Wednesday, 8 August 2018

बोकोबा आणि लोणी

आज सकाळचीच गोष्ट. बरे नसले कि अभिनयासकट गोष्ट रंगवून सांगत खाऊ भरवावा लागतो तरच तो जातो.
आजी आणि आबा मिळून युगंधरला कृष्ण आणि दहीहंडीची गोष्ट सांगत होते. कंस कसा दुष्ट होता सगळे गोकुळातले दूध त्याच्याकडे मागवायचा आणि कधी घाबरून तर कधी चांगल्या मोबदल्यासाठी मग गोकुळातले लोकही आपल्या पोराबाळांना खाऊ-पिऊ न देता दूध-दुभते तिकडे पोहोचते करायचे. त्याच्या मित्रांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत होता. आणि हे अन्यायाचेही होते.
दही गुसळून केलेलं लोणी शिंकाळ्यावर काढून ठेवायचे. ते असे वर बांधलेले असायचे. गोष्ट जोरात सुरु होती.
"शिंकाळे म्हणजे काय?"
एवढ्यात जिया म्हणजे आजी काही कामासाठी दुसऱ्या खोलीत गेली. आणि
आबांनी 'शिंकाळे' या गोष्टीचे सगळे दाखले द्यायला सुरुवात केली.
म्हणजे
"अरे ते नाही का तू खूप मस्ती करतोस तेव्हा बाबा म्हणतो ना 'शिंकाळ्यावर टांगून ठेवीन'. आणि अरे ती म्हण आहे ना 'बोकोबाची नजर शिंकाळ्यावरच्या लोण्यावर'. म्हणजे अरे बोकोबा असतो ना त्याचे घरात सगळीकडे लक्ष असते. लोणी करताना तो बघतो आणि मग वाट बघत असतो कि कधी मला त्यावर ताव मारता येईल."
यांचे हे 'शिंकाळा' पुराण संपता संपता आजी आली आतून आणि मग कृष्ण आणि त्याचे साथीदार यांच्या गप्पा गोष्टी परत चालू झाल्या.
" तर अरे कृष्ण म्हणजे गोकुळचा राजाच. त्याच्याकडे दुधातुपाला काही कमी नव्हती. पण आपल्या सवंगड्याना ते मिळावे म्हणून मात्र तो त्यांच्या घरी जाऊन कोणी घरी नाहीसे पाहून चोरी करत असे. म्हणजे काय असे खाली ४-५ जणांनी उभे राहायचे त्यावर अजून थोडे मग त्यांच्या खांद्यावर अजून काही मुलं असा पिरॅमिड करायचे आणि सरते शेवटी कृष्ण वर चढून ते लोण्याचे मडके खाली आणायचा आणि मग आपल्या सर्व मित्रांना आपल्या हातानं प्रेमाने यथेच्छ खाऊ घालायचा. "
"आणि मग त्या बोक्याला दिल कि नाही."
"ऑ , कुठल्या बोक्याला ?" आजी बुचकळ्यातच पडली.
मग आबांनी त्याला ती म्हण आत्ताच सांगितल्याचे सांगितले आणि आम्ही सर्व हास्य कल्लोळात बुडून गेलो.
किती निरागस असते चिमुकल्यांचे भावविश्व. खूप सगळ्या गोष्टी त्यात सहज सांधलेल्या असतात. आपल्या वाटते ही कुठली लिंक कुठे आली पण प्रत्येकच गोष्टीमागचे त्यांचे विचार सुसंगत असतात आणि त्यांना त्यांची त्यांची यथायोग्य कारणंही असतात.
युगंधरच्या जन्माच्या आधीचे माझे आणि कौशलचे फोटो कधी पहिले तर जरा रागच यायचा युगंधरला. 'तू तेव्हा नव्हतास' असले सत्य तर अजिबात आवडायचे नाही. 'जवळच खेळत असशील' असे सांगणेही पटायचे नाही.
"मग तुम्ही मला न बोलावता आपला आपला फोटो काढलात ना" असले गम्मत आणि ज्याचे तुम्ही काही केल्या सांत्वनच करू शकत नाही असे भांडण सुरु व्हायचे.
मग मीही फार फाटे न फोडता 'अरे तू आहेस फोटोत पण माझ्या पोटात आहेस' असे सांगायला सुरुवात केली. आणि पोटात का होईना पण आपण आहोत फोटोत असल्या गमतीशीर समाधानात पुढे पुढे असले प्रश्न बंद झाले.
मग एकदा आईच्या घरी कुठलेसे फोटो बघत होतो. एका फोटोत मी, कौशल , युगंधर, माझी आई , भाऊ आणि वहिनी होते.
कोणीतरी म्हणाले
"अरेच्या यात पुणे आबा (माझे बाबा) नाहीयेत वाटत. "
क्षणार्धात युगंधर म्हणला
" फोटोत दिसत नाहीयेत पण पुणे आबा माझ्या पोटात असणार."
आम्हाला सर्वांना हसून हसून वेड लागायचे फक्त बाकी राहिले होते.
माझे बालपण 'दापोली' या सुंदर गावात गेले. कौलारू घर, आजूबाजू पेरू, चिंच , आंबा , डाळींब , चिकू, केली याची भरगच्च झाडे. विहीर आणि त्याच्या भोवतीच्या गमती. पाठचे शेत. एकीकडे मलये आजी आजी तर दुसरीकडे बर्वे आजी अशी प्रेमळ उब. अशा सगळ्या आठवणी कधी गोष्टी म्हणून तर कधी गम्मत म्हणून युगंधरला मी नेहेमी सांगत असते. तो हि आईचे 'बालपण' कसे असेल याचे चित्र रंगवून पुन्हा पुन्हा सांग असे सांगत राहतो.
मग कधी माकडाची टोळी यायची आणि मग मी आणि पियुष (माझा भाऊ ) कसे डबे वाजवत त्यांना पळवून लावायचो हे सांगताना प्रश्न आला.
"मग मी कुठे होतो तेव्हा?"
"अरे माझ्या लहापणी तू नव्हतास ना मीच लहान होते तर."
"अग म्हणजे दापोलीत नसेन पण कुठेतरी असेनच की" ( तू नव्हतास हे उत्तर अजिबात आवडले नव्हते.)
"अरे मग तुला पण घेतो आमच्या team मध्ये. तू, मी आणि पियुषमामा तिघे जण डबे वाजवायचो." काय कळी खुलली होती विचारात सोय नाही. पियुषला पण बजावून ठेवले होते थोडे दिवस लहानपणचे काहीही निघाले कि त्यात युगंधरला घेऊन सांगायचे.
मग २ वर्षांपूर्वी दापोलीला जायचा प्रसंग आला. युगंधरला घेऊन पहिल्यांदाच जाणार होतो. फोनवर 'हॉटेल बुकिंग झालेय' असे काहीसे बोलताना त्याने ऐकले.
फोन संपल्यावर म्हणाला,
"अग तुम्ही दापोलीला हॉटेलमध्ये राहायचात का?"
" नाही रे का ?"
" मग आपण उद्या तुझ्या मलये आजीच्या शेजारच्या त्या घरी राहायला जाणार आहोत ना ते घर नाही हॉटेल आहे का? तुझे मलये आजी, बर्वे आजी, पेरूच्या झाडावरची माकडे सगळे भेटतील ना मला. "
मला २ मिनिट खूप गलबलूनच आल. त्याने आता आपण दापोलीला गेल्यावर आईने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करायच्या, ते सगळे लोक त्याला भेटतील अशी काय काय स्वप्ने रंगवली होती.
काळाच्या ओघात खूप सारे बदलतच जाते. माणसे , नाती, घर , परिसर सगळंच. त्यांना तस बदलणं प्राप्तच असत. पण आपल्या मनातलं नेमकं काय जपायला हवे ते आपणच ठरवायला हवे ना. दापोली भेटीत घराकडे चक्कर मारलीच नाही. युगंधरच्या भावविश्वातले आणि माझ्या आठवणीतले मला काहीच तसूभर सुद्धा हलू द्यायचं नव्हतं... आणि आताही आमची कृष्णाची प्रत्येक गोष्ट 'बोकोबाला' घेऊन असणार आहे बर का...

No comments:

Post a Comment