Friday, 12 July 2019

वेळभान आणि सजग-मिती


आमच्या घरातले सकाळचे रोजचे चित्र! रोज माझी कट्ट्याशी पोळी करायला उभी असण्याची आणि आमच्या बाईंची फरशी पुसायची वेळ एकच येते. प्रत्येक वेळी तिच्या कामात व्यत्यय येऊन तिचा वेळ आणि मुख्य म्हणजे कामाचा tempo मोडणार नाही याची काळजी घेत मी बाजूला होते किव्हा कधी पोळी तव्यावर असेल तर त्यांना 'थांबा हं २ min एवढी पोळी उतरवून बाजूला होते.' असे आवर्जून सांगते. त्या पण तसेच थोडेसे इकडचे तिकडचे पुसून घेत नेहेमीच adjust करतात जेणेकरून आम्ही दोघीही आपापल्या कामाचा tempo राखतो.
म्हटला तर साधासाच रोजचा प्रसंग, पण आज त्या स्वतःहून म्हणाल्या "अहो २च पोळ्या राहिल्या होत्याना . होऊ द्यायच्या होत्या मी थांबले असते की! "
त्यावर मी त्यांना म्हटले "अहो ही २ mins पण खूप महत्वाची असतात तुमची ते माहिती आहे मला. खूप काम असते ना तुम्हाला."
"हो ना रोज २-२:३० होतात घरी जायला. पण तुम्ही ताई मला कधीच थांबवत नाही." असे म्हणत त्या छान हसल्या.
आपल्या वेळेचा समोरच्याकडून होणारा आदर नेहेमीच मनाला सुखावतो आणि मग समोरची व्यक्तीही तुमचा वेळ आणि मन जपायचा तितकाच प्रामाणिकपणे प्रयत्न करते. व्यक्ती कितीही छोटी किव्हा मोठी असो तिला दिवसातले मोजून २४ तासच मिळत असतात आणि करत असलेले काम हातावेगळे करून मग थोडेसे का होईना विसावू असा प्रत्येकजण विचार करत असतो. म्हणून जेव्हा समोरच्याच्या कामात खारीचा वाटा किव्हा निव्वळ आपल्याशी निगडित असलेला वेळ कमी करण्यात जरी आपण थोडीफार मदत करू शकलो किव्हा तसे करण्याची भावना जरी प्रामाणिकपणे पोहोचवू शकलो तरी तो त्यांच्या मनाचा विसावा होतो. आपल्या थोड्याश्या जागरूकतेने आणि समोरच्याविषयीच्या आत्मीयतेच्या भावनेने असे किती तरी क्षण आपण सुखाचे करू शकतो. कारण मग वेळेची जपणूक फक्त वेळेचीच न राहता त्या त्या वेळी होणाऱ्या संवादातून होणाऱ्या भावनिक देवाणघेवणीची असते ही होत असते.
मी कंपनीत काम करायचे तेव्हा card recorders लागण्याआधी , gate वर I-Cards चे check up ही अगदी नित्याचीच बाब असायची ! पण काही जण मात्र इथून रोजच जातॊ तरी रोजच काय check करायचे असते असा तक्रारवजा नाराजीचा स्वर लावत, कधी gate शी थांबून मग guards नी विचारल्यावर मग बॅगेतून शोधून मग ते गळ्यात अडकवणार, मग त्याबरोबरीने स्वतःच्या आणि पर्यायाने security guard च्या दिवसाची सुरवात खराब करणार.
मी आवर्जून bus companyच्या जवळ आल्यावर आधीच card गळ्यात घालायचे . मग जेव्हा कार्ड तपासणीचा प्रसंग यायचा तेव्हा की स्वतःहून कार्ड पुढे करून मग बॅग उघडून दाखवायचे . ते checking चे अर्धे मिनिटे मग छान हसत खेळत संभाषण व्व्हायचे. काही दिवसांनी त्या सगळ्या माझ्या मैत्रिणीच होऊन गेल्या. खूप ओळखीचे झाले तरी card बघणे आणि चेहेरा न्याहाळणे हे सर्व त्यांच्या जोखमीच्या जॉब साठी आवश्यक असलेली प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून त्यांच्याकडून घडायचेच ! पण रोजच्या त्यांच्या सवयीच्या असलेल्या कामात मी माझाकडून थोडा स्वतःहून कार्ड दाखवण्याचा , बॅग उघडण्याचा हातभार लावताना , त्या संभाषणात शब्दांपलीकडचे 'We care for each other's time' असे जे काही exchange व्हयायचे जे मला महत्वाचे वाटायचे. कधी तरी मला call ला पळायचे चे असायचे तेव्हाचे नुसते हसूही मग माझ्या दिवसाची सुरुवात सुंदर करायचे.
Canteen मध्येही कॅश कॉउंटरवरचे लोक एरवीच खूप fast काम करतात पण काही लोक मोठी रांग असतानाही कॉउंटरशी पोहोचल्यावर मग आरामात मेनू पाहत मग पाकीट काढून मग पैसे काढतात. रांगेत उभे असतानाच एक नजर मेनूवर टाकून आपल्याकडे नेमके सुट्टे पैसे आहेत किंवा बंदे रुपये आहेत याचा अंदाज घेत कॉउंटरवर थेट व्यवहार केला तर counter वरच्या माणसाचे २ क्षण आपण विसाव्याचे करू करू शकतो ना. कोणी म्हणेल ते त्यांचे कामच असते आणि अश्याने असा कितीसा वेळ rather अश्या seconds च्या वाचवण्याने नेमके काय होणार आहे. पण मला वाटते माणसाला नेहेमीच हा काही सेकंदांचा का होईना 'Me Time' हवा असतो. आणि कोणीतरी आपले काम सुसह्य करण्यासाठी छोटासा का होईना प्रयत्न करते आहे ही भावनाही सुखावह!
एकदा माझी आतेभावाची बायको वैशालीवहिनी पहिल्यांदाच घरी आली होती, टेबलाशी बसत आईशी गप्पा मारत तिने सहज भांड्यात ठेवलेल्या मटारच्या शेंगा सोलायला सुरुवात केली.
आईने "अग हे काय पहिल्यांदाच आली आहेस आणि काम कसले करतेस?" असे म्हणताच सहज म्हणाली
"अहो फार काही नाही करत आहे मी . आणि गप्पा मारताना होऊनही जाईल. तेवढीच जरा ५ मिनिटे तुम्हाला मोकळीक."
तेव्हाही कामापेक्षा कोणीतरी आपला विचार करते आहे, माझ्या वेळेचा विचार करते आहे ही भावना आईला नक्कीच सुखावली असेल आणि वैशालीवहिनी हे विसरूनही गेली असेल पण या साध्याशाच वागण्यातून प्रतीत होणारा समोरच्याविषयीचा जिव्हाळा हा एक गोड आठवण म्हणून आम्हा सर्वांच्याच लक्षात राहिला.
एरवी आपण आपल्याच विश्वात रममाण असतो आणि आजकाल तर watsapp आणि facebook सारख्या आभासी जगात वेळेचे भान आपण खरोखरीचेच हरवून आहोत असे वाटते. एक आयुष्य आणि त्यातला एक एक क्षण किती खास आहे ही जाणीव हरवत चालली आहे. वेळ सरणे आणि वेळ सारणे यातला फरकच आपल्याला कळेनासा झाला आहे. मान्य आहे, रोजच्या एक मिनिटही इकडे तिकडे हलवू न शकण्याच्या गच्च routine ने भरलेल्या दिवसात आपणच आपले विसाव्याचे क्षण शोधत राहतो पण हा विसावा म्हणजे क्षणभराचा न होता आपण त्यातच हरवून जातो आणि मग वेळच नाही असा बाऊ करत राहतो .
मध्यंतरी एक छोटासा लेख वाचनात आला . त्यात एक प्रसंग सांगितलेला होता . एक आजोबा बऱ्याच वेळ एक चेक हातात घेऊन एका रांगेत उभे होते. आणि कॉउंटरशी गेल्यावर काउंटरपलीकडील माणसाने त्यांच्या लक्ष्यात आणून दिले की तो चेक दुसऱ्या बँकेचा आहे. त्यांचा मोलाचा वेळ आणि रांगेत उभे राहण्याची शक्ती वाया गेली होती. पुढे मागे उभे असलेल्या एकाने तरी सहज लक्ष दिले असते तरी हे खरच टळण्यासारखे होते पण आजकाल वेळ मिळेल तेव्हा कुठेही असले तरी लोक खरच watsapp , facebook किव्हा game खेळू लागतात. यासर्वात आपण छोट्या गोष्टी हुकतो आहे ,आजूबाजूचे आत्मभानच हरवतो आहे असे नाही का वाटत?
आपल्या अस्तित्वाच्या त्रिमितीला वेळेचे चौथे परिमाण लावताना आजूबाजूच्या चाललेल्या गोष्टींमध्ये आपण नेमकी काय भूमिका बजावू शकतो याचे सजग भान आपल्याला यायला हवे , थोडासा स्वतःचा वेळ मोडून समोरच्याचे काही क्षण सुसह्य व्हावे यासाठी जाणीवपूर्वक कृती करण्याचा प्रयत्न मात्र करायला हवा. आणि मग असे कुठल्याही आभासी माध्यमांचे अंकित नसलेले मोकळे क्षण केवळ मनातच साठणाऱ्या आणि कधीही हाताशी लागणाऱ्या आठवणी बनून जातील.
मीपणाच्या कक्षा जराश्या रुंदावत कोणासाठीतरी वेचलेले काही साधेसेच क्षण तुमची स्वतःची ओंजळ नक्कीच आनंदाने भरतील!

#मेधालाडदेशपांडे
#TimeisMuchMoreThanMoney
#मीपणाच्याकक्षा

आपला माणूस आणि रोजच्या जगण्यातली प्रेरणा

एकुणातच यंदाची निवडणूक , त्याची प्रचार भाषणे , exit polls आणि आजचा निर्णायक दिवस या सर्वाचाच मिळून गेले २-३ महिने एक जल्लोषाचा माहौल बनून राहिलेला आहे. राजकारणाशी रोजचा संबंध नसलेला सामान्य माणूसही ही आपलीच लढाई असल्यासारखा जिकंण्याचा उत्साह अनुभवतो आहे. हा विजय त्याला आपला वाटतो आहे.
आपल्यासाठी कोणीतरी चांगला विचार करतो आहे , त्यासाठी विविध योजना त्याने खूप साऱ्या अडथळ्यांच्या शर्यती पार करत अमलात आणल्या आहेत. भलेही त्यातल्या काहींची आत्त्ता सुरुवात आहे , त्याची फळे चाखायची आहेत पण कोणीतरी स्वार्थापुढे राष्ट्रहिताच्या विचार मोठा ठरवत आपला विचार करतो आहे हेही त्याच्यासाठी खूप महत्वाचे आहे. स्वतःच्या सय्यमशील , अनुकरणीय वर्तनाने जणू त्याने 'राष्ट्रभक्ती' जनमानसात फुंकली आहे जेणेकरून आपापले काम नेटाने, प्रामाणिकपणे करण्याची प्रेरणा आज जागली आहे.
निवडणूक निर्णय अंतिम टप्प्यात असतानाही माध्यमे , आणि रस्त्या रस्त्यावर लोक हा उत्सव आधीच मनवत आहे. एवढे प्रेम आणि आपुलकी क्वचितच कोणा नेत्याला मिळाली असेल.
ही जादू घडवून आणणाऱ्या माननीय पंतप्रधान मोदी यांना मनःपूर्वक मानाचा मुजरा व हार्दिक अभिनंदन!🙏🙏🙏😇
सत्तेवर आल्यापासून पहिल्या दिवसापासून किम्बहुना त्याही आधी पासून समर्थकांच्या अपेक्षा , विरोधकांचा विरोध , दुर्बीण घेऊन त्यांच्या प्रत्येक कृतीची न्याहाळणी, तपासणी , आरोप , टीका यासर्वांना ते पुरून उरले आहे आणि तितक्याच ताकदीने चोख अंमलबजावणी करत प्रसंगी जनरोषाचा धोका पत्करत कितीतरी योजना राबवल्या आहेत. आणि म्हणून हा जल्लोष कोणीतरी 'आपला माणूस' जिंकल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. हा प्रत्येकाला भावनात्मक विजय वाटतो आहे.
एरवी मी राजकारण या प्रकारापासून चार हात लांब असते पण मोदीजींची भाषणे आणि मुलाखती आवर्जून बघते कारण त्यातून मला रोजच्या जगण्याला प्रेरणा देणारे खूप काही सापडले आहे. त्यातले काही आजच्या दिवसाचा जल्लोष म्हणून.
एका कुठल्याश्या लोकसंवादात एका कॉलेजातल्या तरुणाने मोदीजींना विचारले
"तुम्ही एवढे अथक काम करता. अजिबात सुट्टी घेत नाही. खूप सारा प्रवास करता. जाईल तिथल्या लोकांसोबत संवाद साधता. तुम्ही नेमके काय खाता आणि थकत कसे नाही?"
त्याचा हा निरागस प्रश्न ऐकून पूर्ण सभागृह हसले. मोदिजीही हसले आणि म्हणाले
"अरे मी एक नाही दोन नाही पाच पण नाही रोज लोकांच्या २० किलो शिव्या खातो."
असे म्हणताच सारे सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेले.
खरच चांगले काम करणाऱ्या या माणसाला रोजच कितीतरी आरोप , टीका , निंदा सहन करावी लागते. विरोधक विरोध करायचे थांबत नाही आणि हा माणूस त्य
गोष्टींना सकारात्मकपणे हाताळत आपले काम नेटाने करत करत राहतो.
कोणी त्यांना 'चौकीदार चोर है' म्हणत अवहेलना केली त्यांनी त्याचे 'मै भी चौकीदार' आंदोलन करून टाकले आणि देशभरात सर्वच जण चौकीदार बनून काम करू लागले.
कोणी त्यांना 'चायवाला' म्ह्णून हिणवले त्यांनी त्याची 'चाय पे चर्चा' सुरु करून टाकले.
कोणी त्यांचे स्वागत काळे झेंडे दाखवून केले त्याला त्यांनी 'नजर लागू नये म्हणून आईने लावलेला काळा टिका' करून टाकले.
कोणी म्हणाले 'Modi Go Back' त्यांनी 'मला पंतप्रधानपदासाठी परत जायला सांगताहेत' म्हणून टाकले.
एका मुलाखतीत त्यांना विचारले "आम्हा सामान्य माणसांना काम करून जेव्हा कोणी टीका करते तेव्हा खूप वाईट वाटते. तुम्ही ही दररोजची टीका कशी हाताळता"
त्याला त्यांनी दिलेले उत्तर रोजच्या आपल्या जीवनात आपण टीका कशी स्वीकारावी याचेच द्योतक आहे.
"एवढा मोठा देश आहे एवढे मोठे काम आहे तर टीका होणे खूप महत्वाचे आहे. कारण त्यातून कमतरता पुढे येतात त्यावर तुम्ही काम करून प्रगती करू शकता. खरे पहिले तर टीका खूपच कमी होते आहे. कारण आपल्या इथे टीका नाही आरोप होतात आणि विरोधासाठी विरोध होतो याचे दुःख आहे. टिकेकडे मी लक्ष देत नाही"
खरंच टीका आणि आरोप यांचे योग्य विश्लेषण करता आले की प्रगती ही किती ऑटोमॅटिक आहे नाही.
टिकेकडे लक्ष्य देत नाही हे म्हणणे सोपे आहे पण ते प्रत्यक्षात आणणे, गेल्या ५ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेता आणि तोच वेळ खरे काम करण्यात सत्कारणी लावणारा नेता म्हणून मोदीजी खरच अनुकरणीय आहेत.
'तुम्ही नेमके काय खाता आणि थकत कसे नाही?' या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी एक सुंदर रूपककथा सांगितली.
एकदा हिमालयात एका तळ्याकाठी एक संन्याशी तप करत बसलेले असतात. तिथल्याच एका छोट्या टेकडीवर त्यांना एका ८ वर्षांची मुलगी आपल्या ३ वर्षांच्या भावाला पाठीवरून घेऊन जाताना दिसली.
"बेटा तुला ओझे नाही होत आहे का ?"
ती हसत म्हणाली "हा तर माझा भाऊ आहे."
"बेटा मी तुला तो कोण आहे ते नाही विचारत नाहीये. तुला ओझे नाही होत आहे का "
ती परत हसत म्हणाली "स्वामीजी , हा तर माझा भाऊ आहे."
थोडेसे चिडून त्यांनी तिला परत विचारले "बेटा अग मी तुला केव्हापासून विचारतो आहे तुला त्याचे ओझे नाही होत आहे का ?"
ती खूपच हसायला आले "स्वामीजी , हा तर माझा भाऊ आहे. याचे ओझे मला कसे वाटेल?"
पूर्व देशाची विश्वासार्हता आपल्या पाठीवर वाहून नेऊन देशाला आशेचा नवा सूर्य दाखवणाऱ्या , त्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अहोरात्र अविरत कष्ट करणाऱ्या मोदीजींना पुढील कार्यकाळासाठी म नःपूर्वक शुभेच्छा व अभिष्टचिंतन!🙏🙏🙏
सर्व देशवासीयांचे प्रेम आणि पाठबळ असेच तुम्हाला कायम मिळत राहो!!🙏
- सौ. मेधा कौशल देशपांडे
#मेधालाडदेशपांडे #narendramodi #namonamaha