त्याच्या डोळ्यातली निरव शांतता तिच्या हृदयाला पार चिरून गेली.
     
    आत्ताही तिला हे सारं आठवलं आणि वर्तमानाचा संभ्रम पडला.
     
    काही वेळापूर्वी असं रथाचे चाक अडवून उभे होतो आपण...
    एरवी आपल्या चेहेऱ्यावरच्या दुःखाच्या , अस्वस्थतेच्या एका पुसट रेषेनेही विस्कटणारा तो आज किती निश्चल, निश्चयी, ठामपणे रथ हाकायला सांगत होता.
     
    कोणीतरी त्याचे रूप घेतलेला बहुरूपी म्हणावा तर त्याच्या सुरेल अंतःकरणाचे सोंग कुणा पेलू शकेल...त्याचे सुंदर हृदय डोकावणारे लोभस डोळे कोण लेऊ शकेल?
     
    तोच होता... आणि त्यानं सांगितले होतं ...
    हे अटळ आहे ... त्याची आपली भेट जितकी अटळ ...तितकाच भेटीनंतर वियोगही .... आणि जीवघेणा विरहही..
    तात्पुरता ..की कायमचा ?
    कोण सोडवील हे कोडे...त्याच्याशिवाय कोण सोडवू शकेल..?
    पण तो...पोहोचण्याच्या सर्व शक्यतांच्या पार गेलेला..
     
    अजून काय बरं म्हणाला होता तो.?.. तिने कशोशीने आठवायचा प्रयत्न केला.
    पीळ पडलेल्या हृदयातून ,त्याच्या आठवणींच्या घनदाट जंगलातून..मनभर विखुरलेल्या त्याच्या अस्तित्वाच्या खुणा जोखत जाताना तो आता असणार नाही या भयाण जाणिवेला कसं सामोरे जायचं?
     
    आणि तिला आठवले..
    त्याचे आश्वासक डोळे .... तिच्या मनाचा ठाव जाणणारे... हृदयीचे गुज ऐकणारे...
     
    "माझ्या सानिकाचा इतका का दु:श्वास करतेस?"
     
    "ते तुला नाही कळणार...दु:श्वास नाही ... खूप हेवा वाटतो.. आपल्याला इतके निर्व्याज राहता येत नाही याचे ... इतके समर्पण कधी तरी शक्य होईल का आपल्याला याचे उत्तर 'नाही' मिळते त्याचे दुःख असते ते ... "
     
    "तुम्हाला दोघींना मिळून खरंतर 'मी' खेळावा लागणार आहे पुढे.. "
     
    "म्हणजे रे ?"
     
    त्याने नेहेमीप्रमाणे पाव्यावर ओठ धरले आणि काही काळापुर्वीचे गूढ बोलणे आपण विसरून गेलो...
     
    काय होता त्याचा अर्थ .?...
    मनाशी विचार करताना तिला अचानक अवसान आले आणि ती धावत यमुनाकिनारी गेली ..
    तिथे त्याच्या सुकुमार पाऊलखुणा रेतीत तश्याच उमटून राहिल्या होत्या ...
    तो नेहेमी बसायचा तो दगड आणि त्याची प्रिय 'सानिका'..
     
    तिला खूप भडभडून आलं ....
    सांजवेळा मावळतीला लागतानाचा कातर स्पर्श तिला सहन होईना ..
    आंतरिक उमाळ्याचे कढ रिचवत
    तिने बासरी हातात घेतली ...
     
    बासरीवर रेंगाळलेला त्याचा अमीट स्पर्श तिला कणभर उभारी देऊन गेला...
     
    तिने बासरी प्राणपणाने ओठाला लावली पण त्यातून सूरच उमटेनात ....
    तो तर सोबत आपले श्वासही घेऊन गेला....
     
    क्षितिजावर एक एक करत चांदणी उमटू लागली आणि काळोखात काही सावल्या भास वाटाव्या इतक्या ओळखीच्या ... तिला काही सांगू पाहणाऱ्या ... सुचवू पाहणाऱ्या ..
    आणि अजमावू पाहणाऱ्या..
     
    आणि दृष्टीभ्रमापलीकडे उभा होता तो ... तितकाच मिश्कील हसत ... आपले खट्याळ डोळे रोखून ...
    तिला हर्षोल्हासाचे भरते आले... आणि अधराच्या पाकळ्यांमधून मुक्त झालेला तिचा श्वास सानिकेसोबत संगीत खेळू लागला ...
     
    प्रेमविलापाचे आर्त स्वर ..वाऱ्यासोबत इतस्थत: पसरू लागले .. आणि तिच्या दुःखावेगाचे निरूपण होऊ लागले..
     
    दूर गेला तरी कुठे कुठे आणि किती किती भरून राहिला होता तो...
    आजूबाजू सर्वत्र आणि आपल्या आतही तोच .. ..
    इतके तादात्म्य इतकी एकरूपता तो असताना कधीच कशी जाणवली नाही?
    की समझावत होता तो हेच सारं आपल्या अगम्य भाषेतून आणि आपण मात्र आपल्या मायेच्या धुक्यातून .. निरर्थक बंधने माळून... बाहेरच पडू पाहत नव्हतो..
     
    आता मात्र सानिका मुक्तपणे आनंद बरसवत होती ... ती स्वतःच त्यात इतकी रंगली होती की जणू खऱ्याखोट्या कुठल्याच उत्सर्गाची गरजच मिटावी ...
    यमुनेच्या पाण्यात मंत्रमुग्ध लाटा अविरत खेळू लागल्या .. उमटणारे उत्कट जलतरंग...
     
    आजूबाजू वृक्ष , वेली , आणि अंधार लयबद्ध ...अवघा आनंद, काळ स्थानबद्ध ..
     
    उत्तररात्रीला पारिजात शुभ्र आनंद ढाळु लागला आणि ती भानावर आली ... ही इतकी सगळी जादू आपल्याला त्यानं कधी बरं शिकवली ?
     
    ती वेगात निघाली बेभान , सैरवैर .... आता थांबून चालणार नव्हतंच..
    वाटेतल्या प्रत्येक कणाकणाला , अणूरेणूला 'संजीवन भान' देत ... मृत , अवकळा आलेल्या प्रत्येकाला नवजीवन देत ..
     
    आणि पहाटेच्या पहिल्या प्रहरी 'त्याच्या जाण्याचा.. त्या दुःखाचा' विसर पडावा इतकं सारं पूर्ववत ... तिचा विश्वास बसेना ..
     
    त्याच्या विरहाच्या दुःखात चूर होताना हे पुनर्निर्मितीचे दान आपल्या ओंजळीत टाकून...
     
    शेजारी उभा तो...
     
    तितकाच सहज... 
     
    तितकाच निरागस...
     
    तितकाच 'तिचा'
     
    आणि
     
    ती त्याची 'कृष्णमयी'....
     
     

Wednesday, 22 July 2020

ती'ची मुक्तिकथा





पहाटेच्या दुलईत रात्र मिटू लागली होती..धुक्यात अवघे जग मंत्रून झोपी गेले होते....
 
तिच्या पहाटेच्या नित्याच्या कामांना मात्र वेग होता... कारण आज तिचा तो तिला भेटणार होता...जगाच्या नजरेंपलिकडे...
 
दळणकांडण उरकून , गाईगुरांच्या धारा काढून, त्यांना चारा सरकवून ती वेगाने निघाली...
बेभान ...अस्वस्थ..उत्सुक... थोडीशी धास्तावलेली...
 
आणि नदीकाठी तिला 'तो' तिची वाट पाहत असलेला दिसला.... तिच्या धाप लागलेल्या शरीराभर एक गोड शिरशिरी उमटली.....
 
पण नेहेमीच्या आवेगाने तो जवळ आला नाही...मग ती तिच्या प्रेमभरल्या असोशीने जवळ गेली..
 
"हे काय आज काही बोलायचे नाही वाटतं..." तिच्या काळ्याभोर डोळ्यात दुःख उमटलं..
 
"वेडे, तुझा माझा संवाद-संबंध हा किती जुना अग... ही आजची का गोष्ट आहे?"
 
"बोल ना काहीतरी.. खूप ऐकावेसे वाटतं आहे ...."
 
"बरं चल, आज वेगळया भाषेत बोलू....."
 
"पण मला तर प्रेमाची सोडून कुठलीच भाषा येत नाही की..."
 
तिच्या गोंधळलेल्या आविर्भावावर तो नेहेमीसारखा गोड हसला. गालावर एक टिचकी वाजवत म्हणाला,
 
"जा तिथे पलीकडे बस.मी इथं या दगडाशी बसतो."
 
"हे काय? एवढ्या लांब मुळीच नाही हं...का छळतोस?.."
 
"लांब? दिवसभर सोबत नसतेस तेव्हा लांब असतेस वाटतं..?"
 
तो एक मिश्किल हसू फेकत म्हणाला आणि ती लाजेने चूर झाली. जाऊन पल्याड जाऊन पाण्यात पाय सोडून बसली.
 
"हं.. बोल आता"
 
पण तो शांत बसला होता...ध्यानस्थ...स्थिरचित्त .. अविचलीत..आत्ममग्न...
 
एकाच प्रेमबंधनात राहून हा इतका कसा स्वस्थ, शांत कसा राहू शकतो..?.तिला परत एकदा नव्याने वाटून गेलं...
त्याने त्याच्या पाव्याला ओठ लावले होते.
 
तिला क्षणभर त्या 'सानिका' चा प्रचंड हेवा वाटला... वाटलं असेच एकादाच आपल्यातही प्राण फुंकून टाकून हा मुक्त का करत नाही आपल्याला...?
रोज एक अस्वस्थ, कासावीस तहान होऊन जगतो आपण...
 
पण त्याने सूर लावला होता आणि तो अलगद तिच्या मनाला भिडला तशी ती मंत्रमुग्ध झाली..
आणि सूर वाहत राहिले तिच्या अवतीभोवती ...तिच्या अंगाशी खेळत... तिला सुखतीशयाने फुटून जाणार असं वाटू लागले.
 
कळू लागली तिला ही शब्दांपलीकडची सूरभाषा...
 
"अजून पूर्णत्वाने नाही आलीस इथं तू..."
 
"....कशी येणार ..?वर्तमानाचं भान कसं सोडणार..?."
 
"मोकळा कर तुझा तो केशसंभार ज्यात तू कितीतरी बंधने माळून आली आहेस..."
 
"असे कसे करणार अरे..मी परत कशी जाणार मग?"
 
"मी जाऊच देणार नाहीये तुला परत..."
 
त्या लडिवाळ प्रेमाने ती तृप्त हसली...
 
बासरीचे सूर अलगद तिच्या एक एक बटा सोडवत केशसंभार पाठीवर पसरवू लागले. आणि प्रत्येक बटे सरशी ती मुक्त होऊ लागली...नदीकाठचा वारा तिच्या केसातून वाहून तिची गात्रे शांत करू लागला..
 
उगवतीला नुकतंच तांबडं फुटू लागलं होतं... यमुनेच्या श्यामवेल्हाळ जलात तिचं अस्पष्ट प्रतिबिंब तिला हिंदकळताना दिसू लागलं....
 
"मी एवढी सुंदर दिसू शकते..?"
तिचा तिच्यावर विश्वास बसेना..
 
"तुझ्या माझ्याठायी रत असलेल्या आत्म्याची प्रचिती नाकारू नकोस वेडे... मला तू नेहेमीच अशी दिसतेस.."
 
"नेहेमी? कित्ती खोटं ....तुला मी एरवी आठवते तरी का?"
 
लटक्या रागाने ती म्हणाली,
 
"कुठूनही उगम नसताना अचानक वाऱ्याची झुळूक कुठून येते ...?
गंधभरल्या फुलांची ओंजळ हुंगुन जेव्हा हृदयाशी धरतेस तेव्हा तुझ्यासाठी ते स्वत्व इतक्या नितळपणे तुला कोणी पाठवलेलं असतं..?
रात्रीच्या निरव प्रहरी अलगद जाग येते तुला आणि आधाराला शोधतेस तो शाश्वत श्वास घेऊन कोण उतरतं तुझ्या मानत...?
मी सोबत नसतानाही तुझ्या इवल्या हृदयाची धडधड कोण शांतावतं.. ?
तुझ्या अवघ्या अस्तित्वाला कोण वाहतं ठेवतं?"
 
"तुझेच कुटील प्रश्न अन तुझीच लोभस उत्तरे ..."
 
बासरी आता समेला पोहोचली होती. मंतरलेल्या मुग्ध स्वरात आता ती विरघळून जाऊ लागली होती.
 
तिचे अणुरेणू तिच्याच नकळत विरळ होऊ लागले...
पायाशी असलेल्या यमुनेच्या पाण्यात मिसळून जलमय झाले...
नदीकाठच्या मऊ मृत्तिकेत तिचे काही कण अलगद मिसळून गेले...
भवताल वाऱ्यात उधळून जात 'ती' अवकाश झाली..
सगळ्या मर्यादा, बंधने , सुख , दुःख मागे सोडत आनंद विभोर झाली..
 
कुठे राहिली ती तिची, त्याची किव्हा कोणाचीच?
 
आणि या सर्वाचा कर्ता 'तो' मात्र सवयीने अंतर्धान पावला ...
 
इकडे गावात आवई उठली ...भल्यापाहटे 'ती' नाहीशी झाली...काठावर फक्त तिची वस्त्र आणि आभूषणे मिळाली....
 
आणि एक कथा...
 
काही 'ती' ना मात्र गूढ वाटत नसलेली..
त्यांचे केशसंभार सुटून मुक्त करू पाहणारी...

Friday, 12 July 2019

वेळभान आणि सजग-मिती


आमच्या घरातले सकाळचे रोजचे चित्र! रोज माझी कट्ट्याशी पोळी करायला उभी असण्याची आणि आमच्या बाईंची फरशी पुसायची वेळ एकच येते. प्रत्येक वेळी तिच्या कामात व्यत्यय येऊन तिचा वेळ आणि मुख्य म्हणजे कामाचा tempo मोडणार नाही याची काळजी घेत मी बाजूला होते किव्हा कधी पोळी तव्यावर असेल तर त्यांना 'थांबा हं २ min एवढी पोळी उतरवून बाजूला होते.' असे आवर्जून सांगते. त्या पण तसेच थोडेसे इकडचे तिकडचे पुसून घेत नेहेमीच adjust करतात जेणेकरून आम्ही दोघीही आपापल्या कामाचा tempo राखतो.
म्हटला तर साधासाच रोजचा प्रसंग, पण आज त्या स्वतःहून म्हणाल्या "अहो २च पोळ्या राहिल्या होत्याना . होऊ द्यायच्या होत्या मी थांबले असते की! "
त्यावर मी त्यांना म्हटले "अहो ही २ mins पण खूप महत्वाची असतात तुमची ते माहिती आहे मला. खूप काम असते ना तुम्हाला."
"हो ना रोज २-२:३० होतात घरी जायला. पण तुम्ही ताई मला कधीच थांबवत नाही." असे म्हणत त्या छान हसल्या.
आपल्या वेळेचा समोरच्याकडून होणारा आदर नेहेमीच मनाला सुखावतो आणि मग समोरची व्यक्तीही तुमचा वेळ आणि मन जपायचा तितकाच प्रामाणिकपणे प्रयत्न करते. व्यक्ती कितीही छोटी किव्हा मोठी असो तिला दिवसातले मोजून २४ तासच मिळत असतात आणि करत असलेले काम हातावेगळे करून मग थोडेसे का होईना विसावू असा प्रत्येकजण विचार करत असतो. म्हणून जेव्हा समोरच्याच्या कामात खारीचा वाटा किव्हा निव्वळ आपल्याशी निगडित असलेला वेळ कमी करण्यात जरी आपण थोडीफार मदत करू शकलो किव्हा तसे करण्याची भावना जरी प्रामाणिकपणे पोहोचवू शकलो तरी तो त्यांच्या मनाचा विसावा होतो. आपल्या थोड्याश्या जागरूकतेने आणि समोरच्याविषयीच्या आत्मीयतेच्या भावनेने असे किती तरी क्षण आपण सुखाचे करू शकतो. कारण मग वेळेची जपणूक फक्त वेळेचीच न राहता त्या त्या वेळी होणाऱ्या संवादातून होणाऱ्या भावनिक देवाणघेवणीची असते ही होत असते.
मी कंपनीत काम करायचे तेव्हा card recorders लागण्याआधी , gate वर I-Cards चे check up ही अगदी नित्याचीच बाब असायची ! पण काही जण मात्र इथून रोजच जातॊ तरी रोजच काय check करायचे असते असा तक्रारवजा नाराजीचा स्वर लावत, कधी gate शी थांबून मग guards नी विचारल्यावर मग बॅगेतून शोधून मग ते गळ्यात अडकवणार, मग त्याबरोबरीने स्वतःच्या आणि पर्यायाने security guard च्या दिवसाची सुरवात खराब करणार.
मी आवर्जून bus companyच्या जवळ आल्यावर आधीच card गळ्यात घालायचे . मग जेव्हा कार्ड तपासणीचा प्रसंग यायचा तेव्हा की स्वतःहून कार्ड पुढे करून मग बॅग उघडून दाखवायचे . ते checking चे अर्धे मिनिटे मग छान हसत खेळत संभाषण व्व्हायचे. काही दिवसांनी त्या सगळ्या माझ्या मैत्रिणीच होऊन गेल्या. खूप ओळखीचे झाले तरी card बघणे आणि चेहेरा न्याहाळणे हे सर्व त्यांच्या जोखमीच्या जॉब साठी आवश्यक असलेली प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून त्यांच्याकडून घडायचेच ! पण रोजच्या त्यांच्या सवयीच्या असलेल्या कामात मी माझाकडून थोडा स्वतःहून कार्ड दाखवण्याचा , बॅग उघडण्याचा हातभार लावताना , त्या संभाषणात शब्दांपलीकडचे 'We care for each other's time' असे जे काही exchange व्हयायचे जे मला महत्वाचे वाटायचे. कधी तरी मला call ला पळायचे चे असायचे तेव्हाचे नुसते हसूही मग माझ्या दिवसाची सुरुवात सुंदर करायचे.
Canteen मध्येही कॅश कॉउंटरवरचे लोक एरवीच खूप fast काम करतात पण काही लोक मोठी रांग असतानाही कॉउंटरशी पोहोचल्यावर मग आरामात मेनू पाहत मग पाकीट काढून मग पैसे काढतात. रांगेत उभे असतानाच एक नजर मेनूवर टाकून आपल्याकडे नेमके सुट्टे पैसे आहेत किंवा बंदे रुपये आहेत याचा अंदाज घेत कॉउंटरवर थेट व्यवहार केला तर counter वरच्या माणसाचे २ क्षण आपण विसाव्याचे करू करू शकतो ना. कोणी म्हणेल ते त्यांचे कामच असते आणि अश्याने असा कितीसा वेळ rather अश्या seconds च्या वाचवण्याने नेमके काय होणार आहे. पण मला वाटते माणसाला नेहेमीच हा काही सेकंदांचा का होईना 'Me Time' हवा असतो. आणि कोणीतरी आपले काम सुसह्य करण्यासाठी छोटासा का होईना प्रयत्न करते आहे ही भावनाही सुखावह!
एकदा माझी आतेभावाची बायको वैशालीवहिनी पहिल्यांदाच घरी आली होती, टेबलाशी बसत आईशी गप्पा मारत तिने सहज भांड्यात ठेवलेल्या मटारच्या शेंगा सोलायला सुरुवात केली.
आईने "अग हे काय पहिल्यांदाच आली आहेस आणि काम कसले करतेस?" असे म्हणताच सहज म्हणाली
"अहो फार काही नाही करत आहे मी . आणि गप्पा मारताना होऊनही जाईल. तेवढीच जरा ५ मिनिटे तुम्हाला मोकळीक."
तेव्हाही कामापेक्षा कोणीतरी आपला विचार करते आहे, माझ्या वेळेचा विचार करते आहे ही भावना आईला नक्कीच सुखावली असेल आणि वैशालीवहिनी हे विसरूनही गेली असेल पण या साध्याशाच वागण्यातून प्रतीत होणारा समोरच्याविषयीचा जिव्हाळा हा एक गोड आठवण म्हणून आम्हा सर्वांच्याच लक्षात राहिला.
एरवी आपण आपल्याच विश्वात रममाण असतो आणि आजकाल तर watsapp आणि facebook सारख्या आभासी जगात वेळेचे भान आपण खरोखरीचेच हरवून आहोत असे वाटते. एक आयुष्य आणि त्यातला एक एक क्षण किती खास आहे ही जाणीव हरवत चालली आहे. वेळ सरणे आणि वेळ सारणे यातला फरकच आपल्याला कळेनासा झाला आहे. मान्य आहे, रोजच्या एक मिनिटही इकडे तिकडे हलवू न शकण्याच्या गच्च routine ने भरलेल्या दिवसात आपणच आपले विसाव्याचे क्षण शोधत राहतो पण हा विसावा म्हणजे क्षणभराचा न होता आपण त्यातच हरवून जातो आणि मग वेळच नाही असा बाऊ करत राहतो .
मध्यंतरी एक छोटासा लेख वाचनात आला . त्यात एक प्रसंग सांगितलेला होता . एक आजोबा बऱ्याच वेळ एक चेक हातात घेऊन एका रांगेत उभे होते. आणि कॉउंटरशी गेल्यावर काउंटरपलीकडील माणसाने त्यांच्या लक्ष्यात आणून दिले की तो चेक दुसऱ्या बँकेचा आहे. त्यांचा मोलाचा वेळ आणि रांगेत उभे राहण्याची शक्ती वाया गेली होती. पुढे मागे उभे असलेल्या एकाने तरी सहज लक्ष दिले असते तरी हे खरच टळण्यासारखे होते पण आजकाल वेळ मिळेल तेव्हा कुठेही असले तरी लोक खरच watsapp , facebook किव्हा game खेळू लागतात. यासर्वात आपण छोट्या गोष्टी हुकतो आहे ,आजूबाजूचे आत्मभानच हरवतो आहे असे नाही का वाटत?
आपल्या अस्तित्वाच्या त्रिमितीला वेळेचे चौथे परिमाण लावताना आजूबाजूच्या चाललेल्या गोष्टींमध्ये आपण नेमकी काय भूमिका बजावू शकतो याचे सजग भान आपल्याला यायला हवे , थोडासा स्वतःचा वेळ मोडून समोरच्याचे काही क्षण सुसह्य व्हावे यासाठी जाणीवपूर्वक कृती करण्याचा प्रयत्न मात्र करायला हवा. आणि मग असे कुठल्याही आभासी माध्यमांचे अंकित नसलेले मोकळे क्षण केवळ मनातच साठणाऱ्या आणि कधीही हाताशी लागणाऱ्या आठवणी बनून जातील.
मीपणाच्या कक्षा जराश्या रुंदावत कोणासाठीतरी वेचलेले काही साधेसेच क्षण तुमची स्वतःची ओंजळ नक्कीच आनंदाने भरतील!

#मेधालाडदेशपांडे
#TimeisMuchMoreThanMoney
#मीपणाच्याकक्षा

आपला माणूस आणि रोजच्या जगण्यातली प्रेरणा

एकुणातच यंदाची निवडणूक , त्याची प्रचार भाषणे , exit polls आणि आजचा निर्णायक दिवस या सर्वाचाच मिळून गेले २-३ महिने एक जल्लोषाचा माहौल बनून राहिलेला आहे. राजकारणाशी रोजचा संबंध नसलेला सामान्य माणूसही ही आपलीच लढाई असल्यासारखा जिकंण्याचा उत्साह अनुभवतो आहे. हा विजय त्याला आपला वाटतो आहे.
आपल्यासाठी कोणीतरी चांगला विचार करतो आहे , त्यासाठी विविध योजना त्याने खूप साऱ्या अडथळ्यांच्या शर्यती पार करत अमलात आणल्या आहेत. भलेही त्यातल्या काहींची आत्त्ता सुरुवात आहे , त्याची फळे चाखायची आहेत पण कोणीतरी स्वार्थापुढे राष्ट्रहिताच्या विचार मोठा ठरवत आपला विचार करतो आहे हेही त्याच्यासाठी खूप महत्वाचे आहे. स्वतःच्या सय्यमशील , अनुकरणीय वर्तनाने जणू त्याने 'राष्ट्रभक्ती' जनमानसात फुंकली आहे जेणेकरून आपापले काम नेटाने, प्रामाणिकपणे करण्याची प्रेरणा आज जागली आहे.
निवडणूक निर्णय अंतिम टप्प्यात असतानाही माध्यमे , आणि रस्त्या रस्त्यावर लोक हा उत्सव आधीच मनवत आहे. एवढे प्रेम आणि आपुलकी क्वचितच कोणा नेत्याला मिळाली असेल.
ही जादू घडवून आणणाऱ्या माननीय पंतप्रधान मोदी यांना मनःपूर्वक मानाचा मुजरा व हार्दिक अभिनंदन!🙏🙏🙏😇
सत्तेवर आल्यापासून पहिल्या दिवसापासून किम्बहुना त्याही आधी पासून समर्थकांच्या अपेक्षा , विरोधकांचा विरोध , दुर्बीण घेऊन त्यांच्या प्रत्येक कृतीची न्याहाळणी, तपासणी , आरोप , टीका यासर्वांना ते पुरून उरले आहे आणि तितक्याच ताकदीने चोख अंमलबजावणी करत प्रसंगी जनरोषाचा धोका पत्करत कितीतरी योजना राबवल्या आहेत. आणि म्हणून हा जल्लोष कोणीतरी 'आपला माणूस' जिंकल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. हा प्रत्येकाला भावनात्मक विजय वाटतो आहे.
एरवी मी राजकारण या प्रकारापासून चार हात लांब असते पण मोदीजींची भाषणे आणि मुलाखती आवर्जून बघते कारण त्यातून मला रोजच्या जगण्याला प्रेरणा देणारे खूप काही सापडले आहे. त्यातले काही आजच्या दिवसाचा जल्लोष म्हणून.
एका कुठल्याश्या लोकसंवादात एका कॉलेजातल्या तरुणाने मोदीजींना विचारले
"तुम्ही एवढे अथक काम करता. अजिबात सुट्टी घेत नाही. खूप सारा प्रवास करता. जाईल तिथल्या लोकांसोबत संवाद साधता. तुम्ही नेमके काय खाता आणि थकत कसे नाही?"
त्याचा हा निरागस प्रश्न ऐकून पूर्ण सभागृह हसले. मोदिजीही हसले आणि म्हणाले
"अरे मी एक नाही दोन नाही पाच पण नाही रोज लोकांच्या २० किलो शिव्या खातो."
असे म्हणताच सारे सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेले.
खरच चांगले काम करणाऱ्या या माणसाला रोजच कितीतरी आरोप , टीका , निंदा सहन करावी लागते. विरोधक विरोध करायचे थांबत नाही आणि हा माणूस त्य
गोष्टींना सकारात्मकपणे हाताळत आपले काम नेटाने करत करत राहतो.
कोणी त्यांना 'चौकीदार चोर है' म्हणत अवहेलना केली त्यांनी त्याचे 'मै भी चौकीदार' आंदोलन करून टाकले आणि देशभरात सर्वच जण चौकीदार बनून काम करू लागले.
कोणी त्यांना 'चायवाला' म्ह्णून हिणवले त्यांनी त्याची 'चाय पे चर्चा' सुरु करून टाकले.
कोणी त्यांचे स्वागत काळे झेंडे दाखवून केले त्याला त्यांनी 'नजर लागू नये म्हणून आईने लावलेला काळा टिका' करून टाकले.
कोणी म्हणाले 'Modi Go Back' त्यांनी 'मला पंतप्रधानपदासाठी परत जायला सांगताहेत' म्हणून टाकले.
एका मुलाखतीत त्यांना विचारले "आम्हा सामान्य माणसांना काम करून जेव्हा कोणी टीका करते तेव्हा खूप वाईट वाटते. तुम्ही ही दररोजची टीका कशी हाताळता"
त्याला त्यांनी दिलेले उत्तर रोजच्या आपल्या जीवनात आपण टीका कशी स्वीकारावी याचेच द्योतक आहे.
"एवढा मोठा देश आहे एवढे मोठे काम आहे तर टीका होणे खूप महत्वाचे आहे. कारण त्यातून कमतरता पुढे येतात त्यावर तुम्ही काम करून प्रगती करू शकता. खरे पहिले तर टीका खूपच कमी होते आहे. कारण आपल्या इथे टीका नाही आरोप होतात आणि विरोधासाठी विरोध होतो याचे दुःख आहे. टिकेकडे मी लक्ष देत नाही"
खरंच टीका आणि आरोप यांचे योग्य विश्लेषण करता आले की प्रगती ही किती ऑटोमॅटिक आहे नाही.
टिकेकडे लक्ष्य देत नाही हे म्हणणे सोपे आहे पण ते प्रत्यक्षात आणणे, गेल्या ५ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेता आणि तोच वेळ खरे काम करण्यात सत्कारणी लावणारा नेता म्हणून मोदीजी खरच अनुकरणीय आहेत.
'तुम्ही नेमके काय खाता आणि थकत कसे नाही?' या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी एक सुंदर रूपककथा सांगितली.
एकदा हिमालयात एका तळ्याकाठी एक संन्याशी तप करत बसलेले असतात. तिथल्याच एका छोट्या टेकडीवर त्यांना एका ८ वर्षांची मुलगी आपल्या ३ वर्षांच्या भावाला पाठीवरून घेऊन जाताना दिसली.
"बेटा तुला ओझे नाही होत आहे का ?"
ती हसत म्हणाली "हा तर माझा भाऊ आहे."
"बेटा मी तुला तो कोण आहे ते नाही विचारत नाहीये. तुला ओझे नाही होत आहे का "
ती परत हसत म्हणाली "स्वामीजी , हा तर माझा भाऊ आहे."
थोडेसे चिडून त्यांनी तिला परत विचारले "बेटा अग मी तुला केव्हापासून विचारतो आहे तुला त्याचे ओझे नाही होत आहे का ?"
ती खूपच हसायला आले "स्वामीजी , हा तर माझा भाऊ आहे. याचे ओझे मला कसे वाटेल?"
पूर्व देशाची विश्वासार्हता आपल्या पाठीवर वाहून नेऊन देशाला आशेचा नवा सूर्य दाखवणाऱ्या , त्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अहोरात्र अविरत कष्ट करणाऱ्या मोदीजींना पुढील कार्यकाळासाठी म नःपूर्वक शुभेच्छा व अभिष्टचिंतन!🙏🙏🙏
सर्व देशवासीयांचे प्रेम आणि पाठबळ असेच तुम्हाला कायम मिळत राहो!!🙏
- सौ. मेधा कौशल देशपांडे
#मेधालाडदेशपांडे #narendramodi #namonamaha

Wednesday, 8 August 2018

बोकोबा आणि लोणी

आज सकाळचीच गोष्ट. बरे नसले कि अभिनयासकट गोष्ट रंगवून सांगत खाऊ भरवावा लागतो तरच तो जातो.
आजी आणि आबा मिळून युगंधरला कृष्ण आणि दहीहंडीची गोष्ट सांगत होते. कंस कसा दुष्ट होता सगळे गोकुळातले दूध त्याच्याकडे मागवायचा आणि कधी घाबरून तर कधी चांगल्या मोबदल्यासाठी मग गोकुळातले लोकही आपल्या पोराबाळांना खाऊ-पिऊ न देता दूध-दुभते तिकडे पोहोचते करायचे. त्याच्या मित्रांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत होता. आणि हे अन्यायाचेही होते.
दही गुसळून केलेलं लोणी शिंकाळ्यावर काढून ठेवायचे. ते असे वर बांधलेले असायचे. गोष्ट जोरात सुरु होती.
"शिंकाळे म्हणजे काय?"
एवढ्यात जिया म्हणजे आजी काही कामासाठी दुसऱ्या खोलीत गेली. आणि
आबांनी 'शिंकाळे' या गोष्टीचे सगळे दाखले द्यायला सुरुवात केली.
म्हणजे
"अरे ते नाही का तू खूप मस्ती करतोस तेव्हा बाबा म्हणतो ना 'शिंकाळ्यावर टांगून ठेवीन'. आणि अरे ती म्हण आहे ना 'बोकोबाची नजर शिंकाळ्यावरच्या लोण्यावर'. म्हणजे अरे बोकोबा असतो ना त्याचे घरात सगळीकडे लक्ष असते. लोणी करताना तो बघतो आणि मग वाट बघत असतो कि कधी मला त्यावर ताव मारता येईल."
यांचे हे 'शिंकाळा' पुराण संपता संपता आजी आली आतून आणि मग कृष्ण आणि त्याचे साथीदार यांच्या गप्पा गोष्टी परत चालू झाल्या.
" तर अरे कृष्ण म्हणजे गोकुळचा राजाच. त्याच्याकडे दुधातुपाला काही कमी नव्हती. पण आपल्या सवंगड्याना ते मिळावे म्हणून मात्र तो त्यांच्या घरी जाऊन कोणी घरी नाहीसे पाहून चोरी करत असे. म्हणजे काय असे खाली ४-५ जणांनी उभे राहायचे त्यावर अजून थोडे मग त्यांच्या खांद्यावर अजून काही मुलं असा पिरॅमिड करायचे आणि सरते शेवटी कृष्ण वर चढून ते लोण्याचे मडके खाली आणायचा आणि मग आपल्या सर्व मित्रांना आपल्या हातानं प्रेमाने यथेच्छ खाऊ घालायचा. "
"आणि मग त्या बोक्याला दिल कि नाही."
"ऑ , कुठल्या बोक्याला ?" आजी बुचकळ्यातच पडली.
मग आबांनी त्याला ती म्हण आत्ताच सांगितल्याचे सांगितले आणि आम्ही सर्व हास्य कल्लोळात बुडून गेलो.
किती निरागस असते चिमुकल्यांचे भावविश्व. खूप सगळ्या गोष्टी त्यात सहज सांधलेल्या असतात. आपल्या वाटते ही कुठली लिंक कुठे आली पण प्रत्येकच गोष्टीमागचे त्यांचे विचार सुसंगत असतात आणि त्यांना त्यांची त्यांची यथायोग्य कारणंही असतात.
युगंधरच्या जन्माच्या आधीचे माझे आणि कौशलचे फोटो कधी पहिले तर जरा रागच यायचा युगंधरला. 'तू तेव्हा नव्हतास' असले सत्य तर अजिबात आवडायचे नाही. 'जवळच खेळत असशील' असे सांगणेही पटायचे नाही.
"मग तुम्ही मला न बोलावता आपला आपला फोटो काढलात ना" असले गम्मत आणि ज्याचे तुम्ही काही केल्या सांत्वनच करू शकत नाही असे भांडण सुरु व्हायचे.
मग मीही फार फाटे न फोडता 'अरे तू आहेस फोटोत पण माझ्या पोटात आहेस' असे सांगायला सुरुवात केली. आणि पोटात का होईना पण आपण आहोत फोटोत असल्या गमतीशीर समाधानात पुढे पुढे असले प्रश्न बंद झाले.
मग एकदा आईच्या घरी कुठलेसे फोटो बघत होतो. एका फोटोत मी, कौशल , युगंधर, माझी आई , भाऊ आणि वहिनी होते.
कोणीतरी म्हणाले
"अरेच्या यात पुणे आबा (माझे बाबा) नाहीयेत वाटत. "
क्षणार्धात युगंधर म्हणला
" फोटोत दिसत नाहीयेत पण पुणे आबा माझ्या पोटात असणार."
आम्हाला सर्वांना हसून हसून वेड लागायचे फक्त बाकी राहिले होते.
माझे बालपण 'दापोली' या सुंदर गावात गेले. कौलारू घर, आजूबाजू पेरू, चिंच , आंबा , डाळींब , चिकू, केली याची भरगच्च झाडे. विहीर आणि त्याच्या भोवतीच्या गमती. पाठचे शेत. एकीकडे मलये आजी आजी तर दुसरीकडे बर्वे आजी अशी प्रेमळ उब. अशा सगळ्या आठवणी कधी गोष्टी म्हणून तर कधी गम्मत म्हणून युगंधरला मी नेहेमी सांगत असते. तो हि आईचे 'बालपण' कसे असेल याचे चित्र रंगवून पुन्हा पुन्हा सांग असे सांगत राहतो.
मग कधी माकडाची टोळी यायची आणि मग मी आणि पियुष (माझा भाऊ ) कसे डबे वाजवत त्यांना पळवून लावायचो हे सांगताना प्रश्न आला.
"मग मी कुठे होतो तेव्हा?"
"अरे माझ्या लहापणी तू नव्हतास ना मीच लहान होते तर."
"अग म्हणजे दापोलीत नसेन पण कुठेतरी असेनच की" ( तू नव्हतास हे उत्तर अजिबात आवडले नव्हते.)
"अरे मग तुला पण घेतो आमच्या team मध्ये. तू, मी आणि पियुषमामा तिघे जण डबे वाजवायचो." काय कळी खुलली होती विचारात सोय नाही. पियुषला पण बजावून ठेवले होते थोडे दिवस लहानपणचे काहीही निघाले कि त्यात युगंधरला घेऊन सांगायचे.
मग २ वर्षांपूर्वी दापोलीला जायचा प्रसंग आला. युगंधरला घेऊन पहिल्यांदाच जाणार होतो. फोनवर 'हॉटेल बुकिंग झालेय' असे काहीसे बोलताना त्याने ऐकले.
फोन संपल्यावर म्हणाला,
"अग तुम्ही दापोलीला हॉटेलमध्ये राहायचात का?"
" नाही रे का ?"
" मग आपण उद्या तुझ्या मलये आजीच्या शेजारच्या त्या घरी राहायला जाणार आहोत ना ते घर नाही हॉटेल आहे का? तुझे मलये आजी, बर्वे आजी, पेरूच्या झाडावरची माकडे सगळे भेटतील ना मला. "
मला २ मिनिट खूप गलबलूनच आल. त्याने आता आपण दापोलीला गेल्यावर आईने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करायच्या, ते सगळे लोक त्याला भेटतील अशी काय काय स्वप्ने रंगवली होती.
काळाच्या ओघात खूप सारे बदलतच जाते. माणसे , नाती, घर , परिसर सगळंच. त्यांना तस बदलणं प्राप्तच असत. पण आपल्या मनातलं नेमकं काय जपायला हवे ते आपणच ठरवायला हवे ना. दापोली भेटीत घराकडे चक्कर मारलीच नाही. युगंधरच्या भावविश्वातले आणि माझ्या आठवणीतले मला काहीच तसूभर सुद्धा हलू द्यायचं नव्हतं... आणि आताही आमची कृष्णाची प्रत्येक गोष्ट 'बोकोबाला' घेऊन असणार आहे बर का...

Friday, 18 May 2018

बियांचे ओटीभरण

' एका हाताने नांगरताना 'ती' धान्य ओटीतून धरणीच्या पोटात पेरत जाते
आणि तेच  'धान्य ' शतपटीने वृद्धिंगत होत 'तिच्या'कडे परत येते. 
या देवघेवीचे प्रतीक म्ह्णून प्रत्येक स्त्रीची  ओटी भरण्याची पद्दत रूढ झाली असावी . जेणेकरून तितक्या मोठ्या प्रमाणात धान्य तिच्या ओटीत घालून तिचा सन्मान करावा आणि तिने ते 'सृजन समृद्धीसाठी'जमिनीकडे वाहते करावे.'

या उन्हाळ्याच्या सुट्टीत
थोडीशी या सन्मानाची जाणीव म्ह्णून ,
तप्त काहिलीसाठी हतबल चर्चा सोडून करावयाचा एक ठोस उपाय म्हणून
आपल्या चिमुरड्यांसाठी 'सृजन' संस्कारचा भाग म्हणून
'एक बी म्हणजे एक जीवन' या तत्वाशी सांगड घालत ..
आपल्या काळ्या आईची ओटी बियांनी भरुयात का ?

ऊन वाढतंय तसे watsapp आणि सर्वत्रच फळे,  भाज्या यांच्या बिया साठवून पावसात त्या रस्त्याच्या कडेला / दरीत टाकून देण्याविषयीच्या posts येत आहेत.
तोच  धागा पुढे  घेत आपण हे काम  'मिळून साऱ्याजणी ' करूयात का ?
म्हणजे आपण सर्वजणी उन्हाळाभर या वेगळ्या बिया वर्गीकरण करत साठवू. जूनच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा शाळा सुरु होईल आणि पावसाच्या पहिल्या सरी सुरु होतील तेव्हा या बिया एकत्र जमवू. मग ज्या प्रकारच्या बिया जमल्या असतील त्याप्रमाणे पोहोचवू. म्हणजे भोपळा, कलिंगड  इ. बिया कोणाच्या शेतात पोहोचवू . जांभूळ, पपई थोडे कुठल्याश्या डोंगेरावर /रिकाम्या जागी लावू. खरेतर हे सर्व करण्यासाठी आपण साऱ्या मैत्रिणींची मिळून 'वर्षा सहलच' काढूयात की! जमलेल्या बियांचे शेवटी कसे नियोजन करायचे यासाठी ज्यांना यातली माहिती आहे त्यांनी कृपया माहिती सांगावी. 
या सर्व कामाला सर्वांच्या एकत्र प्रयत्नांची जोग मिळाली तर पर्यावरणाच्या (खरेतर आपल्याच मदतीचा) एक सुंदर प्रकल्प आपण करू शकतो.
कारण रस्त्यावर/ दरीत  टाकलेल्या  बीया काही वेळा सुकून जातात , काही वेळा रुजतात आणि एकदा त्या आपण टाकून दिल्या कि परत जाऊन पाहणे किव्हा त्याची काळजी घेणे हे आपल्या कडून घडत नाही. त्यामुळे त्या बिया कोणातरी काळजी घेणाऱ्या , यथायोग्य जोपासना करणाऱ्याच्या हातात पोहोचवणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे असे मला वाटते.

तर मग काय म्हणताय 'मिळून साऱ्याजणी' करूयात ना आपल्या 'मायमातीचे ओटीभरण'?

इSSSथे.....


युगंधरची शाळा 'ज्ञानप्रबोधिनी'चे वैशिष्टय आहे. मुलाच्या शाळेच्या भावविश्वात ते पालकांना इतके सहज सामावून घेतात की मग पालकांना ती आपलीच शाळा वाटू लागते. त्यांच्या शाळेतल्या छोट्या छोट्या उपक्रमात ते म्हणायला 'पालकांची मदत' असा उल्लेख करतात पण असा प्रत्येकच अनुभव एकुणातच 'व्यक्ती' म्हणून तुम्हाला समृद्ध करणारा असतो. लहान मुलांच्या निरागस जगात जिथे ती मनमोकळी होतात, नव्याने काही शिकत असतात, एकमेकांशी असलेले निरागस मैत्र जुळवत असतात, एकत्र गंमत गाणी म्हणत रमलेली असतात त्यामध्ये डोकावणे हा रोजच्या routinue मधला 'अमृतानुभव' असतो. तुम्हाला नकळत असे काही सापडून जाते की रोजच्या निरस चाललेल्या प्रवाहातून तुम्ही भानावर येता. आणि म्हणूनच शाळा आम्हाला कधी 'हाक' मारते याची आम्ही सर्वच पालक वाट बघत असतो. त्यातलाच हा एक गंमत अनुभव!
परवा खेळगटाची म्हणजे शाळेची सर्वात छोटीशी 'शेंडेफळे' यांच्या सहलीसोबत जाण्याचा योग आला. ठिकाण होते चिंचवडमधले 'मोरया गोसावी मंदिर' आणि त्याच्या शेजारची प्राण्यांची शिल्पे असलेली बाग! तर तिथे आम्ही पोहोचलो. देवाचे दर्शन घेऊन एके ठिकाणी वृषालीताई सर्व मुलांना घेऊन बसल्या आणि गप्पा गोष्टी सुरु झाल्या.
"चला सांगा आपण कुठल्या मंदिरात आलो आहोत?"
"मोरया गोसावीsssss !" सगळी मुले एकसाथ म्हणाली.
"मंदिर कुठे आहे?"
काही जण 'चिंचवड' असे म्हणाली पण खूप सारी मुले म्हणाली,
"इSSSथे....."
आम्हाला सर्वांना त्यांच्या या 'निरागस' उत्तराची खूपच गंमत वाटली. मग ताईंनी त्यांना आपण चिंचवडला आलो आहोत आणि इतर माहिती सांगितली
हीच गोष्ट आज गंमत म्हणून युगंधरला सांगत होते. बालवर्गात गेल्यापासून आणि आपण शाळेतला 'दादा' वर्ग आहोत हे कळल्यापासून अश्या 'छोट्याश्या' मुलांच्या गंमती ऐकण्यात स्वारीला भारी interest असतो.
"अरे माहितिये का काल खेळगटाच्या सहलीला काय गंमत झाली?"
"गंमत म्हणजे joke झाला का काही?"
"हो jokeच झाला रे.. "
मग मी सगळे सांगताना त्यालाच प्रश्न विचारला
"आणि मग ताईनी विचारले 'मंदिर कुठे आहे' तर काय म्हणाली माहितीये का छोटीशी मुले?" (असल्या गमती सांगताना सारखी ती 'छोटीशी' आहेत असे म्हणावे लागते.)🙃
" 'इथे' असे म्हणाली असतील की"
"अरे तुला माहितीये ना 'मोरया गोसावी मंदिर' कुठे आहे?"
"हो माहितीये की 'चिंचवड' मध्ये आहे. पण ती तिथेच असताना असे कशाला म्हणतील ते ? ते तर 'इथे' असंच म्हणतील ना?"
"हो खरचं की रे!" असे मी म्हटले आणि माझा चेहरा काहीतरी ठाव घेते आहे पण उमगत नाहीये असा गमतीशीर झाला असावा कारण 'एवढं कसं बर नाही कळत हिला' असा मिश्किल चेहरा करत तो खेळायलाही गेला.
मी मात्र खरच विचार करत राहिले, जिथे असेल तिथे प्रत्येक ठिकाणी 'इथेच' असणे कधी बरं निसटले असेल आपल्याकडून!
आजचा दिवस मावळताना उद्याच्या चिंता आणि दिवस सुरू होताना कालचे ओझे घेऊन का बरे फिरतो आहोत आपण?
खूपच क्वचित वेळी आपण मनाने त्या त्या ठिकाणी उपस्थित असतो.
आणि आजकाल तर प्रत्येक क्षण आपण मोबाईल कॅमेराच्या नजरेनेच बघतो की काय असे वाटावे असे Selife चे वेड आहे आजूबाजू! आणि आहे हा क्षण आहे तसा 'जगून' त्याची मजा चाखण्यापेक्षा तो क्षण watsapp वर , FB वर टाकून बाकी सर्वांना त्या क्षणात खेचण्याची केविलवाणी धडपड करतो का आपण? खूप सारी क्षणचित्रे नुसती साठवतच राहिलो आहोत का आपण आणि खरे जगणे जरा बाजूलाच राहते आहे की काय?
म्हणूनच भानावर आणणारा 'छोट्याश्या' गोड मुलांचा आवाज जरा मी जपूनच ठेवलाय मनात!
उद्याच्या किव्हा कालच्या कुठल्याही गोष्टींचा बागुलबुवा माझ्या 'आज' आणि 'आत्ता' वर संक्रमण करू लागला तर हलवेन स्वतःला आणि हळूच सांगेन ,'अगं, इsssथे'!😊

एका वेणीची गोष्ट


सुमारे दोन वर्षांपूर्वी माझी college मधली कॅनडाला स्थाईक झालेली मैत्रीण प्रिया हिच्या फेसबुक भिंतीवर तिची मुलगी Melanie हिची cancer patients साठी hair donate केल्याची तिच्या फोटोसकटची post झळकली. अवघ्या १२ -१३ वर्षाच्या या गोड चिमुरडीचे हे पाऊल मला खूप भावुक करून गेले. तिने चक्क डोक्याचे पूर्ण मुंडण करून donate केले होते. उमलत्या वयातल्या मुली एकूणच आपल्या दिसण्याविषयी कित्ती जागरूक असतात आणि म्हणूनच तिचे हे धाडस मला खूप कौतुकाचे वाटले.
नुकत्याच कर्करोगाने गमावलेली माझी जवळची शोभाआत्या आणि सुंदर मैत्र जुळत असतानाच निघून गेलेली माझी नणंद मानसी यांचे दुःख मनात ताजे होते. शारीरिक किव्हा भावनिक यातना असले काहीच तुम्ही share करू शकत नाही याचे हताश ओझे मनात होते. दोघीनीही आजाराचा, आपल्या दुखण्याचा बाऊ न करता सारे हसत निभावले , आपले दुःख कोणाला कळू न दिले नाही की नियतीनेही क्षणभर नतमस्तक व्हावे. शेवटपर्यंत सर्वांना आनंदच दिला आणि सारे स्वतः सोसत राहिल्या. पण दोघींच्याही आजारात केमोमुळे गमावलेले केस ही एकच गोष्ट होती की ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर थोडेसे दुखावलेपण मी पाहिले होते. केस ही कोणाच्याही दिसण्याचा आणि प्रतिमेचा अविभाज्य भाग असतो. म्हणूनच ठरवले एका तरी व्यक्तीच्या हसण्यामध्ये माझ्या केसांचा वाटा असेल असे काही शक्य आहे का आपल्याला? अगदी सरसकट सगळे केस नाही जमणार पण जेवढे शक्य तेवढे केस वाढवून करूया की donate. आणि या एका सदीच्छेने मी केस वाढवू लागले.
संकल्पाला पाठबळ मिळावे आणि डगमगू नये म्हणून घरात संकल्प सांगितला. तर सर्वच बाबतीत आधार असलेल्या माझ्या सासूबाईनीही माझ्या सोबत 'एक वेणी' दान करायचा संकल्प सोडला आणि संकल्पाला दुप्पट जोम आला. पण गम्मत म्हणजे लहानपणापासून माझे केस ही माझी 'खाजगी मालमत्ता' नव्हतीच मुळी. त्यामध्ये माझ्या मैत्रिणी, बहिणी , नातेवाईक यासर्वांचीच प्रेमाची गुंतवणूक आणि जपणूक आहे. त्यामुळे त्यासर्व लोकांच्या उल्लेखाशिवाय हे दान पूर्ण होऊ शकत नाही. त्याचीच ही 'एका वेणीची गोष्ट'!
माझी सांगलीची आज्जी म्हणजे आईची आई मूळची गोव्याची होती आणि शेवटपर्यंत गोवा मनात जपून होती. गोव्याचे घरच्या माडांच्या नारळाचे शुद्ध खोबरेल तेल आणि त्या तेलाच्या वापरामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते अशी तिची श्रद्धा होती. तीचे केसही शेवटपर्यंत कंबरेएवढे लांब होते. तीच वंश परंपरा actually केश-परंपरा माझी आई आणि माझ्यापर्यंत आली आहे याबद्दल तिला खूप आत्मीयता होती. माझ्या आईचे केस अजूनही गुढघ्याएवढे लांबीचे आहेत. आईचे केस सरळ असल्यामुळे तिला ते छान सांभाळता येतात. पण माझे केस थोडे कुरळे ,थोडे सरळ आणि मुळात दाट असल्याने आणि त्यात लहानपणी दापोलीसारख्या लाल मातीच्या गावात राहत असल्याने १-२ वेणीचे पेड यापलीकडे ते वाढवण्याची हौस काही करता यायची नाही. दर सुट्टीत मामाच्या घरी गेल्या गेल्या आजीचे लक्ष्य माझ्या केसांकडे असायचे आणि तेवढेच किव्हा जरा कमीच झालेले केस बघून 'तुम्ही आजकालची मुले तुम्हाला तेल लावायला नको. असंच अन तसच..' गाडी केसांवरून घसरून कुठे कुठे पोहोचायची. पण आहे तेवढया केसांचे सुट्टीभर तेलमाखन लाड व्हायचे. रोज दूपारच्या झोपेनंतर घरा बाहेरच्या ओट्यावर बसून तेल चोपाचोपी आणि घट्ट वेणी असा साग्रसंगीत कार्यक्रम असायचा. त्या वेण्या इतक्या घट्ट घातलेल्या असायच्या की त्या नंतर खेळणे , दंगामस्ती , रात्री झोप या सर्व प्रकारा नंतरही त्या तसूभरही खरेतर केसभरही हललेल्या नसायच्या . असले अजब कसब फक्त माझ्या आजीच्या प्रेमळ हातातच होते .
शाळा संपली आणि ११-१२ आत्याकडे पुण्याला राहायला आले. अभ्यासाच्या ओझ्यामध्ये आता अजून केसांचे ओझे नको असे सर्वानुमते ठरले मग रडत रडत short bobcut करून टाकला. आणि मग जरा वर्षभर आजीची भेट एकदा दोनदाच झाली आणि थोड्याश्या ओरड्यावरच थोडक्यात निभावले. नव्या style ला नव्या मैत्रिणींकडून compliments मिळाल्यावर जरा जीव भांड्यात पडला.पण तिथल्या माझ्या मत्रिणी अँन आणि प्रफुल्लता यांचे छान कंबरेएवढे लांब केस होते. त्यांच्या नादाने परत केस वाढवायला लागले.
मग engineering च्या पहिल्या वर्षाच्या शेवट पर्यंत परत एक दोन वेणीचे पेड पर्यंत मजल गेली. आणि मग एके दिवशी building मधल्या एका मैत्रिणी सोबत parlour मध्ये तिचे केस कापायला गेलो आणि मलाच blunt cut कसा छान दिसेल असे अशा स्तुतीला भुलून परत एकदा केसांची मस्त वाट लावून घेतली. पण यावेळी मात्र collegeच्या मित्रमैत्रिणींनी लांब केसच कसे छान दिसत होते हे अजिब्बात छान नाही दिसत आहे असे म्हणून आगीत (की डोक्यावर) तेल ओतले. मग मात्र कसलीही तमा न बाळगता केस महाशय भराभरा वाढू लागले. चक्क कंबरेपर्यंत पोहोचले. प्रत्येक सुट्टीत आजीला भेटून केस दाखवायची गंमत वाटू लागली. खालून just trim करतानाही जरा जास्तच कापले जाऊ नयेत म्हणून आईला घेऊन जायचे parlour मध्ये.
पण या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आईने खूप बजावूनही मी शिकले नाही ती म्हणजे स्वतःची वेणी स्वतः घालणे. काही केल्या मला स्वतःला मी घातलेली वेणी मुळी आवडायचीच नाही. त्यामुळे आईच वेणी घालायची किव्हा रोज हट्टाने मी तिच्याकडूनच वेणी घालून घ्यायचे.
मग job सुरू झाल्यावर पाहिले ४ महिने म्हैसूरमध्ये training होते. तिथेही माझ्या गोड मैत्रिणी अपर्णा आणि प्रगती यांनी माझ्या केसांचे खूप लाड केले.
रोजच्या अभ्यास आणि घाई गडबडीतही त्या न कंटाळता माझी वेणी घालून द्यायच्या. मग परत पुणे आणि मग आईच्या हाताची वेणी.
४-५ वर्ष ही केशसेवा मी हक्काने करून घेतली. म्हणजे मी स्वतः वेणी किव्हा काही इतर केसांचे करायचे खूप उद्योग करायचे पण काहीच पसंत न पडून आईच्या पुढ्यात रोज केस आणि कंगवा घेऊन यायचे मग आईकडून वेणी घालून घ्यायची. कधी सणानिमित्त जमलो कि माझ्या मामेबहिणी सुखदा आणि मुग्धा यांच्यासाठी नवनव्या hairstyles try करण्यासाठी मी हक्काची मॉडेल होते. मग शाळेतल्या मैत्रिणींच्या लग्नात प्रत्येक वेळी वाढणाऱ्या केसात माझ्या मैत्रिणींचाही जीव अडकू लागला. अश्या प्रकारे माझे केस म्हणजे सर्वांनी प्रेमाने सांभाळायची लाडकी पब्लिक प्रॉपर्टी झाले. मग प्रेमात पडल्यावर कौशलनेही लांब केस आवडत असल्याचा दुजोरा दिला. मग काय केसांना वाढत राहण्याचा प्रेमळ धाकच मिळाला की.
मग लग्नातही मोठ्ठे केस आणि त्याच्या hairstyles छान मिरवल्या मी. लग्न झाल्यावर मात्र नव्याने पडलेली घराची जबाबदारी आणि office मधले मानमोडू japanese project... ही तारेवरची कसरत करताना एरवी जणू शरीराचा एक अविभाज्य भाग किव्हा अवयवच झालेले केस सांभाळणे जरा डोइजडच व्हायला लागले. त्यात हिंजेवडीचे traffice, धूर! मग परत एकदा मनावर दगड ठेवून केस अर्धे केले. थोडी वर्षे जरा styles केल्या पण मग गोड बाळकोबांचे घरात आगमन झाले. Office, घर आणि माझे गोंडस बाळ!! परत केसांनी backseat घेतली. Stepcut आणि तत्सम नव्या outfit मध्ये मानेपर्यंत आपले हातपाय आवारत केस महाशय हू की चू न करता माझे busy bee routine सोपे करू लागले.
मग युगंधर अडीच वर्षांचा झाला आणि कौशलच्या project निमित्त london ला राहायचा योग आला. आणि तिकडच्या parlour मध्ये कोण बाई जाणार असे करत एक सात आठ महिने केस परत एक-पेड दोन -पेड वाढले. केस थोडेसे वाढले की वेणी घालून बघायची अशी का कोण जाणे हौस आहे मला. तशीच कधीतरी घातली असावी. एकदा खेळताना युगंधर येऊन म्हणाला 'त्यादिवशी ते केसांचे कसे केले ना तसे कर ना!' म्हणजे कसे? असे का? का तसे विचारत असता एक नवीनच गंमत कळली. 'अग ते नाही का असे मानेवर येते.... ते ओढायला मज्जा येते ते...'
केसांचा असाही उपयोग असतो हे फारच गमतीचे होते. मग युगंधरसाठी केस वाढवायचे असे ठरवले. मी infy मध्ये काम करत असताना माझी एक खूपच गोड PM होती माधुरी देवधर. 'आपल्या मुलाला साडीतली आई कशी असते ते कळावे म्हणून आठवडयातला एक दिवस छान साडी नेसून यायची. लगेच copy cat म्हणून मीपण तसेच करायचे ठरवले होते. पण मनातल्या मनात सुद्धा मी तो संकल्प पाळू शकले नव्हते त्याची खंत मनात होती. पण म्हटलं साडीतली आई जाऊदे आपण वेणीतली आई जरा try करूयात. आणि परत जोमाने मी केस वाढवायला लागले.
मग दोन वर्षांपूर्वी मला फेसबुकवर Melanie ची गोष्ट कळली आणि मी संकल्पाने केस वाढवू लागले.
आपले केस आता ही कोणा दुसऱ्याची आपल्याकडे असलेली ठेव आहे आणि तिची जपणूक करणे हे आपले कर्तव्य आहे अशी भावना असल्याने रोजच्या धावपाळीतही केसांची निगा राखण्याचे ओझे वाटेनासे झाले. गेल्या गणपतीपर्यंत छान कंबरेच्यावर पर्यंत वाढले. मग ठरवले की अजून एप्रिल मे पर्यंत जेवढे वाढतात तेवढे वाढवू आणि मग थांबू. पण मग नोव्हेंबर मध्ये अचानक कावीळ झाली आणि त्यामध्ये आलेल्या अशक्तपणात केस भराभर गळायला लागले. मला बाकी कशाहीपेक्षा संकल्प पूर्ण होणार नाही याचेच वाईट वाटू लागले. पण मग आमच्या फॅमिली डॉक्टर सरोज सोनारे यांनी 'भृगराज घन वटी' च्या गोळ्या घ्यायला सांगितल्या आणि खरच १५ दिवसात केसगळती आटोक्यात आली. मग जरासे बरे वाटले.
सरतेशेवटी शेवटचा पल्ला म्हणजे केस कापणे आणि विग बनवण्यासाठी देणे. ही फारच कॉमन गोष्ट आहे असे मला वाटले होते त्यामुळे आधी मी कधीच याची चौकशी केली नव्हती मग शोधता शोधता असे कळले कि पुण्यात अशी काहीच सोय नाही .
मग नेट वरून ही लिंक
https://www.copewithcancer.org/hair-donation) मिळाली आणि मग त्यांना केस पाठवले आणि आज त्यांची पोचपावती आली आणि खरच जीव भांड्यात पडला.
केसांचा प्रथम बो बांधून मग त्याची वेणी घालायची. खालून वरून रबर असलेली वेणी मग नीट राहते. पण बो जिथे बांधतो तिथे वरून केस कापावे लागतात त्यामुळे ते वेडेवाकडे कापावे लागतात. माझी building मधली मैत्रीण श्रेजल हिने आपले सर्व कसब पणाला लावून वेड्यावाकड्या केसांचा सुंदर haircut करून दिला म्हणून तिचेही आभार.
आपण जरी सद्भावनेने एखादी गोष्ट करत असलो तरी त्याच्या परिपूर्ततेसाठी खूप साऱ्या गोष्टी पार कराव्या लागतात आणि आज त्या संकल्पांची पूर्तता झाली म्हणून हा लेख प्रपंच. लहापणापासून 'नेकी कर और दर्या मी डाल' असे आईने मनावर बिंबवले आहे. एखादे चांगले काम करशील आणि त्याचा मनात जरी उच्चार करशील तर त्याचे श्रेय गमावून बसशील म्हणजे केलेल्या क्षणी ते विसरून जायचे असाच सुंदर संस्कार तिने नेहेमीच केलेला आहे पण आजची ही वेणीची गोष्ट जरा आईचा नियम मोडून एवढ्याचसाठी सांगते की Melanie च्या पोस्ट वरून प्रेरणा घेऊन मी हा संकल्प केला तशी प्रेरणा हा लेख वाचून कोणाला तरी मिळावी.
कोणाचे तरी हसू असेच कोणाच्या तरी सदिच्छेने फुलत राहावे. आपण कोणीच पूर्ण नाही असेच रोजच्या जगण्याला नव्याने आखत कोणाकोणाच्या आनंदात आपला खारीचा वाटा असावा आणि त्यासाठी जाणीवपूर्वक काही प्रयत्न करूयात.
माझा इवलासा बाळ जरा या धक्क्याने नाराज झाला होता कारण त्याला काही केल्या मी नेमके काय करणार आहे ते imagine होत नव्हते म्हणून केस कापायला मुद्दामून घेऊन गेले आणि मग आप ल्या आईला हा नवा haircut बरा दिसतोय आणि मुख्य म्हणजे ती खूप आनंदी आहे याने त्याची नाराजी दूर पळाली आहे...
आज दूरवर बाप्पाकडे राहायला गेलेली माझी आजी आजच्या माझ्या या केस कापण्याला नक्की आनंदाने आशीर्वाद देईल... आणि माझी आई , माझ्या केसात आपापला जीव अडकवलेल्या , माझ्या बहिणी, माझ्या शाळेतल्या मैत्रिणी , आत्ताच्या युगंधरच्या मित्रमैत्रिणींच्या आई असलेल्या मैत्रिणी यांनाही हा धक्का नक्की समाधान देईल अशी आशा करते....माझ्या या संकल्पात माझ्या सासूबाई सौ. वैजयंती रुकडीकर- देशपांडे यांचा भावनिक आणि कृतिशील वाटा आहे म्हणूनच हे दान आम्हा दोघींच्या वतीने ईश्वरचरणी अर्पण करतो आहोत आणि कोणाच्यातरी सुंदर हास्याची मनःपूर्वक कामना करतो आहोत....
शुभम भवतु... शुभम भवतु... शुभम भवतु !!!!


Wednesday, 6 December 2017

सखे,वाट तुझ्या 'अस्मितेची'....



Concept of Grace Womanathon

'ती' ...
संसार तोलून धरणारी अदृश्य छडी.
घरातल्या प्रत्येकाला जोडणारी प्रेमाची कडी.
घरामधल्या सजीव -निर्जीव अणूरेणूंमध्ये चैतन्य तेवत ठेवणारी 'स्वामिनी'.
संसाराची लय सांभाळत पदन्यास साकारणारी होते ती 'रमणी'
पण साऱ्या आघाड्यांवर लढतानाची तिची तारांबळ पाहताना कधी कधी वाटत त्या 'गिरीधराला' काठीचा टेकू देण्याचा भावनिक आधार देणारे सवंगडी तरी होते. पण हिचा प्रवास मात्र एकटीचा.कौटुंबिक आधार असतोच, नाही असे नाही पण काही लढाया तिच्या तिच्याच असतात.तिथे तिलाच लढावे लागते.त्या न कोणाला सांगता येतात न कोणाला तिच्यासाठी लढता येतात.
लहानपणापासून आई, आजी , काकू, मावशी, आत्या,लग्न झालेली ताई साऱ्याच नात्यात पाहत आलो आहोत तिला.
प्रेमाने साऱ्याच गोष्टी पार पाडण्याचे 'कसब' हस्तांतर करत आलीये ती, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे.पण आजकाल दिवसाच्या 24 तासात, त्यातल्या वेळखाऊ गोष्टींसकट चपखल बसवण्याची अजबच कसरत तिला करावी लागतेय. ट्रॅफिक जॅम, बाहेरच्या जगात मुलांना सोडताना अनिश्चिततेच्या भीतीचे सावट, घर, मुलांचे अभ्यास, सामाजिक बांधिलकी आणि त्याबरोबर काही जणींना नोकरी सांभाळत पळत राहण्याची कसरत... आणि मग या सर्वात ती स्वतःला 'दुर्लक्षित' करते. स्वतःच्या कुठल्याच priority list मध्ये ती स्वतःच नसते.
अर्थात , सारे सुरळीत झाल्यावर देणारच असते ती लक्ष स्वतःकडे... पण हा 'उद्या' उगवल्याचा कोणीतरी पाहिलाय का?
तिच्या मनातले स्वतः विषयीचे किती तरी plans असेच धूळ खात मनात पडत राहतात.
रोजच्या पळापळीच्या खेळात  ती 'मरगळ' तिच्या शरीरावर इथे तिथे साठत राहते. प्रत्येकाच्या शरीरप्रकृतीनुसार कोणी नकळत 'बरणी' होते तर कोणी अशक्त 'छडीची काठी'.
आजकाल ९०% बायका लग्नानंतर संसार सांभाळण्याची जबाबदारी निभावताना आपसूक या २ categories मध्ये पडताहेत.
आधुनिक सुविधांनी तिची रोजची कामे सोपी केलीयेत पण रोजचे जगणेच इतके धावपळीचे झालेले आहे की रोज रात्री पाठ टेकताना तिची आजची किमान 3 कामे पूर्ण झालेली नसतातच आणि 2  कामे नव्याने add झालेली असतात आणि हे सगळं तिला उद्याच्या कोड्यात perfect बसवायचे असते.
या सर्वात दिवस पुढे सरकत राहतात आणि 'उद्यापासून करू' चे कितीतरी plans मनातल्या मनात विरुनही जातात.
मग कधीतरी अवचित जुन्या ओळखीचे कोणीतरी भेटते. जाता जाता सहज म्हणून जाते 'किती काम करतेस जरा स्वतः कडे लक्ष दे. पार रया गेलीये बघ तुझी'.
स्वप्नातून जागी झाल्यासारखी मग ती स्वतःला न्याहाळू लागते. नकारात्मक का होईना कधीतरी, कोणीतरी आपल्या कष्टाची 'दखल' घेतली म्हणून भरून येते तिला.
तर कधी स्वतःच्या चालूच न झालेल्या plans विषयीचा संतापही येतो तिला.
मग  तिरिमिरीने पुन्हा plans होतात आणि कदाचित  एखाद -दुसऱ्या आठवड्याच्या execution नंतर परत सर्वांची धुळमाती.
हे वर्तुळ पाहताना नकळत  चातुर्मासातली आजीबाईची , सोमवारची गोष्ट आठवते आहे. सगळ्या गावाने दूध वाहिले तरी शंकरबाप्पाचा गाभारा काही भरत नाही. दिवसा अखेरी आपल्या मुलाबाळांचे यथेच्छ पोट भरून, घराचे सर्व आवरून सावरून आजीबाई देवळात येते. शिल्लक राहिलेले , छोटा तांब्या भरून दूध शंकराला वाहते आणि क्षणार्धात गाभारा सांगोपांग दुधाने भरून जातो. सख्यांनो, आपल्या मनाचे काहीसे असेच नाहीये का? त्याला अव्हेरून सर्व करायला जातो आणि मग रोजचे routine bore व्हायला लागते. अश्या 'मन' सोबत नसताना केलेल्या गोष्टी मग फक्त पार पडत राहतात. बागुलबुवा वाटायला लागतो मग घड्याळाच्या काट्यांचा.
रिते रिते राहते 'मन' खूप सारे करूनही आणि मग सारे जाऊन साठते शरीरात इथे तिथे.
जगभरात कुठल्याही देशात, रोजच्या राहाटगाडग्यात 'स्वतःसाठी न देता येणारा वेळ' ही सर्वच सख्यांची सार्वत्रिक - सामाईक समस्या आहे. तिला उत्तर मिळून शोधायचे आहे.

म्हणूनच

तिने तिच्या मनाचा गाभारा 'स्व' जाणिवेने भरायला हवा.
रोज मन मोहरून येईल असा भरभरून मोकळा श्वास तिने घ्यायला हवा.
रोज स्वतः साठीचा किमान अर्धा स्वतःच्या आरोग्यासाठी , स्वतःबरोबर च्या संवादासाठी द्यायला हवा.
आणि हे तिच करू शकते स्वतःसाठी, दुसऱ्या कोणीही करण्यापेक्षा.

टाकावे तिने जरा उंबरठ्याबाहेर पाऊल, स्वतःच्या आनंदासाठी,
चालावीत तिची पाऊलं निरालस स्वानंदासाठी,
कुठे तिच्यासाठी प्राजक्त, बकुळ फुलांचे गालिचे असतील अंथरलेले,
तर कुठे अवचित स्वप्नफुलांची सर वाहील तिच्या ओंजळी मध्ये,
प्राणवायूंच्या देवाण-घेवणीत, जाणिवा-नेणिवांच्या पल्याड घडत असते बरेच काही,
जादुभरल्या हातांनी काळजी लेकीची घेत असते धरणी माई,
कधी मुक्त वाऱ्याच्या स्पर्शणाऱ्या झुळुका, सोडवतील मनातल्या निरगाठी,
चालावीत तुझी पाऊलं कधी स्वछंदी पाऊलवाटी,
धर्मबिंदूंचे उत्सर्ग करतील वाहती तुझ्यातली सकारात्मकता,
रोजच्या routine ची 'मरगळ' कात टाकेल बघता बघता,
वितळतील मनातले काही संभ्रम पाऊले लयीत चालताना,
येईल ओठी मनात रेंगाळलेली एखादी कविता, कुंजरव ऐकताना,
विझून विरलेल्या स्वप्नांना फुटतील मग आशेचे नवे पंख,
मनमोकळा श्वास घेताना, अलवार  खुलून येईल तुझे अंतरंग,
तुझ्या स्वतःशी नव्याने होणाऱ्या या भेटीसाठी,
तुझ्या मनातल्या त्या सुंदर गावासाठी,
चल सखे चालू संगे,
वाट तुझ्या 'स्व' जाणिवेची,
वाट सकारात्मक पावलांची,
वाट तुझ्या 'अस्मितेची'.

हो! आपण सर्व मिळून चालणार आहोत आपली MARATHON
प्रत्येकीने रोजचा किमान अर्धा तास स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी काढावा आणि एकमेकींच्या साथीने तो आपण नक्की काढुयात या साठी हा उपक्रम आपण हाती घेतो आहोत.अंतिम marathon दिवसापेक्षाही खूप महत्वाचे आहे या निमित्ताने काहीतरी रोजचे स्वतःविषयीचे routine मध्ये येणे. म्हणूनच आजच नोंदणी करा आणि सामील व्हा या मैत्री-साखळीत!!!

पहिलं पाऊल...

 Grace Womanathon : 28th July

Image may contain: 9 people, people smiling, people standing and outdoor

गोष्ट सुरू झाली माझी जिवाभावाची सखी प्राजक्ता हिच्या US मधल्या marathon ने. नवऱ्याच्या नोकरीतील assignment निम्मित सध्या ती आपल्या २ छकुल्यांना घेऊन, US मधल्या इंडियाना state मध्ये राहते. प्रचंड थंडीमध्ये कधी indoor treadmill वर तर कधी संधी मिळाली तर चक्क थंडीत shoes चढवून, ३रीतल्या अवनीशचे आणि २.५ वर्षाच्या चिमुकल्या अर्जुनचे routine व्यवस्थित संभाळून, feb ते april असे सलग 3 महिने प्रॅक्टिसचे सातत्य राखत 13 miles ची marathon तिने पूर्ण केली. तिच्या एकूणच प्रवासाची सुरस गोष्ट खालील link वर वाचायला मिळेल.

http://majhekavadase.blogspot.in/2017/06/blog-post.html?m=1

मला नेहेमीच असे वाटते आपण आपला जीव सगळ्या जवळच्या मैत्रिणींमध्ये विखरून ठेवलेला असतो. त्यांच्या आयुष्यातल्या चढ- उतारात , यशापयशात लांब असलो तरी मनाने आपण त्यामुळे तितकीच आंदोलने अनुभवतो. सगळ्या रोखू पाहणाऱ्या गोष्टींना यत्किंचितही महत्व न देता ,अडचणींचा बाऊ न करता,सकारात्मक दृष्टीकोन ठेवून गाठलेले अंतिम ध्येय!

प्राजक्ताने केलेला हा प्रवास माझ्यासाठी तिच्याइतकाच खूप महत्त्वाचा होता.कधी तिचे मनापासून वाटणारे कौतुक म्हणून तर कधी स्वतःसाठी routine नव्याने आखू पाहणारे inspiration म्हणून तिची गोष्ट पुन्हा पुन्हा वाचली आणि हळू हळू मनात 'कुठल्या दुसऱ्या marathon संधीची वाट न बघता मैत्रिणी- मैत्रीणी एक marathon करूयात' ही कल्पना मनात रुजायला लागली.

अंतिम marathon दिवसापेक्षा या निमित्ताने रोजच्या routine मध्ये स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणारे आणि स्वतःशी संवाद साधणारे काही सुरू व्हावे असा प्रामाणिक विचार त्यामागे होता. गेल्या वर्षभरात युगंधरच्या शाळेचा आमचा काही आई पालकांचा 13 जणींचा group आहे. त्यांच्यासमोर ही कल्पना मांडली तर पहिल्याच meeting मध्ये मॅरेथॉन संकल्पना सहज मान्य झाली कारण प्रत्येकीला असे काहीतरी करावे असे वाटत होते पण individual level ते सुरू होत नव्हते. एकमेकींच्या साथीने आपण ते करू असे आम्हाला खात्रीने वाटले आणि प्रॅक्टिस चा १ महिना पकडून तारीख ठरली २९जुलै! मग आम्ही काहीजणी मुलांना सकाळी शाळेत सोडल्यावर चालू लागलो. काहीजणी संध्याकाळी चालायच्या.
प्रत्येकीला रोजच जमायचे असे नाही पण तरी नेटाने 1 महिना चालत राहिलो आणि आज सरतेशेवटी 9 जणी मिळून 5 km ची marathon आम्ही आज साध्य केली.

चिमुकले यश आहे पण हे पहिले पाऊल आम्हा सर्वांसाठी खूप खूप महत्वाचे आहे आणि ते share करताना आम्हाला खूप समाधान आणि आनंद होतो आहे. आजच्या या छोट्याश्या पावलाने प्रत्येकीच्या मनात नवे नवे रस्ते पादाक्रांत करण्याची स्वप्ने रुजवली आहेत आणि आज सकाळच्या संततधार पावसात ठरवून नेटाने चाललो, ठरवले होते ते केले त्याचा एक वेगळाच आत्मविश्वास प्रत्येकजण अनुभवते आहे. एकत्र असलो तर मोठ्या अंतर कसे सहज पार होते याची एक वेगळीच अनुभूती मनात रेंगाळते आहे.
आमची ही छोटीशी गोष्ट प्रत्येक ओळखीच्या- अनोळखी मैत्रिणीच्या मनात चालण्याची प्रेरणा निर्माण करो ही सदिच्छा!🙏

म्हणूनच हा खास संदेश प्रत्येक सखीसाठी .......

सखे,वाट तुझ्या 'अस्मितेची'....

टाकावे तिने जरा उंबरठ्याबाहेर पाऊल, स्वतःच्या आनंदासाठी,
चालावीत तिची पाऊलं निरालस स्वानंदासाठी,
कुठे तिच्यासाठी प्राजक्त, बकुळ फुलांचे गालिचे असतील अंथरलेले,
तर कुठे अवचित स्वप्नफुलांची सर वाहील तिच्या ओंजळी मध्ये,
प्राणवायूंच्या देव-घेवीत, जाणिवा-नेणिवांच्या पल्याड घडत असते बरेच काही,
जादुभरल्या हातांनी काळजी लेकीची घेत असते धरणी माई,

कधी मुक्त वाऱ्याच्या स्पर्शणाऱ्या झुळुका, 
सोडवतील मनातल्या निरगाठी,
चालावीत तुझी पाऊलं कधी स्वछंदी पाऊलवाटी,
धर्मबिंदूंचे उत्सर्ग करतील वाहती तुझ्यातली सकारात्मकता,
रोजच्या routine ची 'मरगळ' कात टाकेल बघता बघता,

वितळतील मनातले काही संभ्रम पाऊले लयीत चालताना,
येईल ओठी मनात रेंगाळलेली एखादी कविता, कुंजरव ऐकताना,
विझून विरलेल्या स्वप्नांना फुटतील मग आशेचे नवे पंख,

मनमोकळा श्वास घेताना, अलवार खुलून येईल तुझे अंतरंग,
तुझ्या स्वतःशी नव्याने होणाऱ्या या भेटीसाठी,
 तुझ्या मनातल्या त्या सुंदर गावासाठी,
 चल सखे चालू संगे,
 वाट तुझ्या 'स्व' जाणिवेची,

वाट सकारात्मक पावलांची, 
वाट तुझ्या 'अस्मितेची'.......

मनातले बटण


युगंधरच्या शाळेची सुट्टी सुरु झाली आणि 'मी आता काय खेळू?' असा मिनिटा मिनिटाला प्रश्न यायला लागला. कारण एरवी शाळेत सहज जिरत असलेली energy घरी जिरवणे खूपच कठीण काम आहे.  
Ever excited electrons या category मधल्या या मुलांना सतत काहींना काही करत engage ठेवावे लागतेय.
एरवी वर्गात ताई एवढ्या सगळ्या 'वानरसेनेला' कसे कह्यात ठेवत असतील याची आम्ही पालक फक्त कल्पनाच करू शकतो.
त्यातलीच एक गम्मत म्हणून आम्ही 'माऊच्या पिल्लू' या गाण्याचे remix करायचे ठरवले.
त्या गाण्यात माउचं पिल्लू येते त्याचे नाव 'उल्लूलुलुलु' ठेवतात. त्याला छान दूध बशीत ठेवतात. ते लबलब करत दूध पिऊन टाकते.
मग 'गुर्रर्र म्याव' करत त्याची आई येते आणि तिच्या मागे मागे ते निघून जाते.
मग त्यात आम्ही 'माऊच्या पिल्लू' ऐवजी 'मोतीचे पिल्लू ' आणलं. त्याची आई 'भो भो' करत आली.  पिल्लूने  'दूध भाकरी' खाल्ली
वासरू आले त्याने कोवळे कोवळे गवत खाल्ले. 
मग  चिऊचं  पिल्लू , कोकरू, छावा , घोडा ,  piggy सगळे आले.  त्यांनी त्यांचा त्यांचा खाऊ खाल्ला.
'जिराफचे पिल्लू आले' पण  जिराफची आई 'गुपचूप' न बोलता आली. जिराफला स्वरयंत्र नसते असे ताईनी सांगितले असे म्हणाला.
मग कुठून कोण जाणे 'आपण साळुंद्रीचे पिल्लू आणूया का ? ' असा प्रस्ताव आला. तिचे तर नाव 'साळुंदृलुलुलु' म्हणताना जामच मज्जा येत होती.
'पण मग तिची आई काय बरे म्हणत येईल?'
'साळुंद्री' या प्राण्याविषयी मला तरी ती काट्यांचा मारा करत येते एवढीच माहिती आहे त्यामुळे मी म्हटले
'काट्यांचा पाऊस पाडत साळुंद्री आई आली' असे म्हणूयात का?
स्वारी एकदम खुश झाली पण मग मला expected प्रश्न लगोलग आलाच
"साळुंद्री काटे कसे सोडते ग?"
"मला नाही माहित रे मी जरा शोधून सांगू का?"
"अग तिच्या मनात एक button असते ते मनातल्या मनात दाबले ना कि काटे सुटतच राहतात."
मी अवाक होऊन ऐकतच राहिले. आपल्या सगळ्याच भावनांची, करत असलेल्या गोष्टींची बटणे आपल्याच मनात असतात हे एवढ्याश्या मुलाला कळलेले secret मोठ्या माणसांना का बरे कळत नसेल?🤔🤔🤔

Tuesday, 11 August 2015

सिंड्रेलाची सोन्याची अंगठी


मुर्डीचे विना काका म्हणजे खरच एक गंमत रसायन होते. मी चौथी मधे असताना ते आणि त्यांचे कुटुंब आमच्या शेजारी राहायला आले. जेमतेम ४-५ महिनेच राहिले ते त्या घरात. पण तेवढ्या सहवासामध्ये इतके जिव्हाळ्याचे स्नेहबंध जुळून आले की माझ्या लहानपणीच्या आठवणींमध्ये गोड आठवणींचा एक महत्वाचा भाग बनून राहिले आहेत ते दिवस . दहावी नंतर दापोली सुटले तशी भेटीगाठी आणि संवाद विरळ झाले पण त्या संस्कारक्षम दिवसातल्या काही गोष्टी अजून सोबत करतात. त्यातलीच एक गम्मत गोष्ट. म्हणावी तर अगदी छोटुशीच पण सोप्पे तत्वज्ञान शिकवणारी…
त्यांचा मोठा मुलगा म्हणजे विनोद दादा ३ वर्षांचा असतानाची ही गोष्ट आहे.घरी एक कुठलासा कार्यक्रम होता आणि बाबांनी बाळाच्या बोटात छोटीशी सोन्याची अंगठी घातली. छोटूश्या मुलाला मोठ्यांसारखी अंगठी मिरवताना कोण आनंद झाला. पण थोड्याश्या वेळाने पाहतात तर अंगठी गायब! खूप शोधूनही मिळेना आणि एवढ्या छोट्या मुलाला रागावताही येईना. सगळे जण  कामाला लागले आणि सगळ्यांची गडबड, उतरलेले चेहेरे पाहून बाळराजे म्हणाले ," जावूदे ना बाबा नाहीतरी सैलच होत होती…नीट खेळताही येत नव्हते…  "
तेव्हा अर्थात वयही नव्हते या साध्याश्या गोष्टीमागे दडलेले महत्वाचे तत्पार्य कळण्याचे … पण सोन्याच्या अंगठीसारखी मौल्यवान गोष्ट हरवण्याची गोष्ट हसत हसत सांगणारे बाबा मला जामच आवडले होते तेव्हा. लहानपणीच्या गोष्टी, त्यातल्या प्रसंगांमधले छोटे छोटे कांगोरे  मनावर कायमचे कोरले जातात. ही गोष्ट सांगतानाचा विनाकाकांचा गोष्टी पल्याडचे काही तरी सांगू पाहणारा ,भरल्या डोळ्यांनी हसणारा चेहेरा कायमचा आठवणीत राहिला आहे…
कधी आपली बोटे छोटी असतात तर कधी अंगठी आपल्या मापाची नसते…  त्यासाठी बोटे मोठी करणे किंवा  आपल्या मापाची अंगठी शोधणे हा सकारात्मक विचारसरणीचा उपाय झाला तरी प्राप्त परिस्थितीत हातातल्या सैल अस्वस्थ अंगठीचा शोध घेणे आणि मनात किंतु न ठेवता त्याग करता येणे ही खरी परीक्षा …
प्रत्येक नोकरी करणाऱ्या आईचा घालमेल विषय म्हणजे आपल्या लहानग्याला न देता येणारा वेळ…  बाळाच्या जन्मानंतर शारीरिक-मानसिक बदलांसोबत आई, गृहिणी, नोकरी या साऱ्या अपरिहार्य जबाबदाऱ्यांची  तारांबळ वागवताना येणारे अपराधीपण ही अपरिहार्यच… माझीही गोष्ट वेगळी कशी असेल?
युगंधर १० महिन्यांचा झाला आणि मी नोकरीत परत रुजू झाले.घरी प्रेमाने करणारी लाडकी 'जिया' म्हणजे माझ्या सासूबाई आणि 'आबा' म्हणजे 'सासरे होते  त्यामुळे त्याची चिंता नव्हतीच. प्रश्न खर तर माझाच होता. Technical issues चे challenge प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असतेच या श्रद्धेने शोधणारी मी work आणि life सोबत हे नवीन emotional dimension कसे हाताळते याचा.
होता होता या नवीन routine ला सगळेच रुळलो. मग office मध्ये नेहेमीचे काम सुरु झाले. IT चे काम म्हणजे कधी कमी तर कधी भरमसाठ! मधला सुवर्णमध्य असणारे दिवस, वेळा तश्या विरळाच. एवढे दिवस project deadlines आणि releases या प्रमाणे स्वत:चे आणि घराचे timetable वाकावलेले. नवराही software मधलाच सहप्रवासी त्यामुळे लग्नानंतर परस्पर सामंजस्याने सारे सुरळीत पार पडलेले. पण आता होणारा उशीर, कितीही समर्थनीय असले तरी त्यामागचे कारण छोट्याश्या बाळाला कळणारे नव्हतेच. आणि रोजचे घरी यायचे बदलणारे वेळा पत्रकही मान्य होणारे नव्हतेच.
कधी कधी वेळ झाली म्हणून निघताना, आपले काम colleagues वर सोपवताना अपराधी वाटायचे तर कधी वेळेत बसणार नाही म्हणून एखादे challenge डोळ्यासमोरून दुसऱ्या हाती जाताना उगीच चुकल्यासारखे व्हायचे. आठवायचे आपण कधीतरी उगीचच आपल्या जुन्या कुणा projectmate मैत्रिण-आईचे समझून न घेता कपाळाला घातलेली आठी!
आणि सगळ्यात तुटायचे जेव्हा उशिरा कधी घरी आल्यावर अंगणात आजोबांच्या कडेवरच्या युगंधरच्या चेहेऱ्यावरचे आसुसलेले भाव! आजी आबा दिवसभर जराही रडू न देता सुंदर सांभाळायचे पण संध्याकाळच्या वेळी आईच हवी असण्याची असोशी पुरी होत नाही ना!
वाटायचे बाकीच्या मुलांना आपापल्या आईसोबत खेळताना पाहून त्याला नेमके काय वाटत असेल? TV वर एखाद्या जाहिरातीतल्या मुलाला 'mummy , mummy ' म्हणत पळत बघताना याला आपली कित्ती आठवण येत असेल? सांगता येत नाही किंवा छोट्या बाळांची काहीही बोलण्याची भाषा रडू रडूच असते म्हणून त्यातला नेमका संदेश आपण अव्हेरतो आहोत का? Quantity time पेक्षा Quality time चा आपण आपल्यासाठी आधार घेतलेला concept एवढ्या छोट्या बाळाला कसा बर कळणार आहे? मनासारखे झाले की खुदुखुदु हसायचे आणि नाही झाले तर 'ट्याट्या' करत भोकाड पसरायचे एवढेच समजणाऱ्या बाळाकडून आपण नेमक्या कुठल्या समजूतदारपणाची अपेक्षा करतो आहोत. बाळाने एखाद दिवशी खूप भोकाड पसरले तर जास्त अपराधी वाटते का समझुतीने घेतले आणि रडे थांबवले तर आपल्याला जास्त रडू येते याचे उत्तर शोधणे खरच कठीण आहे कुठल्याही आईसाठी.
आजुबाजू पाहिल्या तर खूप मैत्रिणी भेटल्या, समवेदना असलेल्या! कोणी  द्वंद्वात अडकलेल्या, सैरभैर , कोणी आपल्या career ची महत्वाची वर्षे आहेत तेवढी जर कळ सोसू या बद्दल ठाम असलेल्या,कोणी अश्याच आला दिवस निभला पण काही बदलासाठी भांबावलेल्या.
वेदना सारखी असली तरी प्रत्येकाची गोष्ट वेगळीच म्हणून उत्तरही वेगळेच. एकीचे solution दुसरीला total गैरलागू.कोणी आपल्या ऑफिसच्या वेळा बदलून घेतलेल्या कोणी part time काम करत होते कोणी work from home करणाऱ्या. काहींना तर घराचा हा मोठा आर्थिक भर डोक्यावर, मनाला काय वाटते आहे ते विचार करायला वावच नाही.
मला तर अश्या दोन्ही ठिकाणी अर्धवट भूमिका निभावण्याचा फारच ताण पडायला लागला. दोन वजा म्हणजे एक धन असे गणिती नियम इथे मात्र लागू होत नव्हते. एरवीही वेळ पाळण्याबाबत मी आग्रही होतेच पण घड्याळाच्या काट्यामागे धावताना माझा काटा थोडा दुराग्रहाकडे झुकतो आहे असे मलाच जाणवू लागले. नाचामध्ये कितीही मन रमले तरी office ची वेळ झाली की तिकडे पळ घरची वेळ झाली तिकडे पळ. आई झाल्यावर प्रत्येक मुलीची सिंड्रेलाच  होते घड्याळाच्या काट्यांचेच बूट घालून पळणारी!
कोणी colleague कधी म्हणायचाच,"थोडा chill लो मेधा ,कितना दौडती हो और साथमे हमे भी दौडाती हो.५ minutes मे जिंदगीमे क्या फरक पडता है तुम्हारे…"
'Chill कसे घेणार राजा. इथला ५ minutes चा उशीर माझा traffic चा रस्ता १ तासाचा करतो' सिंड्रेलाची वेळ पाळण्याची अगतिकता तीच जाणे.
आपल्या आईच्या पिढीने ही केल्याच की नोकऱ्या. पण त्यांना वेळेचे एक बंधन होते. आपल्यासारखे कधी officeच्या हाती तर कधी traffic च्या हातचे बाहुल्या मात्र त्या नव्हत्या. घराचा उंबरठा ओलांडण्यासाठीचा त्यांचा संघर्ष मोठा आहेच, त्याबद्दल खूप आदर आहे मला पण दिवसाच्या २४ तासात सारे काही त्यातला वेळ खावू गोष्टींच्या शक्यतांसकट चपखल बसवण्याचे आव्हान हा आपल्या पिढीचा संघर्ष.
कधी वाटायचे हे आपले शिक्षण, त्यासाठी आपल्या आई बाबांनी काढलेले कष्ट, ही नोकरी, आताचे आपले स्थान, आर्थिक स्वावलंबन... हे सारे मिळवण्यासाठी केलेली धडपड या सगळ्याचे काय मग? कधी तरी स्वत:शीच विचार करताना उमगत गेले की या सगळ्या गोष्टी माझ्याकडून कोणीच हिरावून घेवू शकत नाही. त्या माझ्यातच सामावलेल्या आहेत. मी break म्हणून जरा विसावले तरी त्या तश्याच राहणार आहेत. फक्त बाळाचे बाळपण काही दिवसांनी मोठे होणार आहे. काही दिवसांनी नाहीच लागणार आहे त्याला आई प्रत्येक ठिकाणी. आईचे बोट धरून जगात बाहेर पहिले पाऊल टाकताना मात्र त्याला ती हवी आहे.'जाऊन बघ जरा पूढे मी इथेशीच उभी आहे हं मागे' असे सांगताना कधी त्याने मागे वळून पाहिले तर त्याला ती खरोखरीची दिसायला तर हवी ना !
मग ठरवले थांबावेच जरा  थोडेसे …
सोन्याची असली म्हणून काय झाले या सैल अंगठीमूळे खेळाची मज्जा तर मुळीच येत नाहीये.
आईपणाच्या नवेपणाच्या मंतरलेल्या दिवसांसाठी काही दिवस उतरवून ठेवूयात की अंगठी हरवण्याआधीच.
थोडं स्वतःसाठी आणि थोडं पिल्लुच्या मनात कायमच्या कोरल्या जाणाऱ्या पहिल्यावहिल्या आठवणींसाठी ...
थोडे दिवस विसरून जावूयात की सिंड्रेला असणे…जरा थांबूया विसावूया या वळणावर…
असेही होवू शकते कदाचित थोड्या दिवसांनीही  नाहीच बसणार ही अंगठी आपल्याला …  पण हरकत नाही तिलाच जरा सोनाराकडे जावून तासून घेवू किंवा न जाणो एखादी वेगळीच अंगठी आपली वाट बघते आहे भविष्यात…
मला माहित आहे युगंधर शाळेमध्ये रमल्यावर सध्याची ही अंगठी मला सैल/घट्ट अस्वस्थ होणार आहे त्यासाठी माझ्या मापाची अंगठी मी शोधतेच आहे पण सध्यातरी सोनुल्या चिमुकल्या बोटांची अंगठी माझे बोट मानाने मिरवते आहे… विनाकाकांच्या डोळ्यातल्या पाण्याचा अर्थ आज नव्याने उमगतो आहे…