पहाटेच्या दुलईत रात्र मिटू लागली होती..धुक्यात अवघे जग मंत्रून झोपी गेले होते....
तिच्या पहाटेच्या नित्याच्या कामांना मात्र वेग होता... कारण आज तिचा तो तिला भेटणार होता...जगाच्या नजरेंपलिकडे...
दळणकांडण उरकून , गाईगुरांच्या धारा काढून, त्यांना चारा सरकवून ती वेगाने निघाली...
बेभान ...अस्वस्थ..उत्सुक... थोडीशी धास्तावलेली...
आणि नदीकाठी तिला 'तो' तिची वाट पाहत असलेला दिसला.... तिच्या धाप लागलेल्या शरीराभर एक गोड शिरशिरी उमटली.....
पण नेहेमीच्या आवेगाने तो जवळ आला नाही...मग ती तिच्या प्रेमभरल्या असोशीने जवळ गेली..
"हे काय आज काही बोलायचे नाही वाटतं..." तिच्या काळ्याभोर डोळ्यात दुःख उमटलं..
"वेडे, तुझा माझा संवाद-संबंध हा किती जुना अग... ही आजची का गोष्ट आहे?"
"बोल ना काहीतरी.. खूप ऐकावेसे वाटतं आहे ...."
"बरं चल, आज वेगळया भाषेत बोलू....."
"पण मला तर प्रेमाची सोडून कुठलीच भाषा येत नाही की..."
तिच्या गोंधळलेल्या आविर्भावावर तो नेहेमीसारखा गोड हसला. गालावर एक टिचकी वाजवत म्हणाला,
"जा तिथे पलीकडे बस.मी इथं या दगडाशी बसतो."
"हे काय? एवढ्या लांब मुळीच नाही हं...का छळतोस?.."
"लांब? दिवसभर सोबत नसतेस तेव्हा लांब असतेस वाटतं..?"
तो एक मिश्किल हसू फेकत म्हणाला आणि ती लाजेने चूर झाली. जाऊन पल्याड जाऊन पाण्यात पाय सोडून बसली.
"हं.. बोल आता"
पण तो शांत बसला होता...ध्यानस्थ...स्थिरचित्त .. अविचलीत..आत्ममग्न...
एकाच प्रेमबंधनात राहून हा इतका कसा स्वस्थ, शांत कसा राहू शकतो..?.तिला परत एकदा नव्याने वाटून गेलं...
त्याने त्याच्या पाव्याला ओठ लावले होते.
तिला क्षणभर त्या 'सानिका' चा प्रचंड हेवा वाटला... वाटलं असेच एकादाच आपल्यातही प्राण फुंकून टाकून हा मुक्त का करत नाही आपल्याला...?
रोज एक अस्वस्थ, कासावीस तहान होऊन जगतो आपण...
पण त्याने सूर लावला होता आणि तो अलगद तिच्या मनाला भिडला तशी ती मंत्रमुग्ध झाली..
आणि सूर वाहत राहिले तिच्या अवतीभोवती ...तिच्या अंगाशी खेळत... तिला सुखतीशयाने फुटून जाणार असं वाटू लागले.
कळू लागली तिला ही शब्दांपलीकडची सूरभाषा...
"अजून पूर्णत्वाने नाही आलीस इथं तू..."
"....कशी येणार ..?वर्तमानाचं भान कसं सोडणार..?."
"मोकळा कर तुझा तो केशसंभार ज्यात तू कितीतरी बंधने माळून आली आहेस..."
"असे कसे करणार अरे..मी परत कशी जाणार मग?"
"मी जाऊच देणार नाहीये तुला परत..."
त्या लडिवाळ प्रेमाने ती तृप्त हसली...
बासरीचे सूर अलगद तिच्या एक एक बटा सोडवत केशसंभार पाठीवर पसरवू लागले. आणि प्रत्येक बटे सरशी ती मुक्त होऊ लागली...नदीकाठचा वारा तिच्या केसातून वाहून तिची गात्रे शांत करू लागला..
उगवतीला नुकतंच तांबडं फुटू लागलं होतं... यमुनेच्या श्यामवेल्हाळ जलात तिचं अस्पष्ट प्रतिबिंब तिला हिंदकळताना दिसू लागलं....
"मी एवढी सुंदर दिसू शकते..?"
तिचा तिच्यावर विश्वास बसेना..
"तुझ्या माझ्याठायी रत असलेल्या आत्म्याची प्रचिती नाकारू नकोस वेडे... मला तू नेहेमीच अशी दिसतेस.."
"नेहेमी? कित्ती खोटं ....तुला मी एरवी आठवते तरी का?"
लटक्या रागाने ती म्हणाली,
"कुठूनही उगम नसताना अचानक वाऱ्याची झुळूक कुठून येते ...?
गंधभरल्या फुलांची ओंजळ हुंगुन जेव्हा हृदयाशी धरतेस तेव्हा तुझ्यासाठी ते स्वत्व इतक्या नितळपणे तुला कोणी पाठवलेलं असतं..?
रात्रीच्या निरव प्रहरी अलगद जाग येते तुला आणि आधाराला शोधतेस तो शाश्वत श्वास घेऊन कोण उतरतं तुझ्या मानत...?
मी सोबत नसतानाही तुझ्या इवल्या हृदयाची धडधड कोण शांतावतं.. ?
तुझ्या अवघ्या अस्तित्वाला कोण वाहतं ठेवतं?"
"तुझेच कुटील प्रश्न अन तुझीच लोभस उत्तरे ..."
बासरी आता समेला पोहोचली होती. मंतरलेल्या मुग्ध स्वरात आता ती विरघळून जाऊ लागली होती.
तिचे अणुरेणू तिच्याच नकळत विरळ होऊ लागले...
पायाशी असलेल्या यमुनेच्या पाण्यात मिसळून जलमय झाले...
नदीकाठच्या मऊ मृत्तिकेत तिचे काही कण अलगद मिसळून गेले...
भवताल वाऱ्यात उधळून जात 'ती' अवकाश झाली..
सगळ्या मर्यादा, बंधने , सुख , दुःख मागे सोडत आनंद विभोर झाली..
कुठे राहिली ती तिची, त्याची किव्हा कोणाचीच?
आणि या सर्वाचा कर्ता 'तो' मात्र सवयीने अंतर्धान पावला ...
इकडे गावात आवई उठली ...भल्यापाहटे 'ती' नाहीशी झाली...काठावर फक्त तिची वस्त्र आणि आभूषणे मिळाली....
आणि एक कथा...
काही 'ती' ना मात्र गूढ वाटत नसलेली..
त्यांचे केशसंभार सुटून मुक्त करू पाहणारी...

No comments:
Post a Comment