Monday, 11 January 2021

Fullproof फूल

 

फुलातलं गम्य हुंगत
ती झाडाशी उभी होती...
 
अजून एक वेडं फुल
म्हणून झाडानेही तिला सहज
सामावून घेतलं ...
 
आणि अश्यात
हवेतल्या बाष्पाला
अलगद उतरण्याचा मोह पडावा
असं 'त्याचं' उत्तर आलं...
 
तिनं दवबिंदू म्हणून अलवारपणे झेलेलं...
 
आणि पानांनीही
उगी त्यावर हक्क मिरवला नाही...
 
असं 'तुझं माझं' करायचं नसतं
तरच मोकळं आकाश कुणाचंही होऊ शकतं...
 
झाडं कित्ती सहज काही शिकवून जातात...
 
पण मग 'फुलपाखरी' हृदयाची ती
इतस्ततः उधळली..
 
परत काहीसं आठवलं म्हणून परत त्याच झाडापाशी आली...
 
"हं, आता काय?"
 
"मगासच्या कवितेत थोडे corrections करायचे होते..."
 
झाडाला फुटकन हसूच आलं पण जरा रागावण्याच्या अविर्भावात ते तिला म्हणालं,
 
"कित्ती चक्रम मुलगी आहेस...😌
 
Corrections कसली करतेस? ते तुझं र्हस्व-दीर्घ व्याकरण ठेव तुझ्यापाशीच...
 
असोशी आणि आवेगाने मनातलं काही सांगू पाहणं याचीच फुलं होतात वेड्या...
 
त्यांना उमलू द्यावं ...
मुळीच correct न करता...
 
आणि ...
 
निरपेक्षपणे कुणालाही घेऊ द्यावी
त्याला 'खूडणं' न म्हणता...
 
त्या 'कोणाची' म्हणूनच ती आलेली असतात उभारून वर
थेट मनाच्या तळाचा ठाव सांगत...
 
सहज असू द्यावं ग सगळंच ...
 
शब्दात उतरली तर उतरली ...
बंध घालू नये कश्याचेच त्यांना...
 
मग बघ त्यांचं गंधाळणं तुला किती वेड लावतं ...
त्यांचा मुलायम , मृदू स्पर्श झिरपत , काही मनाशी पोचतं...
त्याचं 'रंगपण' हृदयस्थ होतं
अदृश्य पंख देत सारे 'संदेह' मुक्त करतं...
हं ☺️
उमगलंय वाटतं काही तुला..
तशी खुळीच आहेस म्हणा तू ..
पण उगीच नाही ना गालातल्या गालात हसत तू नेहेमी...
आत्ता कशी अगदी माझी fullproof फूल वाटतेयस...
 
थांब जरा निमिष मात्र , अशीच तरातरा स्वप्नातून बाहेर निघू नकोस...
 
दृष्ट लागलीये तुला की कसली
बाधा झालीये वाटेल सर्वांना...
 
जरा माती ओवाळून टाकते.."


No comments:

Post a Comment