Sunday, 23 August 2020

कृष्णमयी...

  •  
     
    ग्लानीतून तिला जाग आली तेव्हा उन्हं उतरंडीला लागली होती... आताशी आपल्या सवंगड्यांसवे, गाईगुरांना घेऊन येईल तो. 
     
    'आज काय खाऊ केला आहेस लवकर दे बघू.. ' म्हणून भवती पिंगा घालेल आणि काय करू अन काय नको असे होऊन जाईल आपल्याला...
     
    अशी काय जादू आहे त्याच्या डोळ्यात अवघे जग विसरून रमून जातो आपण.
    खरेतर दटावयाचे असते त्याला उशीर केल्याबद्दल,
    दुपारी यमुनेला गेल्यावर सर्वांसमोर वाट अडवल्याबद्दल, कोणाकोणाच्या घरी जाऊन लोण्यावर ताव मारल्याच्या उगा कथा केल्या बद्दल!
     
    पण आपल्या शब्दात असे गारुड भरतो की ऐकतच राहावेसे वाटते. स्थळ , काळ , वेळाभान सगळंच कसं विसरून जातो आपण तो आला की!
    आणि तो सोबत नसताना सर्वांसोबत अन मनातही त्याच्याच गोष्टी करत राहतो.
    एकदा चुकून निघून गेलं बोलताना 'खूप मोठ्या माणसांसारख्या गोष्टी करतो' आणि या कानाचे त्या कानी होताना 'तो तिला हवे तेव्हा मोठे होतो' च्या व्यर्थ वल्गना झाल्या.
     
    किती रडलो आपण त्या दिवशी! दिवसभर वाट पहिली धास्तावून ....
     
    आला तर काय होईल आणि नाही आला तर अजूनच काही होईल..
     
    आणि आला तो नेहेमीसारखा हसत नाचत... आपल्या इवल्या हातात हनुवटी धरून म्हणाला
     
    "बरं झालं की लोक असं बोलताहेत. होऊनच टाकतो की मोठा आणि मग करून टाकू लग्न बिग्न"
    तिला एकदम हसूच आले.
     
    "लग्न बिग्न ? ते काय असते ते माहिती तरी आहे का वेड्या मुलाला?चल खाऊ केलाय तुझ्या आवडीचा.मित्रांनाही बोलाव. खूप सारा केलाय. सर्वजण मिळून खा."
     
    "कधीतरी तुझ्याही आवडीचा खाऊ करत जा की. तोसुद्धा तितक्याच आवडीने खाईन. किव्हा मीच करत जाईन. यालाच म्हणतात लग्न....."
     
    खट्याळ हसू मिरवत स्वारी निघूनही गेली आणि आपण वेड्यासारखे विचार करत राहिलो ....
     
    पण ही ग्लानी कसली ?
    आता नेमका कसा दिसतो ...कसा हसतो.. काहीच कसं आठवत नाही..
    भ्रम .. संभ्रम कसलं दाट धुकं?
     
    डोळे उघडत तिने सभोवार पाहिले.
     
    आजूबाजूचा कण न कण निष्प्राण होऊन पडला होता...माणसं, झाडं, वेली, रस्ता ,गायीगुरं , सांजवारा स्तब्ध ...जीवघेणी शांतता ...वेळभानेची काळोखी पोकळी.... बाहेर पडण्याची वाट नसलेली...त्राण गळालेली ...
    असहनिय....असहाय्य..
     
    काही दिवसांपूर्वीची ती आर्त पहाट तिला आठवली...
     
    "का ग सानिका, तुझा स्वर आज असा व्याकुळ का?" तिच्या काळजात कळ उमटली.
     
    "माझं जाणं अटळ आहे... तुला कसं सांगू..."
     
    "कुठे जाऊ शकशील मला सोडून?"
     
    "दृष्टीभ्रमापलीकडे ..."
     
    "कित्ती गहन बोलतोस? आणि का बोलतो आहेस असं? हे असंच सारं व्हायचं होतं तर हे माझ्या अवघ्या अस्तित्वाच्या कुडीत न मावणारं वेड तू का लावलंस? "
     
    "तु उत्तर जाणतेस ... "
     
    त्याच्या डोळ्यातली निरव शांतता तिच्या हृदयाला पार चिरून गेली.
     
    आत्ताही तिला हे सारं आठवलं आणि वर्तमानाचा संभ्रम पडला.
     
    काही वेळापूर्वी असं रथाचे चाक अडवून उभे होतो आपण...
    एरवी आपल्या चेहेऱ्यावरच्या दुःखाच्या , अस्वस्थतेच्या एका पुसट रेषेनेही विस्कटणारा तो आज किती निश्चल, निश्चयी, ठामपणे रथ हाकायला सांगत होता.
     
    कोणीतरी त्याचे रूप घेतलेला बहुरूपी म्हणावा तर त्याच्या सुरेल अंतःकरणाचे सोंग कुणा पेलू शकेल...त्याचे सुंदर हृदय डोकावणारे लोभस डोळे कोण लेऊ शकेल?
     
    तोच होता... आणि त्यानं सांगितले होतं ...
    हे अटळ आहे ... त्याची आपली भेट जितकी अटळ ...तितकाच भेटीनंतर वियोगही .... आणि जीवघेणा विरहही..
    तात्पुरता ..की कायमचा ?
    कोण सोडवील हे कोडे...त्याच्याशिवाय कोण सोडवू शकेल..?
    पण तो...पोहोचण्याच्या सर्व शक्यतांच्या पार गेलेला..
     
    अजून काय बरं म्हणाला होता तो.?.. तिने कशोशीने आठवायचा प्रयत्न केला.
    पीळ पडलेल्या हृदयातून ,त्याच्या आठवणींच्या घनदाट जंगलातून..मनभर विखुरलेल्या त्याच्या अस्तित्वाच्या खुणा जोखत जाताना तो आता असणार नाही या भयाण जाणिवेला कसं सामोरे जायचं?
     
    आणि तिला आठवले..
    त्याचे आश्वासक डोळे .... तिच्या मनाचा ठाव जाणणारे... हृदयीचे गुज ऐकणारे...
     
    "माझ्या सानिकाचा इतका का दु:श्वास करतेस?"
     
    "ते तुला नाही कळणार...दु:श्वास नाही ... खूप हेवा वाटतो.. आपल्याला इतके निर्व्याज राहता येत नाही याचे ... इतके समर्पण कधी तरी शक्य होईल का आपल्याला याचे उत्तर 'नाही' मिळते त्याचे दुःख असते ते ... "
     
    "तुम्हाला दोघींना मिळून खरंतर 'मी' खेळावा लागणार आहे पुढे.. "
     
    "म्हणजे रे ?"
     
    त्याने नेहेमीप्रमाणे पाव्यावर ओठ धरले आणि काही काळापुर्वीचे गूढ बोलणे आपण विसरून गेलो...
     
    काय होता त्याचा अर्थ .?...
    मनाशी विचार करताना तिला अचानक अवसान आले आणि ती धावत यमुनाकिनारी गेली ..
    तिथे त्याच्या सुकुमार पाऊलखुणा रेतीत तश्याच उमटून राहिल्या होत्या ...
    तो नेहेमी बसायचा तो दगड आणि त्याची प्रिय 'सानिका'..
     
    तिला खूप भडभडून आलं ....
    सांजवेळा मावळतीला लागतानाचा कातर स्पर्श तिला सहन होईना ..
    आंतरिक उमाळ्याचे कढ रिचवत
    तिने बासरी हातात घेतली ...
     
    बासरीवर रेंगाळलेला त्याचा अमीट स्पर्श तिला कणभर उभारी देऊन गेला...
     
    तिने बासरी प्राणपणाने ओठाला लावली पण त्यातून सूरच उमटेनात ....
    तो तर सोबत आपले श्वासही घेऊन गेला....
     
    क्षितिजावर एक एक करत चांदणी उमटू लागली आणि काळोखात काही सावल्या भास वाटाव्या इतक्या ओळखीच्या ... तिला काही सांगू पाहणाऱ्या ... सुचवू पाहणाऱ्या ..
    आणि अजमावू पाहणाऱ्या..
     
    आणि दृष्टीभ्रमापलीकडे उभा होता तो ... तितकाच मिश्कील हसत ... आपले खट्याळ डोळे रोखून ...
    तिला हर्षोल्हासाचे भरते आले... आणि अधराच्या पाकळ्यांमधून मुक्त झालेला तिचा श्वास सानिकेसोबत संगीत खेळू लागला ...
     
    प्रेमविलापाचे आर्त स्वर ..वाऱ्यासोबत इतस्थत: पसरू लागले .. आणि तिच्या दुःखावेगाचे निरूपण होऊ लागले..
     
    दूर गेला तरी कुठे कुठे आणि किती किती भरून राहिला होता तो...
    आजूबाजू सर्वत्र आणि आपल्या आतही तोच .. ..
    इतके तादात्म्य इतकी एकरूपता तो असताना कधीच कशी जाणवली नाही?
    की समझावत होता तो हेच सारं आपल्या अगम्य भाषेतून आणि आपण मात्र आपल्या मायेच्या धुक्यातून .. निरर्थक बंधने माळून... बाहेरच पडू पाहत नव्हतो..
     
    आता मात्र सानिका मुक्तपणे आनंद बरसवत होती ... ती स्वतःच त्यात इतकी रंगली होती की जणू खऱ्याखोट्या कुठल्याच उत्सर्गाची गरजच मिटावी ...
    यमुनेच्या पाण्यात मंत्रमुग्ध लाटा अविरत खेळू लागल्या .. उमटणारे उत्कट जलतरंग...
     
    आजूबाजू वृक्ष , वेली , आणि अंधार लयबद्ध ...अवघा आनंद, काळ स्थानबद्ध ..
     
    उत्तररात्रीला पारिजात शुभ्र आनंद ढाळु लागला आणि ती भानावर आली ... ही इतकी सगळी जादू आपल्याला त्यानं कधी बरं शिकवली ?
     
    ती वेगात निघाली बेभान , सैरवैर .... आता थांबून चालणार नव्हतंच..
    वाटेतल्या प्रत्येक कणाकणाला , अणूरेणूला 'संजीवन भान' देत ... मृत , अवकळा आलेल्या प्रत्येकाला नवजीवन देत ..
     
    आणि पहाटेच्या पहिल्या प्रहरी 'त्याच्या जाण्याचा.. त्या दुःखाचा' विसर पडावा इतकं सारं पूर्ववत ... तिचा विश्वास बसेना ..
     
    त्याच्या विरहाच्या दुःखात चूर होताना हे पुनर्निर्मितीचे दान आपल्या ओंजळीत टाकून...
     
    शेजारी उभा तो...
     
    तितकाच सहज... 
     
    तितकाच निरागस...
     
    तितकाच 'तिचा'
     
    आणि
     
    ती त्याची 'कृष्णमयी'....