Friday, 21 May 2010

फ़्रॉक मधली मुलगी ...


काल शाळेतल्या एका मित्राशी बोलत होते.. शाळेत जरी ’कधी बाई संपणार शाळा आणि मोठे होवू’ असे व्याकूळतेने (:)) वाटत असते तरी नंतरच्या आयुष्यात कळत जाते की तेच सर्वात सुंदर दिवस असतात.. त्या निरागस वयात जग-बिग प्रकार छोटा असतो.. आणि म्हणूनच कदाचित आनंदाच्या वाटा लवकर सापडत असाव्यात.. :)

शाळेच्या आठवणींमधे भिंगरु शकतेच गरगर .. पण त्या निमित्ताने एक ’परिसस्पर्श’ गोष्ट.आठवली ती पहिले लिहिते...

तर माझा हा शाळा-मित्र ’राहुल’ आणि मी भाषणे ठोकण्यात एकदम पटाईत होतो. 
’स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच..’ ,
’मी शेंगा खाल्या नाहीत .... मी टरफले उचलणार नाही ’.. 
अशी लोकमान्य टिळकांची भाषणे शिरा ताणून ताणून म्हणायचो.. :) थोरामोठ्यांच्या अश्या टरफला-बिरफलांच्या आणि लहानपणाच्या गोष्टी कितपत खर्‍या-खोटया किंव्हा त्यांच्या चाहत्यांनी आपल्या भक्तीनुसार त्या सजवल्यात या वादात मी आता पडत नाही.. कारण या सुंदर आणि संस्कारी गोष्टींनी नेहेमीच आपल्या सर्वांच्या मनाच्या जडण-घडणीमधे हातभार लावलेला असतो.. तर त्यातल्याच एका भाषणातली ही छोटीशी पण सुंदर गोष्ट.. मनात झिरपलेली आणि मग कुठे कुठे उमटत राहिलेली..

एकदा शाळेत गुरुजींनी मुलांना प्रश्न विचारला
’आभाळ पडले तर तुम्ही काय कराल?’
एक मुलगा म्हणाला ’आभाळ पडले तर मी टेबलाखाली लपेन’
दुसरा मुलगा म्हणाला ’आभाळ पडले तर मी बाजेखाली लपेन’
तिसरा मुलगा म्हणाला ’आभाळ पडले तर मी आईच्या पाठीमागे लपेन’
एक मुलगा मात्र गोड हसत म्हणाला ’आभाळ पडले तर ... मी चांदण्या वेचेन ..’
आणि त्या मुलाचे नाव होते ’बाळ गंगाधर टिळक’..


मला नेहेमी शेजारची सीमाताई भाषणे लिहून द्यायची... एका वर्षीच्या भाषणामधे तिने ही गोष्ट सांगितली मला .. गोष्ट सांगतानाच तिचा चेहेरा चांदण्यांनी फ़ुललेला होता.. चांदण्या वेचण्याच्या कल्पनेने विलक्षण हरखून गेल्याचा क्षण अजून मनात ताजा आहे..ही गोष्ट सांगताना ....’मी चांदण्या वेचेन’ हे वाक्य उच्चारताना मला मीच दिसायचे..  (एरवी वेड्याबिद्र्या मुलांच्या पंगतीमधे अग्रपुजेचा मान माझा असला तरी कुठलीही गोष्ट ऐकताना  त्या-त्या गोष्टींमधल्या शहाण्या बाळाचा रोल मात्रा माझाच असायचा
बर का :) )..
बाकीचे लोक सैरावैरा धावताहेत... बकुळीच्या झाडाखाली वरुन हलकेच खाली येणारी फ़ूले वेचतात तशी आभाळातून हलकेच रिमझिमत येणार्‍या खूप सार्‍या चमचम चांदण्या माझ्या फ़्रॉकच्या ओच्यामध्ये ओघळताहेत... त्या संभाळत जमिनीवर पडणार्‍या चांदण्याही मी उचलते आहे.. आणि या अद्भुत कणांनी माझे शरीरच प्रकाशमान झाले आहे... एक विलक्षण अनुभुतीच देवून गेली ती गोष्ट मला...कुठल्याही परिस्थिती मध्ये सकारात्मक राहण्याचा आणि आयुष्यातली प्रत्येक गोष्टीकडे काव्यात्मक द्रुष्टीने पहाण्याचा सुंदर संस्कार या गोष्टीने केला..

याच दरम्यान मग कधीतरी भित्र्या ससोबाची गोष्ट पण कुठुनशी कळली.. एक ससुल्या असतो...त्याच्या पाठीवर काहिसे पडते...आणि तेव्हाच ढगांचा मोठा आवाज होतो त्याला वाटते आभाळच पडले आणि तो जीव मुठीत घेवून धावत सुटतो..वाटेत त्याला कोण कोण प्राणी भेटतात .. त्यांनाही तो सांगतो की ’आभाळ पडले पळा.पळा’. ते पण त्याच्या सोबत घाबरुन धावत सुटतात.. यामधे जंगलचे राजे सिंहमहाराज पण असतात बरं का..
मग त्यांना वाटेत धुर्त कोल्होबा भेटतो..तो मात्र त्याला थांबवून विचारतो ’अरे, कुठे आहे आभाळ?’
ससोबा म्हणतो ’हे काय माझ्या पाठीवर’..
कोल्होबा हसत सुटतो आणि म्हणतो..’अरे वेड्या हे तर पान आहे..’
 
या गोष्टीचे तात्पर्य समझण्याचे अर्थात वयच नव्हते पण मी मात्र तेव्हा ठरवले होते..
भेटला ना कुठे ससुल्या तर सांगयचे त्याला ..
’अरे वेड्या .. आभाळ-बिभाळ पडत नसतं काही कधीच.. आणि खरचं पडलंच तर मज्जाच असते. चमचम चांदण्या वेचता येतात..’

 पुढे मात्र शाळा,अकरावी-बारावी ,इंजिनीअरिंग च्या धबडग्यात चांदण्यांची गोष्ट थोडीशी मागेच पडली .. अभ्यास, परिक्षा, स्पर्धा यातून धावताना माझाच काही खुट्ट झाले की दचकणारा ससुल्या झाला ... चांदण्या सोडून सारखे डोळ्यांसमोर काजवेच चमकायला लागले.. प्रोबलेम्सकडे पहाण्याचा प्राक्टिकल अप्रोच असला पाहिजे असे मनावर बिंबत गेले.. प्रश्न सुटत होते .. प्रोब्लेम्स सोल्व होत होते...पण काहीतरी चुकत होतच ..काहीतरी हुकत होत.. आणि त्यांच्याशी झटापटीमधे उमटलेले ओरखडे शमवायला चांदण्या तगत नव्हत्या... जमिनीवर पडुन मातीमधे मिसळायला लागल्या होत्या त्या... मग कधीतरी त्या भेटेनाश्याच झाल्या...उगीच बाबा मोठे होतो ना आपण :(

मग जॉब लागला .. पहिले लाडाकोडाचे ट्रेनिंगचे महिने संपले.. पहिल्या प्रोजेक्ट मध्येही नव्या सुनेला जसे चुडा उतरेपर्यंत घरचे काम नसते तसे क्युट-क्युट काम होते.. पण मग ओसरले की नव्या नवलाईचे दिवस.. मोठ्ठा आ वासून एक डेवलपमेंट प्रोजेक्ट चालून आला. माझ्या सौफ़्ट्वेअर क्षेत्रातले सवंगडी आपापला पहिल्या डेवलेपमेंट प्रोजेक्ट चा अनुभव नक्कीच रेलेट करु शकतील.. 
माझा प्रवास ’क्या करनेका वोहिच पता नाही’ इथुन सुरु झाला.. आणि का कोण जाणे (कारणे माहित असली तरी जर ती बदलता येणार नसतील तर असेच म्हणयचे असते.. :() प्रत्येक डेवलेपमेंट प्रोजेक्टचे एस्टिमेटस चुकलेलेच असतात .. आणि ते नेक्स्ट प्रोजेक्टमधे नीट होणारच असतात..फ़क्त तो ’नेक्स्ट’ ’उद्या’एतकाच लांब असतो..:(

तर आम्ही नवे, प्रोजेक्ट नवा, अंदाज चुकलेले, ’इस टाईम करना तो पडेगा नेक्स्ट टाईम पक्का देखते है’ म्हणत आपला लॅपटॉप बगेत कोंबत अगदी वेळेत घरी निघणारा मॅनेजर, प्रचंड काम ..(मला माहिती आहे.. घरोघरी मातिच्या चुली..  म्हणून परिस्थिती-वर्णन इथेच थांबवते
:))
सलग स्लॉगिंग करुन वेडेच झालेलो आम्ही... त्यात माझा पडला ’दिलेले काम केलेच पाहिजे नाहीतर पाप लागते..’ वाला स्वभाव.. सक्काळी येवून ८:३० ला काम सुरु करायचे. ते फ़क्त लंच ब्रेक घ्यायचे.. बाकी सगळे ’अळिमिळी गुप चळी’ ..एकदम ’सुमडी’ मधे  काम..
’काय काम आज केले त्यापेक्षा . बापरे हे आज नाही झाले तर’ भयगंडाने पछाडलेले असायचे मी ..ब्रेक शिवाय काम केले तर ते सगळे आज संपणारच आहे. अशी माझी भाबडी आशा असायची तेव्हा :) एकदम इन्नोसंट वॉरिअर होते मी..
क्युबिकल आणि प्रोजेक्ट मधले लोक त्या बिकट परिस्थितही जोक-बिक करायचे.. मी फ़क्त हसुन त्यामधे साथ द्यायचे... ते लोक आपापली दु:खे कौफी ब्रेकस मधे सांगुन हलकी करायची.. मीही सगळे करणारच होते .. फ़क्त काम संपल्यावर..  अर्थात काम कधी संपते का ? :)

मी तशी शांत स्वभावाची आहे आहे ...म्हणजे खूप बडबडी नाही ..(घरचे या वाक्यावर खूप हसतील:)) .. आणि तसे असले तरी आजुबाजूच्या जगात नेहेमीच सजग सहभाग असतो माझा...अक्टिव लिसनर आणि लागेल तिथेच बोलते मी.. पण त्या वेळी सगळंच बिनसलेले... जीव,शरीर,मन रोजच्या कामच्या ओझ्याने आंबून गेलेले असायचे..सगळ्या जगात आम्हालाच का काम... तंद्रीतच असायचे मी ...मला बोलता बिलता येते हे माझ्या क्युबिकलच्या लोकांनाही माहितच नव्ह्ते तर बाकिच्या प्रोजेट्च्या लोकांना कुठुन ठावूक असणार.

तशीच एक तांबरलेली वेळ...एप्रिल-मे असावा..एका इशुने संध्याकाळपासून जीव खाल्लेला माझा...त्याची सोडवणूकीची वाट माझी घरची वाट होती..
सगळ्यांचे तारवटलेले डोळे.. की-बोर्ड चे खाडखाड आवाज आणि.. सार्वत्रिक-सामईक संभाषणॆ
 
’श्यट.. फ़िरसे फ़ट गया...ये कोड है या भूत’
’वो डिफ़ेक्ट तो फ़िक्स हो गया पर ये क्या नया नाटक है अब..’
’ऒह .. गॉड.. ये एरर का सोल्यूशन तो मायक्रोसौफ़्ट के पासभी नही है..’
’य़ार.. एम-क्यु फ़िरसे रीस्टार्ट करना पडेगा..’
’अब्बे ये क्या डेटा भेजा है..भंकस.. ठीकसे भेज ..’
’हे भगवान.. विझ्युअल स्य़ुडियो क्रश हुवा.. पता नही चेंजेस सेव भी हुवे है या नही..’
’अब्बे कबसे कौस्टंट फ़ाईल लेके बैठा है .. जल्दी चेक इन मार...’

आणि मग अचानक सगळेच कडाडले....
’अरे यार... एसी बंद..लगता है ९ बज गये .....’ :(
अश्या वेळी सगळ्यांच्या सहनशक्तीचा एकदम कडेलोटच ..
’अरे मजे नही कर रहे बाबा कंपनीकाही काम कर रहे है ना..’
’ये प्रोजेक्टके बाद स्विच मार रही हु मै तो..’
’औटोमेटेड करना चाहिये यार..एसी बंद के फॅन चालु..’

 

तरी नशीब फॅन तरी होते.... मग माझ्या क्युबिकलवाला एक मुलगा ,चिराग उठला.. आणि तिरमिरित अख्ख्या फ़्लोअर चे फॅन चालू करून आला..
सगळ्या फॅनसची गरगर एकदमच अंगावर यायला लागली
कोणीतरी म्हणाले
’अरे ईतने स्पीडपे मत चला ..फॅन गिर जायेगा बे..’
चावी फ़िरवल्यासारखे बाकीचे कोण कोण म्हणत राहिले
’अरे बाबा नई बिल्डींग है.. मुझे लगता है फ़ैन क्या पुरी सिलिंग ही नीचे आयेगी...
’मजा आयेगा फ़िर डायरेक्ट आसमा के निचे...’
कोणी शंकेखोर मुलगा उगीच हसू न येणारा पीजे मारायच्या प्रयत्नामधे म्हणाला
’अब्बे फ़िर आसमाही गिरा तो..’
’कुछ भी.......’
’अभी पका मत रे..’

’अरे आसमा गिरा तो क्या हुवा..फ़िर सब मिलके स्टार्स कलेक्ट करेंगे नं..’
माझ्याच नकळत टिचकी वाजवत मी बोलून गेले...एका क्षणात फ़्रॉकच्या ओच्या मधे चांदणे वेचणारी शाळकरी मुलगी झाले की मी.. एक ’आनंद अनूभुती’ अंगभर पसरली....

'अल्ट + कंट्रोल + डीलीट'  कळा बडवून उठलेच मी.. एक सुंदर स्मितहास्य करुन निघाले..

माझ्या वाक्या सरशी आणि अचानक देहबोलीमधे झालेल्या बदलामूळे सगळे लोक जरा बावचळलेच होते....
’आयला सही है रे तु.. ’
’हे गुड सेन्स ओफ़ ह्युमर हं..’
’ओह गॉड फ़िरसे वो बोलेगा... किसने कितने-कितने स्टार्स कलेक्ट किये है बोलो...हाहाहा’
’अरे य़ॆ बोलती भी है..’
असे काय काय संमिश्र पाठीवर आदळत राहिले...:)

माझ्या क्युबिकल ते वॉटर कुलरकडे जायच्या वाटेवर जवळ एक टेरेस होते...रोज पाण्याची बाटली भरताना भुलवायचे मला...
’आपले काम संपले की जायचेच हं राजा..’ रोज मनाला जोजवायचे माझ्या..
तडक दार उघडून बाहेर गेले..पौर्णिमेच्या अलिकडचीच कुठलीशी रात्र असावी ती...
ढगात लपलेला चंद्र सामोरा आला.. आणि प्रत्येक नजरेसरशी एक एक करत चमचमती चांदणी ..
आपणही या सुंदर पसार्‍याचा एक अविभाज्य भाग आहोत.. ही भावना पेशी-पेशीत शिरली...
अनिमीष नेत्रांनी आभाळ अधाशासारखी पित राहिले मी..
अनावर त्तृप्तिने डोळे मिटले..
चांदण्यांच्या हसण्याचा मंजुळ आवाज पहिल्यांदाच ऐकु आला तेव्हा..
खोल श्वास घेतला भरभरुन....हलकेच डोळे उघडून ...ओढणी पसरुन उभी राहिले..
मनातला ससुल्या टुणकन उडी मारुन बाहेर पडला...लॉनवर जावून बागडायला लागला.
आणि डोळे थेंब थेंब चांदणे होवून झोळीत ठिबकत राहिले मग ....:)

अजुनही बागरलेला (बावरलेला + घाबरलेला : शब्दजनक इति कौशल) ससुल्या भेटतो कधी कधी ..
कधी माझ्या मनातलाच..कधी माझ्या भावंडांमधे..कधी मित्र-मैत्रिणींमधे..
कधी जुनिअर्स मधे भेटत राहतो ... त्याला मग कुरवाळते आणि एवढेच सांगते..
 
’आभाळ-बिभाळ पडतच असतं रे...  सारखंच इथे-तिथे .. कितीही टेकु लावले तरी.. कारण दिसण्यापलिकडे ते खुप अथांग असतं ना..पण चांदण्या असतात ना त्याच्यातच लपलेल्या.. 
पडायला-बिडायला लागलं ना तर सर्रर्रर्रर्रर्रळ 'अल्ट + कंट्रोल + डीलीट’ बडवायचं आणि फ़्रॉक मधली मुलगी व्हायच पटकन..’ :)

Friday, 30 April 2010

एका भाळल्या क्षणी ..

 माझी जिवश्च-कठश्च सखी प्राजक्ताच्या पहिला पाऊस चे हे स्वैर रुपांतर ..

याही वेळी तो हलकेच आला.
पाऊल न वाजवता..
खट्टू होवून त्याला म्हटले
"हा रे कसला छळ?"
मातीचा उत्कट गंध श्वासात भरत
जरा रागातच दटावलं त्याला..
"न सांगता बरसलासच कशाला?
ते काही नाही आत्ताच्या आत्ता परत बरसायचं!"

ढगातल्या गालात हसत तो म्हणाला..
"अग आत्ताच तर बरसून गेलोय ना.
पूढच्या वेळी नक्की जागी रहा बरं..
आणि अशी रडत नको राहूस वेडुबाईसारखं..
ठेवून जातो आहे ना तुझ्यासाठी
गारव्याचा स्पर्श.."

रडत नव्हते मी मुळीचच
पाना-फ़ुलांची बेभान नव्हाळी न्याहाळत.
थेबांचे सोनेरी मोती संभाळत..
ठेवली थोडीशी सोनचाफ़्याची फ़ुले खिडकीशी.
मिसळले त्यात मनाचे सूर बेमालूमपणे...
हलकेच शिंपडला जुन्या भेटींचा रंग त्यावर
आणि ’डुयटी मस्ट रे बाबा’ म्हणत लागले नेहेमीच्या व्यापाला
 त्याच्याच नकळत त्याचा मागोवा मात्र घेत..
’खरचं भूलेल का तो या गंमत कारस्थानाला ?’

आणि एका भाळल्या क्षणी ..
भासच वाटावा असा खासच आला की तो पुर्नभेटीला.. :)


Friday, 23 April 2010

मग आनंद फ़ुलणारच असतो...

हाडे गोठवणार्‍या थंडीच्या एका सकाळी आमच्या घरी इथल्या सोसाइटीचे एक मासिक येवून टपकले. त्यावर मोठ्या अक्षरात कोरले होते 'Spring is in the air......'
मी लगेच ’सुंघून’ पाहिले. :) मला काही त्याचा अतापता लागला नाही.
मग खिडकीतून डोकावून पाहिले बाहेर.तर नेहेमीचेच ’थंडेरी’ वातावरण,छाया -पड्छाया,उदासवाणे ढगाळ झाकोळ:(
मासिक अजुन जरा चाळुन पाहिले तर त्यामधे मस्त .... रंगेबेरंगी फ़ुलांचे सुंदर फोटो पाहून मन फ़ुल स्वप्नांनी चमचमयला लागले.

तसा इथे ओफ़िशिअली 1 मार्च ल़ा स्प्रिंग चालू होतो. कार्यालयीन खाक्या स्प्रिंग ल़ा कसा कळ्तो माहित नाही.


 कारण त्या दिवशी मला एक छोटुसे पिवळे फ़ूल गवतात हळूच फ़ूललेले दिसले होते .. :)





पण बाकी निष्पर्ण झाडं. सत्व उडालेल्या झुडुपांमधून जीव शिल्लक आहे असे जाणवतच नव्हते.

मग माझा रोज खिडकीतून डोकावून स्प्रिंग चा मागोवा घेण्याचा खेळ सुरु झाला..
आणि  एके दिवशी खिडकीतून डोकावले बाहेर .. तर बाहेर गवतावर .. काही ’ड्याफ़ोडिल’(Dafodil) ची छोटीशी झाडे ... न पेलणार्या अवजड कळ्या घेवुन डोलत होती ... नव्या नव्हाळीचा रंग ल्यायलेली ती झाडे सर्वप्रथम फ़ुलण्याचा गर्व बाळगत दिमाखात हसत होती..

थंडीचा बोचारेपणा जावून सुखद हवाहवासा गारवा जाणवणारी हीच वेळ ...


मग एक एक दिवस रोज वेग-वेगळी झाडे आपापला छुपा रंग खेळवू लागली...

बाजारात जाताना इथल्या डबल डेकर बसच्या वरच्या फ़्लोवर वर बसून खिडकीतून तो आनंद लुटणे हा एक खुपच सुंदर अनुभव आहे ..
चिकटून चिकटून टुमदार घरे (रो हाऊसेस) , छोटीशी अंगणे . आणि त्या अंगणमधे उगीचच नागमोडी केलेली पायवाट हे इथल्या घरांचे वैशिष्ट्य ....




 एखाद्या बंद घराच्या अंगणात जागोजागी उगवलेले   डाफ़ोडिल्स दाटीवाटीने उभे असतात आणि मग ते घर मोहक दिसू लागते








कोणाच्या दारात ..  गुलाब 'साजिर्‍या मनाचे गुलाबी छंद' होवुन झुडूपभर फ़ूललेला दिसतो ..






कुठेसा लोभावणारा पिवळा धम्मक गोल्ड्न बेल्स (Golden Bells)  दिसतो.त्याने थंडीच्या दिवसांमधे एखाद्या सोनेरी दिवशी 'कधी तरी उजळलेला सूर्यप्रकाश साठवून तो आपल्या कणाकणातून पिसारलेला असतो.








कुठल्याश्या सार्वजनिक बागेमधे पांढरा ब्ल्याकथोर्न (Blackthron) शुभ्र फ़ूललेला दिसतो आणि मनातली उरलेली खिन्नता वितळु लागते.. निस्सीम आनंदाचा रंग शुभ्र पांढराच असावा कदाचित...














प्रकाशले मन अन त्याचा झाला की ओघळ फांद्या देठांतूनी..

फ़ूले फुटून आनंद लुटला तरी अजुन फुलावेसे वाटतेच मनातुनी ..  :)


निळ्या जांभळ्या रंगांची गवताळू फ़ूले अवघे आकाश आपल्या इवल्या डोळ्यांमधे साठवण्याचा खाटाटोप करू लागतात..






आपल्या नाजूक गुलाबी लावण्याने निथळणारे ’चेरी ब्लोसम’ (Cherry blossom/Sakura) पाहिले की वेड लागायचेच बाकी राहते.












काही फ़ुलांची नावे काही केल्या आणि कुठूनही कळेना.. पण त्यांना पाहून मन मायदेशात पोचले.. मग आता ती मिळेपर्यंत मी त्यांना त्याच नावाने हाका मारते.. चूकभूल द्यावी घ्यावी:)







  मोगरा फ़ुलला.......
























       पिवळी शेवंती ....









टपोर्‍या कुंदाच्या फ़ुलांचा गजराच करुन झाडाला लावलेला ..:)













गुलाबी चाफ़ा.....









पण खूप सारे बोलणारा .. :)















स्प्रिन्ग चा वारा भर चौकातल्या झाडांमधुनही आपली जादु खेळवतो.













































अशी सगळी वेडी फ़ूले, पाने डोळ्यांचे पारणे फेडतात ... आणि अचानक चेहरा नसलेली घरे, चौक गालातल्या गालात हसताहेत असे वाटू लागते ...






अजूनही खूप सारी झाडे फ़ांद्यांमधे, देठांमधे उद्याची स्वप्ने सजवून उभी आहेत... नव्या कोवळ्या पालवीने अजून बागेचा पूर्ण नजारा हिरवागार करायला थोडासा वेळ बाकी आहे..
एकदा वाटले होते यांचा पूर्ण बहर पाहून मगच लिहावे....आणि कविवर्य पाडगांवकर यांनी आपल्या एका कवितेमध्ये  सांगितलय  
’फ़ुलं फ़ुलतात तिथे आपण बोलूच नये..’ 
 ते मला मनापासून पटतं ..म्हणून फ़क्त सुंदर छायाचित्रे डकवून मी शांत बसणार होते ..पण एक अनुभूती इथे आवर्जून नोंदवाविशी वाटतेय.. :)
काही धडे आपण लहानपणपासुन गिरवत असतो पण अश्या क्वचित वेळी त्यांचा सुंदर अर्थ वेगळयाच रंगासकट उमजतो ... मनात कायमचा कोरला जातो..
ही रंगवेडी फ़ुलं पहिली की वाटते... निष्पर्ण असण्याच्या जिवघेण्या काळात या सर्वांनी ही रसरसून जगण्याची उर्मी कुठे बरे दडवून ठेवली होती.. आपल्या पडत्या-झडत्या काळात आपल्या अवतीभोवती सावरणारा एक तरी हात असतो पण स्वत:च्या मर्जीने स्वत:चे एक पानही हलवू न शकणारी ही सगळी झाडे कुठल्या आशेच्या जोरावर हे सगळे महिने निभावून नेतात...
कुड्कुडवणारी थंडी.. बाहेरचे सदोदित मळभ आलेले वातावरण...पानगळती च्या मौसमानंतर झालेला निष्पर्ण देह.. मनाला आणि शरीराला हरितद्रव्य देणार्‍या मित्राचे दुर्लभ दर्शन..
हे सारे बदलण्यासाठी ५-६ महिन्यांची जिवघेणी दीर्घ प्रतिक्षा ..आणि मग सुरु होतो हा फ़ुलकवडा ऋतु... झाकोळल्या मनाला उभारी तर तो देतोच आहे,आणि आयुष्यातला एक जादुई धडा आपल्या रंगभरल्या हातांनी शिकवतो आहे..
’धीर धरायचा ग फ़क्त...आणि आपल्या मनात वसंत जपत रहायचा...मग आनंद फ़ुलणारच असतो.'
वेदना शमवून त्या त्या वेळांमधून हसण्याची तरल जाणीव तगवत आपल्यालाही असे फ़ुलता आले तर अवघे जगणेच वसंत होवून जाईल ....हो की नाही? :)

Monday, 12 April 2010

चांगला ’माणूस’ होण्यासाठी ...

आपल्याच विचारांच्या गुंत्याने आपण आपली आयुष्ये गुंतागुंतीची करत असतो. आयुष्याचा खरोखरीचा अर्थ ज्यांना कळला आहे अश्या थोरामोठ्यांच्या आय़ुष्यात थोडे डोकावले की मात्र साध्या साध्या गोष्टींमधले त्यानी शोधलेले सुंदर अर्थ त्यांच्या जीवन रसरसून जगण्याचे रहस्य सांगुन जातात. मोठी माणसे मोठी का असतात ..त्यांचे मोठेपण साध्या सोप्या विचांरांमधे दडलेले असते. कुठल्याही गोष्टी कडे पाहण्याची त्यांची अनोखी द्रुष्टी मनाला खूप वेळा नवा विचार, उभारी देवुन जातात.
बरेच दिवासांपासुन मनात होते अश्या सुंदर गोष्टींचा एक संग्रह आपाल्यापाशी असावा.मनाच्या परिस स्पर्शाच्या या गोष्टी मग पडत्या-झडत्या,भांबावलेल्या प्रत्येक क्षणी आडोसा बनुन जगण्याची उर्मी पुनश्च तरारुन यावी..

आज अश्याच एका सुंदर गोष्टीने सुरुवात करते...

काल youtube वर शोधता शोधता अचानक ही लिंक मिळाली.
हे प्रा. प्रवीण दवणे यांचे ’काव्यांजली - ऒड वाटेच्या काविता’ या कार्यक्रमामधले भाषण आहे. त्यात त्यांनी सांगितलेला हा किस्सा.

ते एकदा कविवर्य कुसुमाग्रजांना एका कुठल्याश्या कार्याक्रमामधे भेटले..आणि त्यांनी त्यांना प्रश्न केला..
’तात्यासाहेब् आजकाल कितीजण कविता करतात. कोणीही उठावे आणि कविता करावे असे चित्र आहे.’
त्यावर ते म्हणाले...
’सकाळी नांगर हातामधे धरणारा शेतकरी जर संध्याकाळी लेखणी हातात धरुन कविता करत असेल तर तो कदाचित चांगला कवी नसेल पण चांगला माणूस तर असेल.’

कित्ती सहज आणि सोप्या शब्दात त्यांनी कविता आणि चांगला माणूस असण्याचे मर्म सांगुन टाकले. आपल्या स्रुजनाच्या ताकादीची जाणीव असणारे काही लोक सोडले तर बाकी आपण सगळेच,’कशाला काही लिहायचे... कोण वाचणार..’ , ’थोरा मोठ्यानी लिहुन ठेवलेय तेच वाचावे आणि गुमान बसावे’ अश्या प्रश्न्नानी, विचारांनी ग्रासलेले असतो. रोजच्या जगण्यातल्या कुठल्यातरी अत्रुप्त स्वप्नाच्या छायेमधे हीनगंड बाळगु लागतो. कित्तेक वेळा सुप्त मनात असलेली ही गोष्ट तुमच्या मनातली कविता कागदावर उतारु देत नाही... पण मला वाटते वरची गोष्ट नक्कीच या उगीचच्या जडत्वावरचे झाकोळ दूर करेल आणि ’एक चांगला माणूस’ होण्यासाठी मनाची कवाडे स्रुजनाच्या दिशेने उघडी करेल..

ता.क: प्रा. प्रवीण दवणे यांचे संपूर्ण भाषण खूपच सुंदर आहे हे सांगणे न लागे. :)

Monday, 8 March 2010

चंदनाचे झाड़ ...


'अग सांगलीच्या आजीकड्चे चंदनाचे झाड़ चोरीला गेले ...'
आई तिकडून फ़ोन वर सांगत होती.
'
म्हणजे?'
'अग तुला माहिती होते का आजीच्या दारात चंदनाचे झाड़ होते ते?'

असे
काही झाड होते अणि मला ठावुक नाही seems just impossible....

शाळेच्या
सुट्या सुरू झाल्या की दुसर्या दिवशी आम्ही दापोली -मिरज गाडीवर स्वार होवून सांगलीच्या मार्गाला लागायचो... शेवटचा पेपर लिहिताना मन तर केव्हाच मामाच्या गावी पोचलेले असायचे...
सुट्या लागल्या की सगळे गावाकडे पळतात पण माझे आजोळ सांगलीला त्यामुळे सुट्टीला शहरात अशी गंमतच....
सकाळची
:४५ ची गाडी संध्याकाळच्या उतरत्या उन्हात घरी पोचवायची..
अणि मग दूसरा दिवस चालू झाला की आमची फौंज झाडांवर बागडायला...
आजीकडची झाडेच तशी होती.. वानर सेनेला भुलवणारी..
पेरू, आंबा , जांभुळ, अंजीर,नारळ,सीताफळ, डाळिंब...खुप सारी फुलझाड़े अणि गेटवर तुरीच्या
शेंगांची
वेल...आणि शेवग्याच्या शेंगा..
आजी, मामा, मामी इतकीच ही सगळी झाडे माझ्या खासच ओळखीची...

घराची जागा तशी लहानच ... पण सगळी झाडे आजीने माणसां इतकीच प्रेमाने जपलेली.. आणि वानर सेना आता काय धुडगुस घालते आहे या कड़े मात्र आजीचे बारीक़ लक्ष... खास गोव्याच्या स्टाइल मधे आम्हाला अशी झाडायची आजी...

पण
या सार्‍या पसार्‍यावर नजर फिरवून सुध्दा कुठे चंदनाचे झाड आहे ते मला आठवेंना ...

आणि
मग मी भानावर आले..

शाळेत
असतानाच्या मे महिना आणि दिवाळीच्या तुडुंब सुट्ट्या कॉलेज सुरु झाल्यापासून
वर्षाकाठी - संख्येपर्यंत रोडवलेल्या. त्याही वीकेंड आणि जोडून आलेल्या सुट्टीच्या .. त्या मधे माणसांचेच मनसोक्त भेटणे व्हयायचे नाही तर बागेतली झाडे तर दुरचीच ..
गावातला गणपति, नातेवाईक , आईची मैत्रीण असे सगळे नॉन स्टॉप झटपट .. पुण्याला निघायची वेळ कधी येवून ठेपयाची ते कळायचेच नाही....

निघताना जाणवायचे ..की आंगण कट्यावरच्या गप्पा तश्याच राहून गेल्या आहेत.... झाडाना गोंजारणेही..
नाही म्हणायला एखाद फेरी बागेत ,गच्ची वर व्ह्यायची .. बदललेले काही-बाही डोळ्यानी पाहिले .
पण मनाने त्याची पोच घेतलीच नव्हती ...ते बिचारे त्याच्या जुन्या जगातच खुश होते...

अश्याच विखुरलेल्या चतकोर आठवणींमधून मी चंदनाच्या झाडाला शोधण्याचा प्रयत्न केला...

पण
एवढ्या अमूल्य तोडिचे काही मनात टाकलेले आठवेच ना ... .

'नाही ..मला कधीच नाही जाणवला त्याचा वास कधी ..'
'अग चंदनाचा सुगंध बुंध्या मधे असतो, आणि झाड मोठे झाले की तो येतो...'


म्हणजे
गेले २-3 वर्ष सांगलीला पाय लागलेले नाहीत... आजी कितीदा बोलावते पण आठवड्याचे दिवस आणि कधी कधी तर ७ दिवस मान मोडून काम केल्यावर हातात आलेले शनिवार रविवार मला घराची पायरी उतरू देत नाहीत ... आजीच्या वयाला आणि प्रेमाला ते कळतच नाही .. ती चिकाटीने बोलवत राहते ..

दोन वर्षापूर्वी
माड गेला ते सांगतानाचा आजीचा दुखरा चेहरा मला पुन्हा
पुन्हा आठावू लागला.....
आणि मग तिच्या थकलेल्या डोळ्यातच मला सुसाट वेगाने pass झालेला time, 'Past times' झालेला दिसू लागला.
वेळेला - दिवसाना एवढा वेग असतो...??? एक अख्खे झाड अंगणात रुजुन मोठे होऊन ते लोकाना कळून त्यानी चोरून न्यावे आणि आपल्याला ते कळूही नये एवढा???
मला त्या झाड चोरणार्‍या लोकांचा हेवा च वाटायला लागला .. त्याना त्याच्या अस्तित्वाची जाणीव होती..


'अग पण असे अंगणातले झाड कसे चोरीला गेले....'
'
रात्री चोरले... आजीला आवाज आला थोडा पण मामाला उठवून बाहेर जाईपर्यंत ते लोक गेले होते...'


आजकल
चोरीला काय काय जावू शकते याची लिस्ट रोजच अपडेट होवू लागली आहे...

काय काय म्हणून घरात नेवून ठेवणार ? घरातलेच कशाला मनात असलेले ही कुठे आपण लपवून वाचवून ठेवू शकतो आहे ? हाताशी आहेच असे वाटत असताना सर सर सरकणारा वेळ आपल्याच डोळ्यांसमोर कोणी तरी चोरून नेतो आहे....अणि हे सगळे थांबून थोड़े निस्तारयाला हवे आहे ही जाणीव ही...

आता जागे राहून पहारा द्यायलाच हवा..
नाहीतर परत चंदन बहरेल ही...
पण ताशी १ दिवस या वेगाने चाललेली
आपली आयुष्ये ....धावपळीच्या अंदाधुंदी मधे ,
झुळकून गेलेले
अवचिता परिमळु आणि त्याचे अळूमाळुपण यांची गाज विसरून जातील..

चंदनाच्या झाडाला जपायलाच हवे....