मुर्डीचे विना काका म्हणजे खरच एक गंमत रसायन होते. मी चौथी मधे असताना ते आणि त्यांचे कुटुंब आमच्या शेजारी राहायला आले. जेमतेम ४-५ महिनेच राहिले ते त्या घरात. पण तेवढ्या सहवासामध्ये इतके जिव्हाळ्याचे स्नेहबंध जुळून आले की माझ्या लहानपणीच्या आठवणींमध्ये गोड आठवणींचा एक महत्वाचा भाग बनून राहिले आहेत ते दिवस . दहावी नंतर दापोली सुटले तशी भेटीगाठी आणि संवाद विरळ झाले पण त्या संस्कारक्षम दिवसातल्या काही गोष्टी अजून सोबत करतात. त्यातलीच एक गम्मत गोष्ट. म्हणावी तर अगदी छोटुशीच पण सोप्पे तत्वज्ञान शिकवणारी…
त्यांचा मोठा मुलगा म्हणजे विनोद दादा ३ वर्षांचा असतानाची ही गोष्ट आहे.घरी एक कुठलासा कार्यक्रम होता आणि बाबांनी बाळाच्या बोटात छोटीशी सोन्याची अंगठी घातली. छोटूश्या मुलाला मोठ्यांसारखी अंगठी मिरवताना कोण आनंद झाला. पण थोड्याश्या वेळाने पाहतात तर अंगठी गायब! खूप शोधूनही मिळेना आणि एवढ्या छोट्या मुलाला रागावताही येईना. सगळे जण कामाला लागले आणि सगळ्यांची गडबड, उतरलेले चेहेरे पाहून बाळराजे म्हणाले ," जावूदे ना बाबा नाहीतरी सैलच होत होती…नीट खेळताही येत नव्हते… "
तेव्हा अर्थात वयही नव्हते या साध्याश्या गोष्टीमागे दडलेले महत्वाचे तत्पार्य कळण्याचे … पण सोन्याच्या अंगठीसारखी मौल्यवान गोष्ट हरवण्याची गोष्ट हसत हसत सांगणारे बाबा मला जामच आवडले होते तेव्हा. लहानपणीच्या गोष्टी, त्यातल्या प्रसंगांमधले छोटे छोटे कांगोरे मनावर कायमचे कोरले जातात. ही गोष्ट सांगतानाचा विनाकाकांचा गोष्टी पल्याडचे काही तरी सांगू पाहणारा ,भरल्या डोळ्यांनी हसणारा चेहेरा कायमचा आठवणीत राहिला आहे…
कधी आपली बोटे छोटी असतात तर कधी अंगठी आपल्या मापाची नसते… त्यासाठी बोटे मोठी करणे किंवा आपल्या मापाची अंगठी शोधणे हा सकारात्मक विचारसरणीचा उपाय झाला तरी प्राप्त परिस्थितीत हातातल्या सैल अस्वस्थ अंगठीचा शोध घेणे आणि मनात किंतु न ठेवता त्याग करता येणे ही खरी परीक्षा …
प्रत्येक नोकरी करणाऱ्या आईचा घालमेल विषय म्हणजे आपल्या लहानग्याला न देता येणारा वेळ… बाळाच्या जन्मानंतर शारीरिक-मानसिक बदलांसोबत आई, गृहिणी, नोकरी या साऱ्या अपरिहार्य जबाबदाऱ्यांची तारांबळ वागवताना येणारे अपराधीपण ही अपरिहार्यच… माझीही गोष्ट वेगळी कशी असेल?
युगंधर १० महिन्यांचा झाला आणि मी नोकरीत परत रुजू झाले.घरी प्रेमाने करणारी लाडकी 'जिया' म्हणजे माझ्या सासूबाई आणि 'आबा' म्हणजे 'सासरे होते त्यामुळे त्याची चिंता नव्हतीच. प्रश्न खर तर माझाच होता. Technical issues चे challenge प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असतेच या श्रद्धेने शोधणारी मी work आणि life सोबत हे नवीन emotional dimension कसे हाताळते याचा.
होता होता या नवीन routine ला सगळेच रुळलो. मग office मध्ये नेहेमीचे काम सुरु झाले. IT चे काम म्हणजे कधी कमी तर कधी भरमसाठ! मधला सुवर्णमध्य असणारे दिवस, वेळा तश्या विरळाच. एवढे दिवस project deadlines आणि releases या प्रमाणे स्वत:चे आणि घराचे timetable वाकावलेले. नवराही software मधलाच सहप्रवासी त्यामुळे लग्नानंतर परस्पर सामंजस्याने सारे सुरळीत पार पडलेले. पण आता होणारा उशीर, कितीही समर्थनीय असले तरी त्यामागचे कारण छोट्याश्या बाळाला कळणारे नव्हतेच. आणि रोजचे घरी यायचे बदलणारे वेळा पत्रकही मान्य होणारे नव्हतेच.
कधी कधी वेळ झाली म्हणून निघताना, आपले काम colleagues वर सोपवताना अपराधी वाटायचे तर कधी वेळेत बसणार नाही म्हणून एखादे challenge डोळ्यासमोरून दुसऱ्या हाती जाताना उगीच चुकल्यासारखे व्हायचे. आठवायचे आपण कधीतरी उगीचच आपल्या जुन्या कुणा projectmate मैत्रिण-आईचे समझून न घेता कपाळाला घातलेली आठी!
आणि सगळ्यात तुटायचे जेव्हा उशिरा कधी घरी आल्यावर अंगणात आजोबांच्या कडेवरच्या युगंधरच्या चेहेऱ्यावरचे आसुसलेले भाव! आजी आबा दिवसभर जराही रडू न देता सुंदर सांभाळायचे पण संध्याकाळच्या वेळी आईच हवी असण्याची असोशी पुरी होत नाही ना!
वाटायचे बाकीच्या मुलांना आपापल्या आईसोबत खेळताना पाहून त्याला नेमके काय वाटत असेल? TV वर एखाद्या जाहिरातीतल्या मुलाला 'mummy , mummy ' म्हणत पळत बघताना याला आपली कित्ती आठवण येत असेल? सांगता येत नाही किंवा छोट्या बाळांची काहीही बोलण्याची भाषा रडू रडूच असते म्हणून त्यातला नेमका संदेश आपण अव्हेरतो आहोत का? Quantity time पेक्षा Quality time चा आपण आपल्यासाठी आधार घेतलेला concept एवढ्या छोट्या बाळाला कसा बर कळणार आहे? मनासारखे झाले की खुदुखुदु हसायचे आणि नाही झाले तर 'ट्याट्या' करत भोकाड पसरायचे एवढेच समजणाऱ्या बाळाकडून आपण नेमक्या कुठल्या समजूतदारपणाची अपेक्षा करतो आहोत. बाळाने एखाद दिवशी खूप भोकाड पसरले तर जास्त अपराधी वाटते का समझुतीने घेतले आणि रडे थांबवले तर आपल्याला जास्त रडू येते याचे उत्तर शोधणे खरच कठीण आहे कुठल्याही आईसाठी.
आजुबाजू पाहिल्या तर खूप मैत्रिणी भेटल्या, समवेदना असलेल्या! कोणी द्वंद्वात अडकलेल्या, सैरभैर , कोणी आपल्या career ची महत्वाची वर्षे आहेत तेवढी जर कळ सोसू या बद्दल ठाम असलेल्या,कोणी अश्याच आला दिवस निभला पण काही बदलासाठी भांबावलेल्या.
वेदना सारखी असली तरी प्रत्येकाची गोष्ट वेगळीच म्हणून उत्तरही वेगळेच. एकीचे solution दुसरीला total गैरलागू.कोणी आपल्या ऑफिसच्या वेळा बदलून घेतलेल्या कोणी part time काम करत होते कोणी work from home करणाऱ्या. काहींना तर घराचा हा मोठा आर्थिक भर डोक्यावर, मनाला काय वाटते आहे ते विचार करायला वावच नाही.
मला तर अश्या दोन्ही ठिकाणी अर्धवट भूमिका निभावण्याचा फारच ताण पडायला लागला. दोन वजा म्हणजे एक धन असे गणिती नियम इथे मात्र लागू होत नव्हते. एरवीही वेळ पाळण्याबाबत मी आग्रही होतेच पण घड्याळाच्या काट्यामागे धावताना माझा काटा थोडा दुराग्रहाकडे झुकतो आहे असे मलाच जाणवू लागले. नाचामध्ये कितीही मन रमले तरी office ची वेळ झाली की तिकडे पळ घरची वेळ झाली तिकडे पळ. आई झाल्यावर प्रत्येक मुलीची सिंड्रेलाच होते घड्याळाच्या काट्यांचेच बूट घालून पळणारी!
कोणी colleague कधी म्हणायचाच,"थोडा chill लो मेधा ,कितना दौडती हो और साथमे हमे भी दौडाती हो.५ minutes मे जिंदगीमे क्या फरक पडता है तुम्हारे…"
'Chill कसे घेणार राजा. इथला ५ minutes चा उशीर माझा traffic चा रस्ता १ तासाचा करतो' सिंड्रेलाची वेळ पाळण्याची अगतिकता तीच जाणे.
आपल्या आईच्या पिढीने ही केल्याच की नोकऱ्या. पण त्यांना वेळेचे एक बंधन होते. आपल्यासारखे कधी officeच्या हाती तर कधी traffic च्या हातचे बाहुल्या मात्र त्या नव्हत्या. घराचा उंबरठा ओलांडण्यासाठीचा त्यांचा संघर्ष मोठा आहेच, त्याबद्दल खूप आदर आहे मला पण दिवसाच्या २४ तासात सारे काही त्यातला वेळ खावू गोष्टींच्या शक्यतांसकट चपखल बसवण्याचे आव्हान हा आपल्या पिढीचा संघर्ष.
कधी वाटायचे हे आपले शिक्षण, त्यासाठी आपल्या आई बाबांनी काढलेले कष्ट, ही नोकरी, आताचे आपले स्थान, आर्थिक स्वावलंबन... हे सारे मिळवण्यासाठी केलेली धडपड या सगळ्याचे काय मग? कधी तरी स्वत:शीच विचार करताना उमगत गेले की या सगळ्या गोष्टी माझ्याकडून कोणीच हिरावून घेवू शकत नाही. त्या माझ्यातच सामावलेल्या आहेत. मी break म्हणून जरा विसावले तरी त्या तश्याच राहणार आहेत. फक्त बाळाचे बाळपण काही दिवसांनी मोठे होणार आहे. काही दिवसांनी नाहीच लागणार आहे त्याला आई प्रत्येक ठिकाणी. आईचे बोट धरून जगात बाहेर पहिले पाऊल टाकताना मात्र त्याला ती हवी आहे.'जाऊन बघ जरा पूढे मी इथेशीच उभी आहे हं मागे' असे सांगताना कधी त्याने मागे वळून पाहिले तर त्याला ती खरोखरीची दिसायला तर हवी ना !
मग ठरवले थांबावेच जरा थोडेसे …
सोन्याची असली म्हणून काय झाले या सैल अंगठीमूळे खेळाची मज्जा तर मुळीच येत नाहीये.
आईपणाच्या नवेपणाच्या मंतरलेल्या दिवसांसाठी काही दिवस उतरवून ठेवूयात की अंगठी हरवण्याआधीच.
थोडं स्वतःसाठी आणि थोडं पिल्लुच्या मनात कायमच्या कोरल्या जाणाऱ्या पहिल्यावहिल्या आठवणींसाठी ...
थोडे दिवस विसरून जावूयात की सिंड्रेला असणे…जरा थांबूया विसावूया या वळणावर…
असेही होवू शकते कदाचित थोड्या दिवसांनीही नाहीच बसणार ही अंगठी आपल्याला … पण हरकत नाही तिलाच जरा सोनाराकडे जावून तासून घेवू किंवा न जाणो एखादी वेगळीच अंगठी आपली वाट बघते आहे भविष्यात…
मला माहित आहे युगंधर शाळेमध्ये रमल्यावर सध्याची ही अंगठी मला सैल/घट्ट अस्वस्थ होणार आहे त्यासाठी माझ्या मापाची अंगठी मी शोधतेच आहे पण सध्यातरी सोनुल्या चिमुकल्या बोटांची अंगठी माझे बोट मानाने मिरवते आहे… विनाकाकांच्या डोळ्यातल्या पाण्याचा अर्थ आज नव्याने उमगतो आहे…
