युगंधरची शाळा 'ज्ञानप्रबोधिनी'चे वैशिष्टय आहे. मुलाच्या शाळेच्या भावविश्वात ते पालकांना इतके सहज सामावून घेतात की मग पालकांना ती आपलीच शाळा वाटू लागते. त्यांच्या शाळेतल्या छोट्या छोट्या उपक्रमात ते म्हणायला 'पालकांची मदत' असा उल्लेख करतात पण असा प्रत्येकच अनुभव एकुणातच 'व्यक्ती' म्हणून तुम्हाला समृद्ध करणारा असतो. लहान मुलांच्या निरागस जगात जिथे ती मनमोकळी होतात, नव्याने काही शिकत असतात, एकमेकांशी असलेले निरागस मैत्र जुळवत असतात, एकत्र गंमत गाणी म्हणत रमलेली असतात त्यामध्ये डोकावणे हा रोजच्या routinue मधला 'अमृतानुभव' असतो. तुम्हाला नकळत असे काही सापडून जाते की रोजच्या निरस चाललेल्या प्रवाहातून तुम्ही भानावर येता. आणि म्हणूनच शाळा आम्हाला कधी 'हाक' मारते याची आम्ही सर्वच पालक वाट बघत असतो. त्यातलाच हा एक गंमत अनुभव!
परवा खेळगटाची म्हणजे शाळेची सर्वात छोटीशी 'शेंडेफळे' यांच्या सहलीसोबत जाण्याचा योग आला. ठिकाण होते चिंचवडमधले 'मोरया गोसावी मंदिर' आणि त्याच्या शेजारची प्राण्यांची शिल्पे असलेली बाग! तर तिथे आम्ही पोहोचलो. देवाचे दर्शन घेऊन एके ठिकाणी वृषालीताई सर्व मुलांना घेऊन बसल्या आणि गप्पा गोष्टी सुरु झाल्या.
"चला सांगा आपण कुठल्या मंदिरात आलो आहोत?"
"मोरया गोसावीsssss !" सगळी मुले एकसाथ म्हणाली.
"मंदिर कुठे आहे?"
काही जण 'चिंचवड' असे म्हणाली पण खूप सारी मुले म्हणाली,
"इSSSथे....."
आम्हाला सर्वांना त्यांच्या या 'निरागस' उत्तराची खूपच गंमत वाटली. मग ताईंनी त्यांना आपण चिंचवडला आलो आहोत आणि इतर माहिती सांगितली
हीच गोष्ट आज गंमत म्हणून युगंधरला सांगत होते. बालवर्गात गेल्यापासून आणि आपण शाळेतला 'दादा' वर्ग आहोत हे कळल्यापासून अश्या 'छोट्याश्या' मुलांच्या गंमती ऐकण्यात स्वारीला भारी interest असतो.
"अरे माहितिये का काल खेळगटाच्या सहलीला काय गंमत झाली?"
"गंमत म्हणजे joke झाला का काही?"
"हो jokeच झाला रे.. "
मग मी सगळे सांगताना त्यालाच प्रश्न विचारला
"आणि मग ताईनी विचारले 'मंदिर कुठे आहे' तर काय म्हणाली माहितीये का छोटीशी मुले?" (असल्या गमती सांगताना सारखी ती 'छोटीशी' आहेत असे म्हणावे लागते.)
" 'इथे' असे म्हणाली असतील की"
"अरे तुला माहितीये ना 'मोरया गोसावी मंदिर' कुठे आहे?"
"हो माहितीये की 'चिंचवड' मध्ये आहे. पण ती तिथेच असताना असे कशाला म्हणतील ते ? ते तर 'इथे' असंच म्हणतील ना?"
"हो खरचं की रे!" असे मी म्हटले आणि माझा चेहरा काहीतरी ठाव घेते आहे पण उमगत नाहीये असा गमतीशीर झाला असावा कारण 'एवढं कसं बर नाही कळत हिला' असा मिश्किल चेहरा करत तो खेळायलाही गेला.
मी मात्र खरच विचार करत राहिले, जिथे असेल तिथे प्रत्येक ठिकाणी 'इथेच' असणे कधी बरं निसटले असेल आपल्याकडून!
आजचा दिवस मावळताना उद्याच्या चिंता आणि दिवस सुरू होताना कालचे ओझे घेऊन का बरे फिरतो आहोत आपण?
खूपच क्वचित वेळी आपण मनाने त्या त्या ठिकाणी उपस्थित असतो.
आणि आजकाल तर प्रत्येक क्षण आपण मोबाईल कॅमेराच्या नजरेनेच बघतो की काय असे वाटावे असे Selife चे वेड आहे आजूबाजू! आणि आहे हा क्षण आहे तसा 'जगून' त्याची मजा चाखण्यापेक्षा तो क्षण watsapp वर , FB वर टाकून बाकी सर्वांना त्या क्षणात खेचण्याची केविलवाणी धडपड करतो का आपण? खूप सारी क्षणचित्रे नुसती साठवतच राहिलो आहोत का आपण आणि खरे जगणे जरा बाजूलाच राहते आहे की काय?
म्हणूनच भानावर आणणारा 'छोट्याश्या' गोड मुलांचा आवाज जरा मी जपूनच ठेवलाय मनात!
उद्याच्या किव्हा कालच्या कुठल्याही गोष्टींचा बागुलबुवा माझ्या 'आज' आणि 'आत्ता' वर संक्रमण करू लागला तर हलवेन स्वतःला आणि हळूच सांगेन ,'अगं, इsssथे'!
No comments:
Post a Comment