Friday, 18 May 2018

एका वेणीची गोष्ट


सुमारे दोन वर्षांपूर्वी माझी college मधली कॅनडाला स्थाईक झालेली मैत्रीण प्रिया हिच्या फेसबुक भिंतीवर तिची मुलगी Melanie हिची cancer patients साठी hair donate केल्याची तिच्या फोटोसकटची post झळकली. अवघ्या १२ -१३ वर्षाच्या या गोड चिमुरडीचे हे पाऊल मला खूप भावुक करून गेले. तिने चक्क डोक्याचे पूर्ण मुंडण करून donate केले होते. उमलत्या वयातल्या मुली एकूणच आपल्या दिसण्याविषयी कित्ती जागरूक असतात आणि म्हणूनच तिचे हे धाडस मला खूप कौतुकाचे वाटले.
नुकत्याच कर्करोगाने गमावलेली माझी जवळची शोभाआत्या आणि सुंदर मैत्र जुळत असतानाच निघून गेलेली माझी नणंद मानसी यांचे दुःख मनात ताजे होते. शारीरिक किव्हा भावनिक यातना असले काहीच तुम्ही share करू शकत नाही याचे हताश ओझे मनात होते. दोघीनीही आजाराचा, आपल्या दुखण्याचा बाऊ न करता सारे हसत निभावले , आपले दुःख कोणाला कळू न दिले नाही की नियतीनेही क्षणभर नतमस्तक व्हावे. शेवटपर्यंत सर्वांना आनंदच दिला आणि सारे स्वतः सोसत राहिल्या. पण दोघींच्याही आजारात केमोमुळे गमावलेले केस ही एकच गोष्ट होती की ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर थोडेसे दुखावलेपण मी पाहिले होते. केस ही कोणाच्याही दिसण्याचा आणि प्रतिमेचा अविभाज्य भाग असतो. म्हणूनच ठरवले एका तरी व्यक्तीच्या हसण्यामध्ये माझ्या केसांचा वाटा असेल असे काही शक्य आहे का आपल्याला? अगदी सरसकट सगळे केस नाही जमणार पण जेवढे शक्य तेवढे केस वाढवून करूया की donate. आणि या एका सदीच्छेने मी केस वाढवू लागले.
संकल्पाला पाठबळ मिळावे आणि डगमगू नये म्हणून घरात संकल्प सांगितला. तर सर्वच बाबतीत आधार असलेल्या माझ्या सासूबाईनीही माझ्या सोबत 'एक वेणी' दान करायचा संकल्प सोडला आणि संकल्पाला दुप्पट जोम आला. पण गम्मत म्हणजे लहानपणापासून माझे केस ही माझी 'खाजगी मालमत्ता' नव्हतीच मुळी. त्यामध्ये माझ्या मैत्रिणी, बहिणी , नातेवाईक यासर्वांचीच प्रेमाची गुंतवणूक आणि जपणूक आहे. त्यामुळे त्यासर्व लोकांच्या उल्लेखाशिवाय हे दान पूर्ण होऊ शकत नाही. त्याचीच ही 'एका वेणीची गोष्ट'!
माझी सांगलीची आज्जी म्हणजे आईची आई मूळची गोव्याची होती आणि शेवटपर्यंत गोवा मनात जपून होती. गोव्याचे घरच्या माडांच्या नारळाचे शुद्ध खोबरेल तेल आणि त्या तेलाच्या वापरामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते अशी तिची श्रद्धा होती. तीचे केसही शेवटपर्यंत कंबरेएवढे लांब होते. तीच वंश परंपरा actually केश-परंपरा माझी आई आणि माझ्यापर्यंत आली आहे याबद्दल तिला खूप आत्मीयता होती. माझ्या आईचे केस अजूनही गुढघ्याएवढे लांबीचे आहेत. आईचे केस सरळ असल्यामुळे तिला ते छान सांभाळता येतात. पण माझे केस थोडे कुरळे ,थोडे सरळ आणि मुळात दाट असल्याने आणि त्यात लहानपणी दापोलीसारख्या लाल मातीच्या गावात राहत असल्याने १-२ वेणीचे पेड यापलीकडे ते वाढवण्याची हौस काही करता यायची नाही. दर सुट्टीत मामाच्या घरी गेल्या गेल्या आजीचे लक्ष्य माझ्या केसांकडे असायचे आणि तेवढेच किव्हा जरा कमीच झालेले केस बघून 'तुम्ही आजकालची मुले तुम्हाला तेल लावायला नको. असंच अन तसच..' गाडी केसांवरून घसरून कुठे कुठे पोहोचायची. पण आहे तेवढया केसांचे सुट्टीभर तेलमाखन लाड व्हायचे. रोज दूपारच्या झोपेनंतर घरा बाहेरच्या ओट्यावर बसून तेल चोपाचोपी आणि घट्ट वेणी असा साग्रसंगीत कार्यक्रम असायचा. त्या वेण्या इतक्या घट्ट घातलेल्या असायच्या की त्या नंतर खेळणे , दंगामस्ती , रात्री झोप या सर्व प्रकारा नंतरही त्या तसूभरही खरेतर केसभरही हललेल्या नसायच्या . असले अजब कसब फक्त माझ्या आजीच्या प्रेमळ हातातच होते .
शाळा संपली आणि ११-१२ आत्याकडे पुण्याला राहायला आले. अभ्यासाच्या ओझ्यामध्ये आता अजून केसांचे ओझे नको असे सर्वानुमते ठरले मग रडत रडत short bobcut करून टाकला. आणि मग जरा वर्षभर आजीची भेट एकदा दोनदाच झाली आणि थोड्याश्या ओरड्यावरच थोडक्यात निभावले. नव्या style ला नव्या मैत्रिणींकडून compliments मिळाल्यावर जरा जीव भांड्यात पडला.पण तिथल्या माझ्या मत्रिणी अँन आणि प्रफुल्लता यांचे छान कंबरेएवढे लांब केस होते. त्यांच्या नादाने परत केस वाढवायला लागले.
मग engineering च्या पहिल्या वर्षाच्या शेवट पर्यंत परत एक दोन वेणीचे पेड पर्यंत मजल गेली. आणि मग एके दिवशी building मधल्या एका मैत्रिणी सोबत parlour मध्ये तिचे केस कापायला गेलो आणि मलाच blunt cut कसा छान दिसेल असे अशा स्तुतीला भुलून परत एकदा केसांची मस्त वाट लावून घेतली. पण यावेळी मात्र collegeच्या मित्रमैत्रिणींनी लांब केसच कसे छान दिसत होते हे अजिब्बात छान नाही दिसत आहे असे म्हणून आगीत (की डोक्यावर) तेल ओतले. मग मात्र कसलीही तमा न बाळगता केस महाशय भराभरा वाढू लागले. चक्क कंबरेपर्यंत पोहोचले. प्रत्येक सुट्टीत आजीला भेटून केस दाखवायची गंमत वाटू लागली. खालून just trim करतानाही जरा जास्तच कापले जाऊ नयेत म्हणून आईला घेऊन जायचे parlour मध्ये.
पण या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आईने खूप बजावूनही मी शिकले नाही ती म्हणजे स्वतःची वेणी स्वतः घालणे. काही केल्या मला स्वतःला मी घातलेली वेणी मुळी आवडायचीच नाही. त्यामुळे आईच वेणी घालायची किव्हा रोज हट्टाने मी तिच्याकडूनच वेणी घालून घ्यायचे.
मग job सुरू झाल्यावर पाहिले ४ महिने म्हैसूरमध्ये training होते. तिथेही माझ्या गोड मैत्रिणी अपर्णा आणि प्रगती यांनी माझ्या केसांचे खूप लाड केले.
रोजच्या अभ्यास आणि घाई गडबडीतही त्या न कंटाळता माझी वेणी घालून द्यायच्या. मग परत पुणे आणि मग आईच्या हाताची वेणी.
४-५ वर्ष ही केशसेवा मी हक्काने करून घेतली. म्हणजे मी स्वतः वेणी किव्हा काही इतर केसांचे करायचे खूप उद्योग करायचे पण काहीच पसंत न पडून आईच्या पुढ्यात रोज केस आणि कंगवा घेऊन यायचे मग आईकडून वेणी घालून घ्यायची. कधी सणानिमित्त जमलो कि माझ्या मामेबहिणी सुखदा आणि मुग्धा यांच्यासाठी नवनव्या hairstyles try करण्यासाठी मी हक्काची मॉडेल होते. मग शाळेतल्या मैत्रिणींच्या लग्नात प्रत्येक वेळी वाढणाऱ्या केसात माझ्या मैत्रिणींचाही जीव अडकू लागला. अश्या प्रकारे माझे केस म्हणजे सर्वांनी प्रेमाने सांभाळायची लाडकी पब्लिक प्रॉपर्टी झाले. मग प्रेमात पडल्यावर कौशलनेही लांब केस आवडत असल्याचा दुजोरा दिला. मग काय केसांना वाढत राहण्याचा प्रेमळ धाकच मिळाला की.
मग लग्नातही मोठ्ठे केस आणि त्याच्या hairstyles छान मिरवल्या मी. लग्न झाल्यावर मात्र नव्याने पडलेली घराची जबाबदारी आणि office मधले मानमोडू japanese project... ही तारेवरची कसरत करताना एरवी जणू शरीराचा एक अविभाज्य भाग किव्हा अवयवच झालेले केस सांभाळणे जरा डोइजडच व्हायला लागले. त्यात हिंजेवडीचे traffice, धूर! मग परत एकदा मनावर दगड ठेवून केस अर्धे केले. थोडी वर्षे जरा styles केल्या पण मग गोड बाळकोबांचे घरात आगमन झाले. Office, घर आणि माझे गोंडस बाळ!! परत केसांनी backseat घेतली. Stepcut आणि तत्सम नव्या outfit मध्ये मानेपर्यंत आपले हातपाय आवारत केस महाशय हू की चू न करता माझे busy bee routine सोपे करू लागले.
मग युगंधर अडीच वर्षांचा झाला आणि कौशलच्या project निमित्त london ला राहायचा योग आला. आणि तिकडच्या parlour मध्ये कोण बाई जाणार असे करत एक सात आठ महिने केस परत एक-पेड दोन -पेड वाढले. केस थोडेसे वाढले की वेणी घालून बघायची अशी का कोण जाणे हौस आहे मला. तशीच कधीतरी घातली असावी. एकदा खेळताना युगंधर येऊन म्हणाला 'त्यादिवशी ते केसांचे कसे केले ना तसे कर ना!' म्हणजे कसे? असे का? का तसे विचारत असता एक नवीनच गंमत कळली. 'अग ते नाही का असे मानेवर येते.... ते ओढायला मज्जा येते ते...'
केसांचा असाही उपयोग असतो हे फारच गमतीचे होते. मग युगंधरसाठी केस वाढवायचे असे ठरवले. मी infy मध्ये काम करत असताना माझी एक खूपच गोड PM होती माधुरी देवधर. 'आपल्या मुलाला साडीतली आई कशी असते ते कळावे म्हणून आठवडयातला एक दिवस छान साडी नेसून यायची. लगेच copy cat म्हणून मीपण तसेच करायचे ठरवले होते. पण मनातल्या मनात सुद्धा मी तो संकल्प पाळू शकले नव्हते त्याची खंत मनात होती. पण म्हटलं साडीतली आई जाऊदे आपण वेणीतली आई जरा try करूयात. आणि परत जोमाने मी केस वाढवायला लागले.
मग दोन वर्षांपूर्वी मला फेसबुकवर Melanie ची गोष्ट कळली आणि मी संकल्पाने केस वाढवू लागले.
आपले केस आता ही कोणा दुसऱ्याची आपल्याकडे असलेली ठेव आहे आणि तिची जपणूक करणे हे आपले कर्तव्य आहे अशी भावना असल्याने रोजच्या धावपाळीतही केसांची निगा राखण्याचे ओझे वाटेनासे झाले. गेल्या गणपतीपर्यंत छान कंबरेच्यावर पर्यंत वाढले. मग ठरवले की अजून एप्रिल मे पर्यंत जेवढे वाढतात तेवढे वाढवू आणि मग थांबू. पण मग नोव्हेंबर मध्ये अचानक कावीळ झाली आणि त्यामध्ये आलेल्या अशक्तपणात केस भराभर गळायला लागले. मला बाकी कशाहीपेक्षा संकल्प पूर्ण होणार नाही याचेच वाईट वाटू लागले. पण मग आमच्या फॅमिली डॉक्टर सरोज सोनारे यांनी 'भृगराज घन वटी' च्या गोळ्या घ्यायला सांगितल्या आणि खरच १५ दिवसात केसगळती आटोक्यात आली. मग जरासे बरे वाटले.
सरतेशेवटी शेवटचा पल्ला म्हणजे केस कापणे आणि विग बनवण्यासाठी देणे. ही फारच कॉमन गोष्ट आहे असे मला वाटले होते त्यामुळे आधी मी कधीच याची चौकशी केली नव्हती मग शोधता शोधता असे कळले कि पुण्यात अशी काहीच सोय नाही .
मग नेट वरून ही लिंक
https://www.copewithcancer.org/hair-donation) मिळाली आणि मग त्यांना केस पाठवले आणि आज त्यांची पोचपावती आली आणि खरच जीव भांड्यात पडला.
केसांचा प्रथम बो बांधून मग त्याची वेणी घालायची. खालून वरून रबर असलेली वेणी मग नीट राहते. पण बो जिथे बांधतो तिथे वरून केस कापावे लागतात त्यामुळे ते वेडेवाकडे कापावे लागतात. माझी building मधली मैत्रीण श्रेजल हिने आपले सर्व कसब पणाला लावून वेड्यावाकड्या केसांचा सुंदर haircut करून दिला म्हणून तिचेही आभार.
आपण जरी सद्भावनेने एखादी गोष्ट करत असलो तरी त्याच्या परिपूर्ततेसाठी खूप साऱ्या गोष्टी पार कराव्या लागतात आणि आज त्या संकल्पांची पूर्तता झाली म्हणून हा लेख प्रपंच. लहापणापासून 'नेकी कर और दर्या मी डाल' असे आईने मनावर बिंबवले आहे. एखादे चांगले काम करशील आणि त्याचा मनात जरी उच्चार करशील तर त्याचे श्रेय गमावून बसशील म्हणजे केलेल्या क्षणी ते विसरून जायचे असाच सुंदर संस्कार तिने नेहेमीच केलेला आहे पण आजची ही वेणीची गोष्ट जरा आईचा नियम मोडून एवढ्याचसाठी सांगते की Melanie च्या पोस्ट वरून प्रेरणा घेऊन मी हा संकल्प केला तशी प्रेरणा हा लेख वाचून कोणाला तरी मिळावी.
कोणाचे तरी हसू असेच कोणाच्या तरी सदिच्छेने फुलत राहावे. आपण कोणीच पूर्ण नाही असेच रोजच्या जगण्याला नव्याने आखत कोणाकोणाच्या आनंदात आपला खारीचा वाटा असावा आणि त्यासाठी जाणीवपूर्वक काही प्रयत्न करूयात.
माझा इवलासा बाळ जरा या धक्क्याने नाराज झाला होता कारण त्याला काही केल्या मी नेमके काय करणार आहे ते imagine होत नव्हते म्हणून केस कापायला मुद्दामून घेऊन गेले आणि मग आप ल्या आईला हा नवा haircut बरा दिसतोय आणि मुख्य म्हणजे ती खूप आनंदी आहे याने त्याची नाराजी दूर पळाली आहे...
आज दूरवर बाप्पाकडे राहायला गेलेली माझी आजी आजच्या माझ्या या केस कापण्याला नक्की आनंदाने आशीर्वाद देईल... आणि माझी आई , माझ्या केसात आपापला जीव अडकवलेल्या , माझ्या बहिणी, माझ्या शाळेतल्या मैत्रिणी , आत्ताच्या युगंधरच्या मित्रमैत्रिणींच्या आई असलेल्या मैत्रिणी यांनाही हा धक्का नक्की समाधान देईल अशी आशा करते....माझ्या या संकल्पात माझ्या सासूबाई सौ. वैजयंती रुकडीकर- देशपांडे यांचा भावनिक आणि कृतिशील वाटा आहे म्हणूनच हे दान आम्हा दोघींच्या वतीने ईश्वरचरणी अर्पण करतो आहोत आणि कोणाच्यातरी सुंदर हास्याची मनःपूर्वक कामना करतो आहोत....
शुभम भवतु... शुभम भवतु... शुभम भवतु !!!!


No comments:

Post a Comment