'अग सांगलीच्या आजीकड्चे चंदनाचे झाड़ चोरीला गेले ...'
आई तिकडून फ़ोन वर सांगत होती.
'म्हणजे?'
'अग तुला माहिती होते का आजीच्या दारात चंदनाचे झाड़ होते ते?'
असे काही झाड होते अणि मला ठावुक नाही seems just impossible....
शाळेच्या सुट्या सुरू झाल्या की दुसर्या दिवशी आम्ही दापोली -मिरज गाडीवर स्वार होवून सांगलीच्या मार्गाला लागायचो... शेवटचा पेपर लिहिताना मन तर केव्हाच मामाच्या गावी पोचलेले असायचे...
सुट्या लागल्या की सगळे गावाकडे पळतात पण माझे आजोळ सांगलीला त्यामुळे सुट्टीला शहरात अशी गंमतच....
सकाळची ९:४५ ची गाडी संध्याकाळच्या उतरत्या उन्हात घरी पोचवायची..
अणि मग दूसरा दिवस चालू झाला की आमची फौंज झाडांवर बागडायला...
आजीकडची झाडेच तशी होती.. वानर सेनेला भुलवणारी..
पेरू, आंबा , जांभुळ, अंजीर,नारळ,सीताफळ, डाळिंब...खुप सारी फुलझाड़े अणि गेटवर तुरीच्या
शेंगांची वेल...आणि शेवग्याच्या शेंगा..
आजी, मामा, मामी इतकीच ही सगळी झाडे माझ्या खासच ओळखीची...
घराची जागा तशी लहानच ... पण सगळी झाडे आजीने माणसां इतकीच प्रेमाने जपलेली.. आणि वानर सेना आता काय धुडगुस घालते आहे या कड़े मात्र आजीचे बारीक़ लक्ष... खास गोव्याच्या स्टाइल मधे आम्हाला अशी झाडायची आजी...
पण या सार्या पसार्यावर नजर फिरवून सुध्दा कुठे चंदनाचे झाड आहे ते मला आठवेंना ...
आणि मग मी भानावर आले..
शाळेत असतानाच्या मे महिना आणि दिवाळीच्या तुडुंब सुट्ट्या कॉलेज सुरु झाल्यापासून
वर्षाकाठी १-२ संख्येपर्यंत रोडवलेल्या. त्याही वीकेंड आणि जोडून आलेल्या सुट्टीच्या .. त्या मधे माणसांचेच मनसोक्त भेटणे व्हयायचे नाही तर बागेतली झाडे तर दुरचीच ..
गावातला गणपति, नातेवाईक , आईची मैत्रीण असे सगळे नॉन स्टॉप झटपट .. पुण्याला निघायची वेळ कधी येवून ठेपयाची ते कळायचेच नाही....
निघताना जाणवायचे ..की आंगण कट्यावरच्या गप्पा तश्याच राहून गेल्या आहेत.... झाडाना गोंजारणेही..नाही म्हणायला एखाद फेरी बागेत ,गच्ची वर व्ह्यायची .. बदललेले काही-बाही डोळ्यानी पाहिले .
पण मनाने त्याची पोच घेतलीच नव्हती ...ते बिचारे त्याच्या जुन्या जगातच खुश होते...
अश्याच विखुरलेल्या चतकोर आठवणींमधून मी चंदनाच्या झाडाला शोधण्याचा प्रयत्न केला...
पण एवढ्या अमूल्य तोडिचे काही मनात टाकलेले आठवेच ना ... .
'नाही ग ..मला कधीच नाही जाणवला त्याचा वास कधी ..'
'अग चंदनाचा सुगंध बुंध्या मधे असतो, आणि झाड मोठे झाले की तो येतो...'
म्हणजे गेले २-3 वर्ष सांगलीला पाय लागलेले नाहीत... आजी कितीदा बोलावते पण आठवड्याचे ५ दिवस आणि कधी कधी तर ७ दिवस मान मोडून काम केल्यावर हातात आलेले शनिवार रविवार मला घराची पायरी उतरू देत नाहीत ... आजीच्या वयाला आणि प्रेमाला ते कळतच नाही .. ती चिकाटीने बोलवत राहते ..
दोन वर्षापूर्वी माड गेला ते सांगतानाचा आजीचा दुखरा चेहरा मला पुन्हा पुन्हा आठावू लागला.....
आणि मग तिच्या थकलेल्या डोळ्यातच मला सुसाट वेगाने pass झालेला time, 'Past times' झालेला दिसू लागला.
वेळेला - दिवसाना एवढा वेग असतो...??? एक अख्खे झाड अंगणात रुजुन मोठे होऊन ते लोकाना कळून त्यानी चोरून न्यावे आणि आपल्याला ते कळूही नये एवढा???
मला त्या झाड चोरणार्या लोकांचा हेवा च वाटायला लागला .. त्याना त्याच्या अस्तित्वाची जाणीव होती..
'अग पण असे अंगणातले झाड कसे चोरीला गेले....'
'रात्री चोरले... आजीला आवाज आला थोडा पण मामाला उठवून बाहेर जाईपर्यंत ते लोक गेले होते...'
आजकल चोरीला काय काय जावू शकते याची लिस्ट रोजच अपडेट होवू लागली आहे...
काय काय म्हणून घरात नेवून ठेवणार ? घरातलेच कशाला मनात असलेले ही कुठे आपण लपवून वाचवून ठेवू शकतो आहे ? हाताशी आहेच असे वाटत असताना सर सर सरकणारा वेळ आपल्याच डोळ्यांसमोर कोणी तरी चोरून नेतो आहे....अणि हे सगळे थांबून थोड़े निस्तारयाला हवे आहे ही जाणीव ही...
आता जागे राहून पहारा द्यायलाच हवा..
नाहीतर परत चंदन बहरेल ही...
पण ताशी १ दिवस या वेगाने चाललेली आपली आयुष्ये ....धावपळीच्या अंदाधुंदी मधे ,
झुळकून गेलेले अवचिता परिमळु आणि त्याचे अळूमाळुपण यांची गाज विसरून जातील..
चंदनाच्या झाडाला जपायलाच हवे....

